चोर चोरी करत असताना त्याच्याच ट्रकची चोरी होते तेव्हा..

मंडळी, चोराच्या घरी चोरी झाली असे कधी ऐकले आहे का?
चोराच्या घरी सहसा चोरी होत नाही, पण कधी कधी चोराला पण असा अनुभव येतोच की राव!! काही घटना अशा घडतात की तुम्हाला कर्मावर विश्वास बसायला लागतो.
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये एक असाच किस्सा घडला. तिथल्या पोलिसांना एक ट्रक चोरी झाल्याची तक्रार आली. त्या ट्रकचा मालक विल्यम केलीने पोलिसांना फोन करून सांगितले की त्याचा पिक-अप ट्रक चोरीला गेला आहे. हा शहाणा म्हणे त्याच्या ट्रकमध्येच चावी विसरुन गेला होता. मग काय, चोरांना आयती संधी मिळाली व त्यांनी ट्रक चोरुन नेला.
इथपर्यंत सगळं ठीकठाक होतं. चोरी होणे यात काही नविन नाही. पण खरा ट्विस्ट नंतर सुरु झाला.. पोलिसांनी जेव्हा विल्यमच्या ट्रकचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. विल्यम त्याच्या ट्रकमध्ये चावी विसरला होता कारण तो घाईघाईत एका दुकानात चोरी करायला गेला होता. आणि गडी तिकडे चोरी करत असताना इकडे त्याचा ट्रक गायब झाला. बिचाऱ्या विल्यमने विचार केला असेल ट्रक परत मिळेल आणि चोर जेलमध्ये जाईल. पण कसलं काय? उलट पोलिसांनी त्यालाच आत टाकले.
मंडळी, हा असा प्रसंग आहे की इथे हसावे की त्या बिचाऱ्याच्या परिस्थितीची कीव करावी कळत नाही. पण पोलिसांनी त्यांचे कर्तव्य बजावले राव!! कदाचित काही दिवसांनी विल्यमचा ट्रक चोरणारे सापडतील, विल्यम शिक्षा भोगून परत येईल आणि त्याचा ट्रकही परत मिळेल. पण त्याला आता चांगलीच अद्दल घडलेली असेल. तुम्हांला काय वाटतं?
लेखक : वैभव पाटील