गुहेत अडकलेल्या मुलांच्या बचावकार्यात मराठी माणसाचं मोलाचं योगदान!! वाचा कशी राबवली बचाव मोहिम

थायलंडच्या थाम लुआंग गुहेत तब्बल 17 दिवसांपासुन अडकून पडलेल्या 12 मुलांना आणि त्यांच्या प्रशिक्षकाला गुहेतून बाहेर काढण्यात अखेर यश आलं मंडळी. पण जवळपास 7 किलोमीटर्स लांब असणार्‍या या निमुळत्या गुहेत भरलेलं पाणी हे या बचावकार्यातली एक जिवघेणी अडचण होती. हे पाणी बाहेर उपसण्याठी भारताच्या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीनं सहाय्य केलं. कंपनीच्या या बचाव पथकात मिरजेच्या प्रसाद कुलकर्णी या अभियंत्याचा समावेश होता. या तंत्रज्ञांनी फ्लड पंप्सच्या सहाय्याने गुहेतलं पाणी बाहेर खेचून गुहेचा मार्ग मोकळा केला. या मोठ्या बचावकार्यात एका भारतीयाने लावलेला हा हातभार निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे मंडळी. 

 

पाहूया थायलंडच्या या थाम लुआंग गुहेतलं हे बचावकार्य कशा पध्दतीने राबवलं गेलं.... 

23 जून : 11 ते 16 वर्षे वयोगटातील 12 खेळाडू आपल्या फुटबॉल कोच सोबत थाम लुआंग गुहेत पर्यटनासाठी गेले. त्याचवेळी जोरदास पाऊस झाल्यामुळे गुहेत पाणी शिरलं. गुहेचं छतही कोसळलं. त्यामुळे सगळेच गुहेच्या आतील भागात अडकले. त्याच रात्री मुलांच्या नातेवाईकांनी मुलं बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 

24 जून : स्थानिक प्रशासन, पोलीस, आणि बचाव पथकांनी बेपत्ता मुलांचा शोध सुरू केला. गुहेच्या बाहेर मुलांच्या सायकल्स सापडल्या.

25 जून : शोध मोहीमेला गती देत मुलं गेलेला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

26 जून : थायलंडच्या नौसेनेचे सदस्य बचाव कार्यात सहभागी झाले. गृहमंत्र्यांनी गुहेच्या मार्गात पाणी भरल्याचं सांगितलं.

27 जून : जोरदार पावसामुळं बचाव मोहिमेत अडचणी. अमेरिकन सेना, ब्रिटनचे गुहा विशेषज्ञ आणि गुहांबद्दल अभ्यास असणारे आणखी काही लोक या बचाव मोहीमेत सहभागी झाले.

28 जून : डोंगराच्या बाहेर छेद करून गुहेतलं पाणी बाहेर खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला. गुहेच्या अन्य प्रवेशमार्गांचाही शोध घेण्यात आला.

29 जून : खुद्द थायलंडचे प्रधानमंत्री प्रयुत चान - ओचा गुहेजवळ पोहोचले आणि मुलांच्या नातेवाईकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला.

30 जून : बेपत्ता मुलांची जागा शोधण्याचा प्रयत्न परत सुरू झाला. अॉस्ट्रेलीया, चीन आणि इतर देशांमधूनही विशेषज्ञ बचाव कार्यात सहभागी झाले.

1 जुलै : बचाव कार्यातल्या काही व्यक्तींना गुहेच्या आत पुढे जाण्यात यश आलं.

2 जुलै : गुहांची माहिती असणार्‍या दोन ब्रिटीश तज्ञांना मुलं अडकलेलं ठिकाणं शोधण्यात यश आलं. मुलांसोबत बोलतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला.

3 जुलै : व्हिडीओ सार्वजनीक करण्यात आला. मुलं एकमेकांशी बोलताना दिसत होती.

4 जुलै : नौसेनेचे 7 सदस्य आणि एका डॉक्टरने मुलांपर्यंत जेवण आणि औषधं पोहचवण्याचं अभियान राबवलं. मुलांना बाहेर काढण्याच्या विविध विकल्पांवर चर्चा करण्यात आली.

5 जुलै : मुलांना डायव्हिंग बद्दल माहिती देण्यात आली. त्याबरोबर पाणी उपसण्याचा वेग वाढवला गेला.

6 जुलै : अॉक्सिजनच्या कमतरतेमुळं बचाव पथकातील नौसेनेच्या माजी सदस्याचा दुर्दैवी मृत्यू. गुहेतल्या कमी होणार्‍या अॉक्सिजनचा धोका लक्षात घेऊन मुलांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे तज्ञांचे संकेत.

7 जुलै : पावसाच्या शक्यतेमुळे पुढच्या काही दिवसात मुलांना बाहेर काढण्याचा सल्ला तज्ञांनी दिला.

8 जुलै : बचाव अभियान सुरू करण्याचा तज्ञांचा निर्णय. स्कुबा डायव्हर्सनी 4 मुलांना बाहेर काढलं.

9 जुलै : बचाव अभियानाच्या दुसर्‍या दिवशी आणखी चार मुलांना बाहेर काढण्यात आलं.

10 जुलै : बचाव मोहिमेच्या शेवटच्या दिवशी स्कुबा डायव्हर्सनी उरलेल्या 4 मुलांसोबत त्यांच्या प्रशिक्षकाला सुरक्षितरित्या बाहेर काढलं. आणि दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेलं हे बचावकार्य  यशस्वीरीत्या पुर्ण झालं.

सबस्क्राईब करा

* indicates required