computer

मनी हाईस्टसारखी चोरी करत ७.४ कोटी डॉलर्स लंपास करणारे चोरटे आपल्याच सापळ्यात असे अडकले!!

नेटफ्लिक्स वरील मनी हाइस्ट ही वेबसिरीज तुम्ही पाहिली आहे का? नसेल पाहिली तर हरकत नाही, पण एवढी मोठी रक्कम लुटण्याचा खरा प्लान कसा आखला गेला, तो कसा अंमलात आणला गेला, पोलिसांना या दरोडेखोरांनी कसा गुंगारा दिला आणि या सगळ्यांमागचा खरा सूत्रधार कोण होता, त्याचे पुढे काय झाले हे जाणून घेणे नक्कीच थरारक ठरेल. मात्र या मनी हाईस्टसारखीच मायामी लुटीची गोष्ट वाचली आहे का? मायामीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ७.४ कोटी डॉलर रुपयांची लूट करणारे हे लुटारू कदाचित कुप्रसिद्ध दरोडेखोर असतील असे कुणालाही वाटणे स्वाभाविक आहे, पण खरी गोष्ट तर हीच आहे की यांपैकी एकाही लुटारूच्या नावावर कसलेच क्रिमिनल रेकॉर्ड नव्हते. तरीही त्यांना ही विनाशकाले विपरीत बुद्धी का सुचली असेल? जाणून घेऊया या लेखातून.

या दरोड्यातील मास्टर माइंड असलेला कार्ल्स मॅनझन आणि त्याच्या पत्नीला बरीच वर्षे अपत्य नव्हते. आपत्यप्राप्तीसाठी त्यांनी सांगेल ते सगळे उपाय केले. दिवस गेले तरी बाळाची वाढ पूर्ण होण्याआधीच गर्भपात होत असे, या सगळ्या परिस्थितीला कंटाळून त्यांनी एक मूल दत्तक घेण्याचे ठरवले. मूल दत्तक घेण्याची प्रक्रियाही तितकी सोपी नव्हती, त्यासाठीही भरपूर पैसा लागणार होता. कार्ल्स तसा साधेसरळ जीवन जगणारा एक सामान्य मनुष्य, तो कसेबसे घर चालवण्या पुरते पैसे कमवत होता. मुल दत्तक घेण्याची त्याची ऐपत नव्हती. ही गोष्ट त्याला नेहमी टोचत असते हे त्याचा एका मित्राला ठाऊक होते. या मित्राचे नाव होते ओनेलिओ डियाझ.

डियाझ मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. जर्मनीच्या कॉमर्स बँकेतून मायामीच्या फेडरल रिझर्व्ह बँकेत मोठी रक्कम पाठवली जात असे आणि फ्रांकफुर्टहून ही रक्कम घेऊन येणारी विमाने मायामीच्या विमानतळावर उतरत असत. कर भरणा वगैरेसारखा सोपस्कार पूर्ण करेपर्यंत काही काळ विमानतळावरील गोदामात ही रक्कम साठवली जात असे. विशेष बाब म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेची वाहतुक करताना पुरेशी काळजीही घेतली जात नाही, हेही त्याच्या ध्यानात आले होते. एवढ्या मोठ्या रकमेतून थोडीसी रक्कम लंपास करता आली तर आपले आयुष्य किती सुखात जाईल, ही कल्पना कोणाच्याही मनाला भुरळ घालू शकते आणि वेळीच मनाला लगाम नाही लावला तर? तर तेच होते जे कार्ल्स मॅनझन आणि त्याच्या मित्रांच्या बाबतीत झाले. पण शेवटी तेल ही गेले तूपही गले, हाती राहिले धुपाटणे म्हणत फक्त पश्चातापाशिवाय हाती काहीही उरत नाही.

स्वतः डियाझ तर ही चोरी करू शकत नव्हता. कारण आपल्याच सहकाऱ्यांना कसे फसवायचे असा एक सात्विक प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला म्हणून यासाठी त्याने कार्ल्सला तयार केले. टीव्हीवरील क्राईम सिरियल्स पाहून पाहून कार्ल्सला चोरी कशी करतात आणि त्याचे पुरावे कसे नष्ट करायचे याबाबतचा थेरोटिकल अभ्यास झालाच होता, आता फक्त प्रॅक्टिकल करण्याची संधी मिळण्याचा अवकाश होता. आधीच आपल्या कुटुंबाच्या चिंतेत गढलेल्या कार्ल्सला एक साधासोपा आणि झटपट पर्याय मिळाला आला होता.

मियामी विमानतळावर सुरक्षा रक्षक असलेल्या डियाझने त्याला या पैशाच्या वाहतुकीसंबधी सगळी माहिती दिलीच होती. स्वतः कार्ल्सनेही विमानतळाच्या आसपास असणाऱ्या हॉटेल्समध्ये तीन-चार वेळा राहून तिथल्या आजूबाजूच्या परिसराची चांगली माहिती करून घेतली होती. एकट्याने ही कामगिरी पार पाडणे कठीण होते म्हणून त्याने आपल्या या योजनेत काही मित्रांनाही सामील करून घेतले.

६ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांनी आपली ही योजना अंमलात आणली. पैसा चोरल्यानंतर विमानतळावरून निसटून जाण्यापर्यंत सगळी योजना तयार होती आणि यात त्याला मदत करण्यासाठी त्याचे काही मित्र आणि नातलगही त्याच्यासोबत होते. चोरीची रक्कम पळवून नेण्यासाठी त्यांनी पिकअप ट्रक तयार ठेवले होते. ज्या गोदामात हा पैसा ठेवला जाई त्या गोदामाला विशेष सुरक्षा रक्षक पुरवले नव्हते आणि गोदामात पुरेशी हवा खेळती राहत नाही म्हणून पैशांसोबत तैनात असणारे अधिकारी गोदामाचा दरवाजा सताड उघडा ठेवून बसलेले असत. त्यामुळे गोदामात प्रवेश करणे ही काही फार मोठी बाब नव्हती. ठरल्याप्रमाणे फ्रांकफुर्टहून पैसे घेऊन येणाऱ्या विमानाचे लँडिंग होताच डियाझने कार्ल्सला फोन केला. कार्ल पिकअप ट्रक घेऊन विमानतळावर पोहोचला. त्याचा मेव्हणा जेफ्री बोटराईट आणि त्याच्या बायकोचा मामा यांनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना धमक्या देऊन दांडगाई केली.

ते सर्वजण गोदामात शिरले. त्यांनी सोबत सहा गोण्या आणल्या होत्या. प्रत्येक त्यांनी गोणीत मावेल तितका पैसा भरला आणि ते पसार झाले. पुरावे कसे नष्ट केले जावेत याचा अभ्यास कार्ल्सने आधी केलाच होता त्यामुळे कित्येक महिने एफबीआयला याचा सुगावाच लागत नव्हता. आपल्याकडे अचानक खूप पैसा आला आहे, याची जराशीही कुणाला शंका आली तर आपल्यावर संशय घेतला जाऊ शकतो हे कार्ल्सने आपल्या मित्राना समजावून सांगितले होते. कुणीही कसलीही मोठी खरेदी करू नये अशा सूचनाही त्यांना दिल्या होत्या. सगळे जण कार्ल्सच्या सुचना पाळत होते, फक्त मेव्हणा जेफ्री सोडून. जेफ्री लगेचच बार, अंमलीपदार्थ, महागडी हॉटेल्स, महागड्या वस्तू यावर वाटेल तसा पैसा उधळू लागला. जेफ्रीच्या अशा वागण्याने कार्ल्स चिंतेत पडला होता. त्याला थोपवण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न करून पाहिले पण जेफ्रीवर कार्ल्सच्या बोलण्याचा धमकावण्याचा काहीच परिणाम होत नव्हता. जेफ्रीला अद्दल घडवण्यासाठी त्याने स्वतःच खंडणी देऊन त्याला कीडनॅप केले होते आणि त्याचा हाच डाव त्याच्या अंगी उलटला.

कित्येक महिने उलटून गेले तरी इकडे एफबीआयलाही काहीच धागेदोरे सापडत नव्हते. शेवटी चोरीची माहिती देणाऱ्यास एफबीआयने १.५ लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले. या बक्षिसाला भुलून कार्ल्सच्या एका मित्राने सगळ्या चोरांची माहिती एफबीआयला पुरवली. त्या मित्राने दिलेल्या माहितीवरून एफबीआयने सर्वांचे फोन टॅपिंग करायला सुरुवात केली.

१७ फेब्रुवारी २००६ रोजी सगळ्याचा भांडाफोड झाला. जेफ्रीला कार्ल्सनेच खंडणी दिलेल्या गुंडांनी कीडनॅप केले. मात्र यावेळी यात कार्ल्सचा काहीही हात नव्हता. त्याला सोडवण्यासाठी कीडनॅपर्सनी कार्ल्सकडून ५ लाख डॉलर्सची मागणी केली. पोलिसांनी कार्ल्सचा फोन टॅप केला होता. त्यांनी कीडनॅपर्स आणि कार्ल्सचे बोलणे ऐकले. कार्ल्सने जेफ्रीला सोडवण्यासाठी एवढी मोठी रक्कम देण्यास पूर्णत: नकार दिला होता. पण किडनॅपर्सना कार्ल्सच्या चोरीबाबत सगळी माहिती होती. या फोनवरून पोलिसांनी जेफ्रीचे लोकेशन शोधून काढले आणि मायामी विमानतळावरील चोरीची ही जेफ्रीने कबुली दिली. जेफ्रीपाठोपाठ कार्ल्स आणि त्याच्या पत्नीला आणि डियाझोलाही अटक झाली.

मार्च २००६ मध्ये या खटल्याचा निकाल लागला आणि सर्वांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. कार्ल्स मॅनझनला १७ वर्षांची शिक्षा झाली. कार्ल्स आता तुरुंगातून बाहेर आणि मियामी मध्येच ट्रक ड्रायव्हरचे काम करतो. त्याच्या बायकोला या सगळ्याची माहिती नव्हती म्हणून तिला कमी कालावधीची शिक्षा देऊन सोडण्यात आले. तिने आता दुसरे लग्न केले आणि तिला दोन मुलीही आहेत.

कार्ल्सच्या बाबतीत मात्र सगळेच होत्याचे नव्हते झाले. कसे का असेना त्याचे स्वतःचे घर होते, बायको होती, समाजात चांगली इज्जत होती, हे सगळे त्याच्या एका कृत्याने तो गमावून बसला. चोरी केलेल्या पैशातील सगळीच रक्कम काही पोलिसांच्या हाती लागली नाही, यातील अजूनही ६ कोटी डॉलर्सचा पोलीस शोध घेत आहेत.

तर मायामी हाइस्टची ही खरी कथा प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. मोहात गुरफटून केलेले गैरकृत्य कधीच सुखाचे जीवन देऊ शकत नाही. हाच धडा यातून मिळतो.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required