computer

जगातील सर्वांत उंच स्त्री हे भूषण नव्हे तर व्हिव्हर सिंड्रोम नावाचा आजार आहे- वाचा रुमेसा गॅलगीची कहाणी !

ज्या-ज्या जगावेगळ्या गोष्टी असतील त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होत असते. जगातली सर्वात बुटकी व्यक्ती, जगातील सर्वात जास्त आयुर्मान असणारी व्यक्ती, जास्त वजन असणारी तसेच अतिकमी वजन असणारी व्यक्ती, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला कुठल्याच गोष्टीचं वावडं नाहीये. यामुळे आशा व्यक्तींना सन्मानाने जगासमोर येण्याची संधी मिळते. अलीकडेच तुर्कीची रुमेसा गॅलगी नावाच्या एक चोवीस वर्षीय तरुणीचे नाव अशाच कारणाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालं आहे.

रुमेसा ही जगातील सर्वांत उंच स्त्री असल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने तिची दखल घेतली आहे. रुमेसा सध्या २१५.१६ सेमी म्हणजेच ७ फुट ७ इंच इतकी उंच आहे. सामान्यतः स्त्रियांची ऊंची ही सहा फुट किंवा त्यापेक्षा कमीच असते. मग रुमेसाच्या बाबतीत असे काय झाले की तिची ऊंची इतकी वाढली? याला कारणीभूत आहे तो रुमेसाला असणारा एक असाध्य आजार. या आजाराचे नाव आहे, व्हिव्हर सिंड्रोम. या सिंड्रोममुळेच तिची ऊंची झपाट्याने वाढत गेली. अतिशय दुर्मिळ आशा या आजारावर अजून तरी काही उपाय सापडलेला नाही.
रुमेसाच्या या अति ऊंचीमुळे तिला हालचाल करताना अडचणी येतात. एरवी ती व्हीलचेअर वरूनच फिरते. कधी कधी जवळच्या अंतरावर जायचे असेल तर वॉकरचा आधार घेते. लोकं जेव्हा तिच्याकडे पाहतात तेव्हा काहीशी हबकतात. तरीही रुमेसा म्हणते, की या जगात चांगल्या लोकांचीही काही कमी नाही.

रुमेसाला आपल्या या व्यंगामुळे सामान्य लोकांसारखे आयुष्य जगता येत नाही. तरीही त्याबद्दल ती कधी खंत करत बसत नाही. तिच्यामते, तुमच्यातील उणिवाच कधीकधी तुमचे सामर्थ्य बनतात. आपल्यातील उणिवांचा आपण कसा वापर करतो किंवा त्यांचा कसं स्वीकार करतो यावर हे अवलंबून आहे. रुमेसा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून व्हिव्हर सारख्या दुर्मिळ आजाराबाबत जागृती करण्याचेही काम करते.
रुमेसाला आपल्या कुटुंबिया समवेत वेळ घालवायला आवडते. तिला पोहायला आवडते, पोहण्यामुळे आपल्या मनावरील आणि शरीरावरील ताण हलका होतो असा तिचा अनुभव आहे. तिचे कुटुंबीय देखील तिचे हे छंद जोपासण्यासाठी मदत करतात. गिनिजने तिच्या उंचीची दखल घेऊन तिला जगातील सर्वात उंच महिलेचा किताब दिल्याबद्दल तिचे कुटुंबीय देखील खुश आहेत.

आणखी एक नोंद घेणीसारखी बाब म्हणजे जगातील सर्वात उंच स्त्री आणि जगातील सर्वात उंच पुरुष हे दोघेही एकाच देशातील आहेत. असा योगायोग गिनीजसाठी तरी अगदी दुर्मिळ आहे. सुलतान कोसेन हा जगातील सर्वात उंच पुरुष आहे, जो ८ फुट २.८ इंच उंच आहे.

यापूर्वी २००९ साली गिनीजसाठी असाच दुर्मिळ योगायोग घडून आला होता. त्याही वर्षी शी शुंग (७ फुट ८.९५ सेमी) आणि याओ डिफेन (७ फुट ७ सेमी) जगातील सर्वात उंच महिला आणि जगातील सर्वात उंच पुरुष, दोघेही चीनचे होते.

सर्वात उंच महिला किंवा पुरुष होण्याचा हा किताब लवकर बदलत नाही. तो बरीच वर्षे त्याच व्यक्तीच्या नावे राहतो. म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे संपादक, क्रेग ग्लेंडी यांनी रुमेसाचे अभिनंदन करत तिचे धाडस आणि तिच्या उत्साहाचे कौतूक केले आहे.

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही कमतरता आणि वैशिष्ट्य हे असतेच. आपल्यातील कमतरतेकडे पाहून आपण फक्त दुखीच राहणार असू तर त्यावर कधीच मात करू शकणार नाही. उलट कामतरतेच स्वीकार करून पुढे वाटचाल केली तर त्यातूनही काही नव्या मार्ग निश्चित गवसेल, रुमेसाचा हा संदेश आपणही लक्षात ठेवूया.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required