मध्यप्रदेशची आदिवासी मुलगी व्होग मासिकाच्या कव्हरवर झळकली? तिने अशी नक्की काय कामगिरी केली आहे?

फॅशनच्या जगात व्होग (Vogue) मासिकात प्रसिद्धी मिळणे हे खूप प्रतिष्ठेचे समजले जाते. प्रसिद्ध कलाकारांच्या फोटो बरोबरच जगभरातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर यांचे काम या मासिकामध्ये प्रसिद्ध होत असते. नुकतेच व्होगच्या २९ मार्चच्या इटली डिजिटल आवृत्तीत मध्यप्रदेशच्या आदिवासी समाजातील सीता वासुनीया हिचा फोटो झळकला होता. सीता स्वतःच्या हाताने छापलेली एक नाजूक महेश्वर हँडलूम साडी नेसलेली दिसत आहे. या फोटोने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. पण कोण आहे ही सीता वासुनीया? आजच्या लेखातून जाणून घेऊ या !!
सीता वासुनिया ही मध्यप्रदेशातील धार येथे राहते. तिने कपड्यांवर छपाई करणाच्या एक विशिष्ट पद्धतीत कौशल्य मिळवले आहे. या कलेला 'धारा कला प्रिंट' म्हणतात. सीता आणि आणखी १० आदिवासी महिला यांच्या बचतगटातून हे काम केले जाते. साड्यांवर लाकडी छपाईच्या माध्यमाने कलाकुसर करणे, त्याचे प्रशिक्षण देणे ही कामे केली जातात. साड्यांवर विविध प्रकारचे बुटिक, थ्रेडवर्क आणि हाताने नक्षीकाम देखील इथे केली जाते. या बचत गटात साडी, सलवार सूट, दुपट्टे, कुर्ता, जॅकेट अशा विविध प्रकारच्या कपड्यांवर कलाकुसर केली जाते आणि हे कपडे बाजारपेठेत विकले जातात. सध्या बाजारपेठेत हस्तमुद्रित साड्यांना खूप मागणी आहे. सीता आणि तिच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या कपड्यांना दिल्ली आणि मुंबईतील ब्रँडकडून मोठी मागणी आहे.
व्होग मासिकासाठी मॉडेलिंग करण्यासाठी त्यांना अदिती गुप्ता या फोटोग्राफरने सुचवले. अदितीला साड्यांमध्ये महिलांचा फोटोशूट कॅटलॉग बनवायचा होता. राणी रूपमती महाल या परिसरातील जुन्या स्मारकाच्या भिंतींजवळ या महिलांनी मेकअप न करता साड्या नेसून फोटो काढले. कोणी मॉडेल शोधण्यापेक्षा ज्या महिलांनी साड्या बनवल्या आहेत त्यांनाच त्या नेसायला लावून फोटोशूट करण्यात आले. फोटोत फिल्टरही वापरण्यात आले नाहीत.
व्होग मासिकात प्रसिद्ध झाल्यावर सीताला अजून ऑफर्स आल्या आहेत. इतर महिलांनाही चांगले पैसे मिळू लागले आहेत. धारचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सलोनी सिडाना म्हणतात की “सीता वासुनियाने एक मोठी कामगिरी केली आहे. या दिशेने सीतासारख्या महिलांना अधिकाधिक रोजगार मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन आता प्रयत्न करेल. ”
फॅशन म्हणजे फक्त महागडे कपड्यांचे ब्रँड, ते परिधान करणाऱ्या मॉडेल आणि त्यांच्यावर होणारा हजारो रुपयांचा मेकअप हे सीता आणि त्यांच्या बचतगटाच्या महिलांनी साफ खोटे ठरवले. सीता यांच्या कलेचे आणि फोटोचे सगळीकडे खूप कौतुक झाले. फक्त मध्यप्रदेश नाही तर पूर्ण भारताला सीता आणि त्यांच्या बचतगटाने केलेल्या कामाचा अभिमान आहे. यामुळे लहान-लहान गावात काम करणाऱ्या अनेक महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रेरणा मिळेल हे नक्की.