ठगाची जबानी : पूर्वार्ध - प्रकरण २२

(या मालिकेतील सर्व भाग हे पुस्तकाच्या मूळ प्रती प्रमाणे बोभाटावर प्रकाशित करण्यात येतात. या कारणाने त्यातील विचारांशी बोभाटा सहमत असेलच असं नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

मग आम्ही घरी पोहोचलो. जाताना कसला त्रास झाला नाही, काही प्रसंगही घडले नाहीत. घरी अगदी सुखच सुख होते. माझ्या पराक्रमामुळे माझा दर्जा वाढला होता. माझ्या बाबांनी आता धंद्यातून निवृत्त व्हायचं ठरवलं. दोनचार वर्षे पुरेल एवढी संपत्ती आमच्याजवळ होती. तेथे विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला गेला. आमच्याबरोबरच्या ठगांना व नोकरांना दीर्घ रजा देण्यात आली. दोन महिन्यांनी हुसेन आपल्या टोळीसह आला. त्यानेही बराच पैसा व दागदागिन्यांची लूट मिळवली होती. तिचेही नियमानुसार वाटप झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु वस्तुस्थितीत आमच्या कडे लाखाहून नगदी रुपये होते व इतर दागदागिन्यांची मिळकत तर किती तरी होती.

अझीमाच्या सहवासात तर मला स्वर्ग सुखच लाभत होते. अझीमाला आणि मला एक गुटगुटीत मुलगा झाला होता आणि थोड्याच काळात आणखी एकाची भर पडणार असेही दिसू लागले होते. दोन पावसाळे गेले.

मी धंद्यासाठी बाहेर पडायला उत्सुक होतो. परंतु बाबा काही केल्या परवानगी द्यायला तयार नव्हते. कशाला उगाच पैशामागे धावायचं? अरे अजून भरपूर पैसा शिल्लक आहे. आजच काही गरज नाही. मला पैशांपेक्षा धाडसी जीवन प्रिय होते. आळसात आणि केवळ ऐषआरामात दिवस काढण्याचा मला कंटाळा येऊ लागला. बद्रीनाथ आणि इतर बंगालच्या बाजूला जाण्याचे बेत करु लागले. मला मात्र बाबांची अनुज्ञा मिळेना. बाबांना सारखे वाटत असावं की मला चांगले दिवस नाहीत. मी संकटात सापडेन. म्हणूनच ते मला परवानगी देत नसावेत.

आमच्या टोळीतले ठग त्यांच्या जमादाराच्या नेतृत्त्वाखाली आपापल्या नव्या कामगिरीवर निघाले. कारण त्यांना पैशाची खरी गरज पडली. त्यांच्याजवळचा पैसा संपलेला होता. त्यांनी देवीला कौल लावला. तो तसा अत्यंत पूर्णपणे अनुकूल नव्हता. तरी पण ते गेले. काही दिवसांनी ते निराश होऊन परतले. कारण त्यांना धनलाभ फार झालाच नाही. प्रतिकूल हवामानामुळेंही त्यांना परत फिरावे लागले.

बद्रीनाथ आपल्या सहा अनुयायांसह बंगालकडे गेला, कलकत्त्यालाही पोहोचला. तेथपर्यंत त्याला बरेच धन मिळाले. परत येताना मात्र त्यांनी धन-पैका वाईट मार्गाने उधळला. शेवटी जेमतेम बनारसला पोहोचले.

आता ते दारिद्री आजारी भुके कंगाल झाले होते. तेथे त्यांनी काही यात्रेकरुंना ठगवले. त्यांना लुबाडून मारुन पुरुन ते पुढे गेले. परंतु या खेपेस एक यात्रेकरु नीट मारला व पुरला गेला नाही. तो खड्ड्यातून जिवंत वर आला व त्याने सरकारात सर्व काही जाऊन सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरुन शेजारच्या गावात असलेल्या बद्रीनाथ व त्याच्या सोबत्यांना पकडण्यात आले. त्यांच्याजवळची मालमत्ता त्याने ओळखली. आरोप सिद्ध झाला. त्यांची मालमत्ता जप्त झाली व सर्वांनी फाशी देण्यात आले.

माझ्या कथेचा इथे पूर्वार्ध संपला. साहेब मी इथे थांबतो. दोन दिवसांनी उरलेला भाग सांगेन. मी त्या अमीर अलीला रजा दिली व तो सलाम करुन निघून गेला.

हा अमीर अली आपली कथा सांगताना रंगून गेला होता. कथेचे सूत्र त्याचे कधी सुटले नाही. त्याने कधी पाल्हाळ लावला नाही. वर्णनांची लांबी कधी वाढवली नाही. उगाच बारीक सारीक तपशील भरला नाही किंवा पुनरावृत्तीही कुठे केली नाही. वक्तृत्व मोठं अधिवान नव्हतं. पण आठवण्यासाठी त्याला थांबावं लागलं नाही.

जगात खुनी माणसं थोडी का होऊन गेली? श्रुतीस्मृतींच्या काळापासून मनुष्यवध घडत आहेत. काहींचा हेतू सूड घेणं असतो. काही मत्सरापोटी होतात. स्वार्थ, सत्ता, पैसा स्त्री किंवा मनोविकृती हे देखील अनेक खुनांचे मूळ असते. पण अशा प्रकारे ‘वध’ करणार्‍या खुन्यांचे, मारेकर्‍यांचे मन त्यांना नेहमी खात राहातं. त्याची मनःशांति ढळून जाते. ती व्यक्ती केव्हा ना केव्हा आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप करते. पण या ठगांचे काही वेगळेच आहे. त्यांना या मनुष्य हत्त्येचं कधी वाईट वाटत नाही. त्यांची विवेकबुद्धी त्यांना टोचणी देत नाही. मारलेल्या व्यक्तींची भुते त्यांना कधी भेटत नसावीत, छेडत नसावी. हे ठग मी पाहतो, बरेच तुरुंगात आहेत. पण त्यांना केलेल्या मनुष्यवधाचा पश्चाताप नाही. ते ठीक जेवतात, खातात पितात, त्यांना छान झोप लागते. काही ठग हिंदू आहेत. काही ठग मुसलमान आहेत. त्यांच्यात अनेक पोटजातीही आहेत. पण सगळे एकाच मनोवृत्तीचे आढळतात.

हिंदू ठग देवीचे भक्त आहेत व देवी आपलं संरक्षणकर्ती आहे असं मानतात. कुराणात मात्र खुनासाठी खून, दातासाठी दात. डोळ्यासाठी डोळा असा प्रतिशोध घेतला जातो असं सांगितलं आहे. आपल्या कृत्याबद्दल आपल्याला देखील अशी शिक्षा प्रेषित करील असं मुस्लीम ठगांना वाटत नसावं. मुस्लीम ठग हे धार्मिक वृत्ताचे असतात. दिवसातून पाचवेळा नमाज पढतात, रोझाचे उपवास करतात. मोहरममध्ये छाती बडवून रडतात. धार्मिक सर्व प्रथा पाळतात. त्यांना नरकाचे भय वाटत नाही. या मनुष्यवधाचे त्यांना काहीच नसते जर्मनीत इटलीत देखील मनुष्यांना सरसकट मारुन आपली उपजीविका करणार्‍या अनेक टोळ्या आहेत हे मला ठाऊक आहे. पण या ठगाइतकी काही त्यांची संख्या नाही किंवा त्यांचा प्रचारही फार मोठा नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required