computer

२० लाख झाडे लावणाऱ्या एका सामान्य महिलेचा यूनेस्कोतर्फे पुरस्काराने सन्मान !!

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांची आहे. सरकार कडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा प्रत्येकाने त्यात काहीतरी हातभार लावला पाहिजे असे नेहमी बोलले जाते. पण हवा तेवढ्या गतीने बदल दिसत नाही. अशा परिस्थितीत सोशल मिडियावर नुसते बाष्कळ बडबड करणाऱ्या लोकांपेक्षा शांतपणे आपल्या कामामधून संदेश देणाऱ्या लोकांचे नेहमी कौतुक वाटते. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका आजीबाईच्या असामान्य कामगिरीची माहिती घेऊन आलो आहोत.   

या आजी आहेत  तेलंगणातल्या.  पर्यावरण रक्षणाच्या कामात मदत व्हावी म्हणून कामाला लागलेल्या चिकापल्ली अनुसूयम्मा यांनी तब्बल २० लाख झाडे लावली आहेत. तेलंगणात संगारेड्डी जिल्ह्यात पास्तापुर नावाचं गाव आहे. तिथे अनुसयम्मा राहतात. सध्या वय वर्षं ५०. या अनुसयम्मांनी वाळवंटी भागातल्या २२ गावात दोन डझन वने उभी केली आहेत. 

अनुसूयम्मा या डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीच्या सदस्य आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजूबाजूच्या गावातील महिलांचे संघटन करून पास्तापूर परिसराला जंगलात बदलले आहे.  मंडळी, अनुसूयम्माच्या या कामाची दखल यूएननेसुद्धा घेतली आहे. त्यांना यूनेस्कोतर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अनुसूयम्मा यांना अगदी कमी वयात त्यांच्या नवऱ्याने सोडून दिले होते.  शिकलेल्या नसल्याने नोकरी सुद्धा मिळत नव्हती. अशा परिस्थितीतसुद्धा जिद्दीने त्यांनी मुलाला शिकवले. याच काळात त्या डेक्कन डेवलपमेंट सोसायटीच्या संपर्कात आल्या आणि त्यांना जगण्याचा मार्ग सापडला. त्यांनी वाळवंटी जमीन जंगलात बदलण्याला स्वतःच्या आयुष्याचे मिशन बनवले. सुरुवातीला त्यांनी १२०० एकर जमिनीवर झाडे लावली. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातली ८०% झाड़े जगवून दाखवली. 

सध्या त्यांच्यासारख्याच काम करणाऱ्या महिला तयार व्हाव्यात म्हणून त्या काम करतात. महिलांना नर्सरी तयार करण्यासाठी त्या प्रशिक्षण देतात.  शेवटच्या श्वासापर्यन्त हे काम करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्या सांगतात की येणाऱ्या पिढीला स्वच्छ हवा आणि चांगले अन्न हवे असेल तर सगळ्यांनी या कामात उतरले पाहिजे.

 

लेखक : वैभव पाटील.

 

आणखी वाचा :

१७ वर्षांच्या कष्टातून ३०० एकरमध्ये नवीन जंगल निर्माण करणारा अवलिया !!

एकाच झाडावर येतात ४० वेगवेगळी फळे ? कोणी केलीय ही कमाल ??

सबस्क्राईब करा

* indicates required