ठगाची जबानी : उत्तरार्ध - प्रकरण २६

दुपार झाली व आमचं दुर्दैव आडवं आले आणि काही शिपाई व पहारेकरी यांना पुढे घालून दरोगा साहेब आमच्याच कोठडीत उपस्थित झाले.

‘संपलं! आता हरलो. आता केवळ मृत्यू.' मी मनात म्हटले. तरी म्हणले, ‘आमचा का छळ करता आहात? का पकडता? इथे आम्ही काय नवीन अपराध केला आहे ?'

'त्यांच्या बेड्या पाहा' दारोगाने शिपायास फर्मावले. शिपायाने पाहिल्या तो ओढताच तुटल्या.

‘तुम्हाला सल्ला देतो. तुमच्याजवळ कानस वगैरे हत्यार असेल तर टाका मूकाट्याने. आणि यानंतर जेव्हा तुम्ही कानशीने गज कापाल तेव्हा जरा तूप अधिक घालत जा. अरे यांची झडती घ्या, पाहा यानी कानस कुठे ठेवली आहे ती?' आम्हाला अगदी नग्न करण्यात आले. आमच्या चड्डीत जेथे नाडी ओवली जाते तेथे कानस सापडली.

‘कानस नवी दिसते. मीरसाहेब, ही इंग्लीश कानस आहे. इन्शाल्ला! तुम्हाला येथल्याच कुणी ती आणून दिली असणार. त्यालाही धूळ चारायला लावतो. थांबा'

‘साहेब ही कानस आम्हीच येताना आणली. आम्ही तुरुंगात आलो तेव्हा कुठे आमची झडती घेतली होती तुम्ही?'

'गाढवीच्यांनो, आम्हाला अक्कल शिकवू नका. ए घुबड्या, तू ठग आहेस हे ठाऊक आहे. बघ तुला कसा वागवतो ते बच्चंमजी! तुझा कानस देणारा दोस्तही शोधून काढतो. ही कानस कोणत्या दुकानात कुणी केव्हा खरेदी केली हे आता पाच क्षणात मला कळेल. हे शिपायानो, आपले काम अजून संपले नाही. खिडक्यांचे ते गज पाहा.’

 ते गजही तुटत आणून ठेवलेले दिसले. मग काय? मला फटके मारीत त्या कोठडीतून काढले व एका अरुंद खोलीत कोंबले. या खोलीची रूंदी चार फुट, लांबी आठ फुट व ऊंची पंधरा फूट होती. तिन्ही बाजूना खिडकीच नव्हती! अशीच एक कोठी समोर होती. तेथे माझा मित्र ठेवला

गेला!

ही जागा एकांत, भयाण होती. मला वाईट अन्न मिळू लागले. मला सर्व व्यवहार त्याच खोलीत करावा लागे. त्याची दुर्गधी भयंकर सुटे. आठवड्यात एकदाच ती साफ केली जाई. मला तेथे अन्न खाणे, झोप घेणे, कठीण व्हायचे! मी भवानीचा जप केला. अल्लाची प्रार्थना केली. काही उपयोग झाला नाही. माझी आशा मला सोडून गेली. अश्रू आटले. अन्नपाण्याची चव राहिली नाही. असं एक वर्ष गेलं.!

मी जणू मेलो होतो. प्रेत उरले. बाहेर मी कधी पडेन व पुन्हा सुखाचे काळजीचे, धाडसाचे, जीवन जगेन असे स्वप्नातही वाटेनासे झाले. या तुरूंगात पलीकडे माझा मित्र हूरमत होता. पण तो कधी दिसला नाही. मी त्याच्याशी बोलू शकलो नाही. मी रोज मृत्यूची एक हजार वेळा प्रार्थना करी, परंतु त्या अल्लाने माझी प्रार्थना एकदाही स्वीकारली नाही. वर्षानंतर एकांतवास संपला व माझ्याबरोबरच माझा मित्रही राहायला आला.

आता आम्ही जुन्या आठवणी काढून रंगत होतो. जीवन सुसहय करीत होतो.

मी त्याला एकदा विचारले, 'तू माझ्यापेक्षा बुढ्ढा आहेस. माझ्या बाबांची तुला अधिक माहिती असेल. मरण्यापूर्वी ते मला म्हणाले, ' तू काही माझा खरा मुलगा नव्हेस!’'

'मीरसाहेब, इस्माईलने तुला पूर्वी काहीच कधी सांगितले नाही? छे, तो सारा प्रकार सांगण्याइतके त्याच्याजवळ धैर्यच नव्हते.'

‘म्हणजे याचा अर्थ काय?'

'त्याने जे सांगितले की तू त्याचा मुलगा नाहीस हे खरे आहे. मला सगळी कथा प्रथमपासून ठाऊक आहे. ही कथा ज्याला ठाऊक आहे अशी एक व्यक्ती अजून जिवंत असेल व ती म्हणजे गणेश जमादार!'

‘कोण गणेश जमादार? मी त्याचा द्वेष करतो. त्याची आठवण सुद्धा नकोशी वाटते मला. बदमाष!'

‘ती एक दीर्घ कथा आहे, आठवेल तशी सांगतो. तुलाही त्यातला काही भाग आठवेलच.'

'माझ्या आईबापांचा खून झाला काय? मला एकदा तसं वाटल होतं.’ इस्माइल. तो तुझा बाप नव्हता. तो हुसेन जमादाराच्या टोळीत एक ठग होता. त्याची आणि माझी दिल्लीजवळच्या एका खेडेगावी पहिली भेट झाली. काही दिवसांनी आमची एकलेरा गावी माळव्यात पुन्हा भेट झाली. पावसाळ्याचे दिवस होते व आम्ही बनिजच्या शोधात होतो. इस्माइल आणि गणेश बाजारात हिंडत होता. त्यांना इंदूरकडे जाणारे काही प्रवासी भेटले. आम्ही सर्वांनी त्या प्रवाशांना चौथ्या किंवा पाचव्या मुक्कामावर गाठले. या प्रवासात एक सभ्य गृहस्थ त्याची बायको, एक मूल आणि एक वृद्ध स्त्री होती. तो गृहस्थ घोड्यावर चालला होता व त्याची बायको मेण्यातून शेजारून जात होती. ती दोघे म्हणजे तुझी आईबाप होत.’

‘होय मला आठवतं. पुढे सांगा.'

‘गणेशने तुला रस्त्यात खेळताना पाहिले. त्याने तुला जिलबी किंवा काही खाऊ दिला. खेड्यातल्या मुलांनी तुझ्या जवळचा खाऊ लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगातून इस्माइल व गणेश यांनी तुझ्या आईबाबांशी ओळख केली. ऐकतो आहेस ना? सांगू ना पुढे ?'

'हो सगळं सांगा.'

'इस्माइलला तू आवडलास. तो तुला घोड्यावर घेऊन पुढे असे. तुलाही इस्माइल आवडला. प्रवासात त्याने तुझे खूप लाड केले. काही दिवस सर्वांचा प्रवास नीट चालू होता. शेवटी बनिज करण्याची ठरलेली जागा आली. मी ती जागा अजून तुला दाखवीन. गणेशाने तुझ्या आईला मारले. म्हातारीला मी, तुझ्या बाबांना इस्माइलने खतम केले. तुला घेऊन इस्माइल पुढे सरकला. इस्माइलच्या घोड्यावरून तू नदीत पडलास. गणेश तुला बनिज करण्यासाठी धावला. तेथे इस्माइलची व गणेशाची तरवारीने लढाई झाली. पण इस्माइल जिंकला. तुझ्या आईच्या प्रेताशी बसून तू रडत होतास. प्रेतांची व्यवस्था झाल्यानंतर तुला घोड्यावर पुढे घेऊन इस्माइल निघाला.'

'गणेशाचे मत होते की तुझे वय जास्त होतं. त्यामुळे तुला दत्तक घेता येणं कायदेशीर नव्हते. पुन्हा गणेशाने तुझ्या गळ्याभोवती रूमाल टाकला व यावेळी मी तुला वाचवले. याच मुद्यावपुन्हा गणेश व इस्माईल यांचे युद्ध जुंपले! या मुद्यावर गणेश इस्माइलला कायम सोडून गेला. अगदी शेवटच्या म्हणजे इस्माईलच्या आयुष्यातल्या शेवटच्या एकदोन मोहिमामध्येच तो पुन्हा इस्माईलच्या टोळीत आला.

इस्माइलला तुझ्याबद्दल प्रेम वाटे, त्याने तुला वाढवले. पण तुला एक बहीण होती. ती तुमच्याबरोबर, आईबाबांबरोबर प्रवासाला आली नव्हती. ती वाचली.'

'माझी सख्खी बहीण कुठे असेल?'

'ती एकलेरालाच असेल. कधी तिकडे गेलात तर ते वृत्त कळेल.'

‘अरेरे, ज्या मुलीला मी एकलेरा येथे मारली ती तर माझी बहीण होती? तिचा नवरा, तिचा सासरा, सारे मला भेटले होते. तिच्या गळ्यातील त्या ताईतासाठी, तिच्या गळ्यातल्या मंतरलेल्या ताईतासाठी मी स्वतः तिचा खून केला! चोळी फाडली, ते यंत्र हिसकावून घेतले. माझी बहीण का होती ती? बरं झालं मी तिचं प्रेत विवस्त्र होऊ दिलं नाही. तिला तशीच पुरली या विचाराने थोडं बरं वाटलं. तरी भावाने बहिणीचा खून केला याची मला लाज वाटायलाच हवी. या माझ्या पापाबद्दल अल्ला मला खचितच क्षमा करणार नाही.'

दुसरे मन म्हणाले, ' तिच्या नशिबात माझ्या हातून मृत्यू होता. झाले ते अल्लाच्या इच्छेप्रमाणेच झाले. मी कोण? माझी शक्ती म्हणजे ईश्वराचीच शक्ती' अर्थात हे समर्थन अगदी कच्चं, न टिकणारं होतं. मला या पापाबद्दल अजून वाईट वाटते.

मी कैदेत असताना चार वर्षे झाली व माझा मित्र थोडा आजारी पडून तुरूंगातच वारला. त्याने माझ्या आयुष्याची सांगितलेली पूर्व कथा खोटी आहे असं त्यानं सांगावं म्हणून मी त्याची याचना केली. मला वाटत होते हे वृत्त सगळे खोटे ठरेल तर किती बरं होईल, परंतु ते सारं खरं होतं.

तो मेल्यावर पुन्हा मी एकटा पडलो. मला फक्त अन्न आणून देणारा वार्डन तेवढाच दिवसातून दिसे! मी माझ्या अरुंद खोलीत येरझारा घालून बराच वेळ घालवी. अशी सात वर्षे गेली. तो पहिला दरोगा बदलून गेला की मेला मला ठाऊक नाही. नव्या दारोग्याने मला पूर्वीच्या प्रशस्त कोठीत आणून ठेवले. मला तेथून तुरुंगातच, पण ये जा करणारे कैदी दिसत. त्याचं चालणं पाहाण्यात मी मन रमवीत असे. पुन्हा तीन चार वर्षे गेली मग म्हातारा राजा मेला व नवा राजा गादीवर बसला.. मला आशा वाटू लागली की या निमित्ताने आपल्याही शिक्षेत काही सूट मिळेल. कारण अशा राज्यारोहण प्रसंगी कैद्यांना सूट देण्याची या देशात चाल आहे. मी अशा बातमीकडे अगदी डोळे लावून बसलो.

आणि काही दिवस अशी खूप वाट पाहिल्यानंतर मला एक दिवस तुरूंगाच्या ऑफिसमध्ये बोलवण्यात आले. माझ्या बेड्या काढल्या. माझा जीर्ण झालेला पोषाख मी उतरवला. बारा वर्षे पूर्ण इथे काढली, आता पुन्हा जगात माझे नशीब काढायला बाहेर पडणार होतो.

दरोगा म्हणाला. 'मीरसाहेब, हे थोडे पैसे घ्या आणि लक्षात ठेवा, आता आपल्या पूर्वीच्या धंद्याला कायमचा राम राम करा. जा. काही नीट प्रामाणिक उद्योग करा. दैव अजून अनुकूल असेल तर ठीक होईल.'

मी दरोगासाहेबांचे आभार मानले व तेथून निधालो. दिवसभर शहरात हिडलो. भटेराकडे खाल्ले व त्याच्याकडे रात्री राहिलो. बारा वर्षांच्या कोंडवाड्यातून नरकातून बाहेर स्वतंत्र इसम म्हणून स्वच्छ हवेत प्रथमच शांत झोपलो.

उजडताच उठलो. कुठे जायचं, काय करायचे हा विचार होता. कुणीतरी जुना दोस्त बुंदेलखंडाकडे भेटेल असं वाटलं म्हणून त्या दिशेने प्रवास करावा असे ठरले. मला पोषाख करायला हवा होता. मी एका फकीराकडून फेल्ट टोपी घेतली. चौकटीची एक लुंगी घेतली, हे कपडे पेहेनले व शहराच्या उत्तरेकडील वेशीतून बाहेर पडलो.

मला कुठेतरी कशीतरी भाकरी मिळणार होती– बरी वाईट, हक्काची किंवा भीक मागून. प्रथम मी झालोन्यास जायचं ठरवलं. माझ्याजवळ वाटखर्चासाठी पुरेसे पैसे होते. झालोन्यास आल्याबरोबर मी प्रथम माझ्या मुलीला, मुल्लाला भेटायला गेलो. त्या गल्लीत गेलो. तेथे काही बदल झाले होते. पण मी घर ओळखले. पण त्या घरात मुल्ला राहात नव्हता. माझी मुलगी नव्हती. कुणीतरी दुसरं राहात होते तिथे मला कळलं की काही वर्षांपूर्वीच मुल्ला तेथून दिल्लीस गेला.त्या मुल्लाच्या  मुलीबद्दल विचारले. तिचे लग्न झाले, पण कधी, कुणाशी, इत्यादी कुणाला काहीच ठाऊक नव्हतं.

तेथून निघालो. माझ्या घरावरून चक्कर टाकावी असं वाटले, परंतु मला तसा धीर झाला नाही. गावातल्या एका बागेत बसलो. तेथे एक फकीर राहत होता. मी त्याला ओळखत होतो. तो आता म्हातारा झाला होता. त्याने मला अर्थातच ओळखलं नाही. त्या म्हाताऱ्या फकीराबरोबर मी राहायचं ठरवलं. त्याला तशी परवानगी विचारली व त्याने ती दिली. काही दिवस त्याच्याबरोबर भीक मागितली. मिळाले ते ओलं सुकं खाल्लं. भीक मागून माझं व त्याचं पोट भरणं कठीण होतं. कुणी ठग ओळखीचा भेटावा. कुठे चोरी करावी असे मनात येई. मला त्या जीवनाचा अत्यंत कंटाळा आला. मला ठगी करण्यात इतके दुःखाचे अनुभव आले, कपाळावर शिक्का बसला. बारा वर्षाहून अधिक काळ तुरुंगात हाल सोसले, तथापि मला अजूनही त्याच व्यवसायाचे जबरदस्त आकर्षण होते. दारूच्या अधीन झालेल्या माणसाला आपला अधःपात होतो आहे, प्रकृती बिघडत आहे वगैरे समजत का नाही? परंतु त्याची दारू सुटते काय?

मी तिराईला निघालो. तेथे तो ओळखीचा जोतिषी राहात होता. त्याच्या खोट्या भविष्य सांगण्यावरून मला तो शेखजी नसरुद्दिन मोतीवाला बनिज म्हणून मिळाला होता. ज्या जोशीबुवा ज्योतिषाला मी त्यावेळी दक्षिण दिली होती. त्यानंतर तो ज्योतिषी अनेक ठगांशी संपर्क साधून पैसे मिळवीत असे. त्याला मी भेटलो. त्याने एका ठगांच्या टोळीचा प्रमुख कुणी रामदिन म्हणून होता. त्याचा पत्ता दिला. त्याचे जवळ वीस एक ठग होते व तो नर्मदा नदीच्या काठी एका जंगलात राहत असे.

त्या जमादार रामदिनकडे मी गेलो. त्याला माझी ओळख सांगितली. तात्काळ रामदिनने  माझे अत्यंत प्रेमाने व थाटाने स्वागत केले, एवढेच  नाही तर त्याच्या टोळीत त्याने स्वतः इतका मला दर्जा दिला. त्याचा समारंभ त्याने केला. मी फिरून गूळ प्रसाद खाल्ला व रुमाल हाती  घेतला.

आम्ही बातम्या मोहिमांना प्रारंभ केला. आता आम्ही ब्रिटिशांच्या प्रदेशात फिरायचे नाही असे ठरवून टाकले होते आणि शिंद्याच्या राज्यात फिरत राहिलो. बऱ्हाणपूर, ओंकार मांधाता उज्जैन इकडे यात्रेकरू पुष्कळ भेटले. अनेकांची आम्ही पूर्वीप्रमाणे शिकार केली.

तेथून आम्ही मोगलाईत निझामाच्या राज्यात उतरलो. आणि तेथे एकेठिकाणी माझी आणि गणेश जमादाराची गाठ पडली. या गणेशाने माझ्या आईला मारले. मलाही मारण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्याचा अत्यंत तिरस्कार करीत होतो. त्याचा सूड घेण्याची वाट पाहत होतो. माझी ही सुडाची इच्छा मी वर दाखवीत नसे. पण ती तृप्त झाल्याशिवाय मला चैन पडणार नव्हते.

आम्ही रेवा, सागर याच्या आसपास बरेच पराक्रम गाजवले. मला अजून वाटत होतं की कुठेतरी माझ्या मुलीचा पत्ता लागेल व ती तिला काही हजार रुपयांची भेट देईन.

मला पकडून देण्यासाठी इंग्रज सरकारने पाच हजार रुपयाचे बक्षिस लावले होते, म्हणजे मी केवढा प्रसिद्ध झालो होतो. माझं नाव ऐकताच लोक चळचळा भीतीने कापत असत. मृत्यू, अज्ञातवास कारावास या सर्वांमधून सुटून मी ठगांचा एक महान पुढारी बनलो होतो. माझे नाव हिंदुस्थानात गाजत होते.

सबस्क्राईब करा

* indicates required