computer

"चाईल्ड फ्रेंडली कॉर्नर" म्हणजे काय ? तेलंगणा पोलिसांच्या या कौतुकास्पद प्रयोगाबद्दल जाणून घ्या !!

बाल दिनाच्या निमित्ताने तेलंगणा पोलिसांनी लहान मुलांना एक आगळीवेगळी भेट दिली आहे. तेलंगणाच्या ‘राचकोंडा मेडिपल्ली’ पोलीस ठाण्यात लहानमुलांसाठी एक स्पेशल जागा बनवण्यात आली आहे. या जागेला “child-friendly corners” नाव देण्यात आलंय.

गेल्या काही वर्षात लहान वयात असतानाच काही  व्यसनं लागणे, रागाच्या भरात हातून हिंसा घडून  येणे, समाजातील काही व्यक्तींनी मुलांचा लैंगिक छळ करणे हे प्रकार जास्तीतजास्त उघडकीस येत आहे. मुले अशा घटनांनी दबून जातात, निराश होतात, त्यांना काय करावे काहीच सुचत नाही त्यामुळे समाजकंटकांचे आणखीनच फावते. अशा सर्व प्रकरणांना चाईल्ड कॉर्नरमुळे वाचा फुटणार आहे.

बचपन बचाओ आंदोलन (BBA) आणि  राचकोंडा पोलीस आयुक्तालय यांनी बाल दिनाच्या निमित्ताने एकत्र येऊन ही कल्पना तयार केली आहे. पोलीस स्टेशनला भेट देणाऱ्या लोकांसोबत जी लहान मुलं असतात त्यांच्यासाठी आणि बालगुन्हेगारांसाठी इथे एक स्पेशल जागा ठेवण्यात आली आहे.  मुलांसाठी तिथे पुस्तकं, गेम्स, झोपण्यासाठी लहानशी जागा, पाणी, इत्यादी गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत.

अशा परकारची चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन्सची संख्या देशात वाढताना दिसत आहे. हरियाणा, तामिळनाडू येथील पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा चाईल्ड फ्रेंडली कॉर्नर आहेत. बचपन बचाओ आंदोलनाचे मुख्य समीर माथुर म्हणाले की, “लहान मुलांना योग्य आणि वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन गरजेची आहेत. अशा पोलीस स्टेशनमध्ये मुलांसाठी योग्य वातावरण तर असतंच, पण लहान मुलांशी संबंधित गुन्हे जास्तीत जास्त नोंद व्हावेत म्हणून प्रोत्साहन दिलं जातं.”

अशा या अनोख्या जागेचं उद्घाटन मोठा माणूस करून कसं चालेल. या जागेचं उद्घाटन ७ वर्षांच्या डी. ईशान याने केलंय. त्याला मोठं होऊन पोलीस व्हायचं आहे.

तर मंडळी, राचकोंडा पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. याच पद्धतीची व्यवस्था देशाच्या इतर भागांमध्ये उभारली जावी हीच इच्छा.

सबस्क्राईब करा

* indicates required