एकाचवेळी हजारो पक्षांचा जीव का जातोय? हा कोणता रोग आहे? त्याने माणसाच्या जीवाला धोका आहे का?

कोरोनाने संपूर्ण मानवजातीला जेरीस आणले आहे. लॉकडाऊनच्या काळात किमान पर्यावरणाची तरी झालेली झीज भरून निघत असल्याबद्दल थोडा फार दिलासा वाटत होता. पण, या नव्या वर्षात एक नवीच आपत्ती उभी ठाकली आहे. गेल्या आठवडा भरात भारतातील स्थलांतरित पक्षी अचानक मरून पडत आहेत. हिमाचल प्रदेश मध्ये तर गेल्या चार दिवसांत १७७३ स्थलांतरीत पक्षी मृतावस्थेत आढळले. हिमाचल प्रदेशमधील कांगरा जिल्ह्यातील पोंग धरण परिसरात हे पक्षी मृतावस्थेत आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात हे पक्षी मृतावस्थेत आढळल्याने वनअधिकाऱ्यांनाही मोठाच धक्का बसला आहे. या मृत पक्षांच्या मृत्युमागाचे नेमके कारण शोधण्यासाठी या पक्षांचे नमुने गोळा करून त्याची पडताळणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.
२९ डिसेंबर रोजी मझार, बाथरी, सिहाल, जग्नोली, छट्टा, धामेटा आणि कुथेरा या परिसरात जवळपास ४२१ मृतपक्षी आढळले. यानंतर या मृतपक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कांगरा जिल्ह्याच्या उपायुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी राकेश कुमार प्रजापती यांनी या परिसरात अलर्ट घोषित केला आहे. प्राण्यांच्या वावरावरही बंधने आणली आहेत.
या मृत पक्षांच्या पडताळणी नंतर त्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने याची अधिकृत पुष्टी केल्याची माहिती हिमाचल प्रदेशच्या मुख्य वनरक्षक अर्चना शर्मा यांनी दिली. भोपाळ मधील राष्ट्रीय उच्च सरंक्षण प्राणी रोग संस्थेचा अहवाल अद्याप यायचा असून, प्रशासन त्यांच्या अहवालाचीही वाट पाहत असल्याचे त्या म्हणाल्या. या मृत पक्षांमध्ये डोक्यावर पट्टे असणाऱ्या हंसांची संख्या जास्त आहे. या भागातील पर्यटनावरही बंदी घालण्यात आली आहे.
कांगरा जिल्ह्यातील फतेहपुर, देहरा, जावली, आणि इंदोरा या भागात पोल्ट्रीतील पक्षाच्या खरेदीविक्रीवरही बंदी घातली आहे. बर्ड फ्ल्यू हा आजार H5N8 या विषाणूंमुळे होतो. तज्ञांच्या मते पक्षातून माणसामध्ये याचे संक्रमण होत नाही, पण पक्षांसाठी मात्र हा आजार फारच जीवघेणा आहे. यापासून मानवाला फारसा धोका नाही. परंतु या विषाणूने जर स्वतःमध्ये काही नवीन बदल केले तर मात्र मोठ्या प्रमाणावर संक्रमण पसरू शकते.
हिमाचल प्रदेशच्या आधीही राजस्थान, केरळ आणि मध्यप्रदेश मध्ये असे स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळले होते. राजस्थान मध्ये सोमवारी १७० मृतपक्षी आढळले होते. राजस्थान मध्ये एकूण ४२५ पक्षी मृत झाले आहेत. फक्त झलवार जिल्ह्यातील पक्षांची पडताळणी केल्यानंतर त्यांच्यातही बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बाकीच्या जिल्ह्यातील पक्षांचे तपासणी अहवाल अजून यायचे आहेत.
केरळ मध्ये तर १२,००० बदकांचा बळी गेला आहे. यातील आठ पक्ष्यांचे मृतदेह तपासणीसाठी भोपाळला पाठवले होते. त्यातील पाच बदकांना तरी बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. केरळमध्येही अलर्ट जारी केला आहे.
मध्यप्रदेश मध्ये कावळ्यांना याची लागण झाली आहे. यामध्ये २३ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान ३७६ कावळ्यांचे बळी गेले आहेत.
देशातील चार राज्यांत तरी पक्षांचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारे अचानक मृत्यू पाहून प्राणी सरंक्षण मंत्रालयाने सर्वत्रच सतर्कतेचे इशारे दिले आहेत. काही राज्यांत पोल्ट्रीतील चिकन, अंडी, मांस-मटन, मासे आणि तत्सम पदार्थ विकण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
सध्या तरी माणसांना याचा फारसा धोका नसला तरी, मांसाहार वर्ज्य करणेच योग्य ठरेल. पक्ष्यामध्ये मात्र याचे संक्रमण वेगाने वाढत आहे. आलेले नववर्ष आशादायी ठरेल अशी सर्वानांच अपेक्षा आहे, मात्र या नववर्षात एका नव्या संकटाचे संकेत मिळत आहेत की काय अशी शंका घेण्यास वाव आहे.