computer

तिहार : वाचा नेपाळच्या दिवाळी बद्दल !!

राव,  दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आलीय.  आता दिवाळीबद्दल आम्ही वेगळं काय सांगणार?  पण आज आम्ही तुम्हाला एका आगळ्यावेगळ्या सणाबद्दल माहिती देणार आहोत. हा सण आहे तर दिवाळी सारखाच,  पण थोऽडासा हटके आहे. याला तुम्ही नेपाळची दिवाळी म्हणू शकता. नेपाळमधल्या दिवाळीला ‘तिहार’ म्हणतात. दिवाळीप्रमाणे हा सणही पाच दिवस चालतो.  पण राव,  ‘तिहार जेल’चा आणि याचा काहीही संबंध नाही बरं का!!! 

आपल्या इकडच्या दिवाळीपासूनच तिहारची सुरुवात होते. ५ दिवस वेगवेगळ्या परंपरांनी तिहार साजरा केला जातो आणि हीच याची खासियत आहे. आपण एक नजर टाकूया कशा पद्धतीने हा तिहार साजरा होतो.

१. काग तिहार

नेपाळमध्ये असं मानलं जातं की कावळे हे देव आणि माणसामधील दूत आहेत. म्हणून सणाच्या पहिल्या दिवशी त्यांना प्रसाद आणि नैवेद्य दिला जातो. असाही एक समज आहे की कावळ्याचं ‘काव काव’ करणं हे अशुभ असतं,  त्याने ओरडून काही अशुभ वार्ता आणू नये..  म्हणून घरावर कावळ्यासाठी खाण्याचे पदार्थ ठेवले जातात.

२. कुकुर तिहार

कुकुअर म्हणजे कुत्राच की हो..  कुत्रा हा प्राणी त्याच्या मैत्रीसाठी आणि इमानदारीसाठी प्रसिद्ध आहे.  त्याच्या याच गुणधर्मासाठी ‘कुकुर तुहार’ म्हणून तिहारचा दुसरा दिवस साजरा केला जातो. या दिवशी कुत्र्याची पूजा केली जाते, त्याला विविध पदार्थ वाढले जातात.

हिंदू पुराणांतसुद्धा कुत्र्याला विशेष स्थान आहे. कुत्र्याला भैरवाच्या वाहनाच्या रुपात बघितलं जातं. असं म्हणतात की मृत्युदेवता ‘यम’ चे चार डोळ्यांचे दोन कुत्रे नरकाच्या दारावर पहारा देत असतात.  म्हणून या दिवसाला ‘नरक चतुर्दशी’ असंही म्हणतात.

३. गाय तिहार / लक्ष्मीपूजन

या दिवशी लक्ष्मी पूजनाबरोबर गाईचीही पूजा केली जाते म्हणून तिसऱ्या दिवसाला ‘गाय तिहार’ म्हटलं जातं. गाईचं महत्व जाणून या दिवशी गाईची पूजा केली जाते. संध्याकाळी लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम होतो.

४. गोवर्धन पूजा

या दिवसाला गोरु तिहार किंवा गोरु पूजा असंही म्हटलं जातं. या दिवशी गोवर्धन पर्वताचं रूपक म्हणून शेणाच्या गोवऱ्यांची पूजा केली जाते.

नेपाळ मधील ‘नेवार’ समुदायात या दिवशी महापूजा केली जाते. नेपाळमध्ये हा दिवस आणखी एका कारणाने खास असतो. तो म्हणजे या दिवसापासून नेपाळच्या नव्या वर्षास सुरुवात होते.

५. भाई टिका

हा दिवस आपल्या इकडच्या ‘भाऊबीज’ सारखा साजरा केला जातो. असं म्हणतात की, या दिवशी यमराज हा आपली बहिण यमी हिला भेटायला येतो. बहिणीकडून ओवाळणी आणि तिलक (टिळा) लावून घेतल्यानंतर या दिवशी कोणाचाही मृत्यू होत नाही. 

मंडळी दिवाळी एकच, पण त्याला साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी. अशीच एक वेगळी परंपरा म्हणजे ‘तिहार’.

सबस्क्राईब करा

* indicates required