आयुष्यात कधीही कर्ज घ्यायचं असेल तर हे सिबिल म्हणजे काय ते समजून घ्या !!

आर्थिक गरज कुणाला नसते? आणि आर्थिक गरज पुरवण्यासाठी आपल्याला वित्तीय संस्थांकडे कर्ज मागण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. घर बांधण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, शिक्षणासाठी, वैयक्तिक कारणांसाठी कर्ज देणे आणि त्यावर व्याज आकारणी करणे हेच तर बँकांचे आणि फायनान्स कंपन्यांचे काम आहे! पण याचा अर्थ असा नव्हे की जो कर्ज मागेल त्याला कर्जपुरवठा केला जाईल… कुणाला कर्ज द्यायचे आणि कुणाला नाही, याचे काही ठराविक निकष ठरवलेले असतात. त्यातला पहिला आणि मुख्य निकष म्हणजे सिबील! 

काय आहे सिबील? याचा आणि तुमच्या आर्थिक प्रतिष्ठेचा काय संबंध आहे ? सिबील स्कोअर म्हणजे काय आणि हा कसा काढला जातो ? आज सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या लेखामधून…

स्रोत

CIBIL (Credit Information Beuro India Limited) ही एक संस्था आहे जी तुमच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून असते. 2000 साली या संस्थेची स्थापना झाली. सर्व बँकांकडून, पतसंस्थांकडून दर तिमाहीला आर्थिक माहिती गोळा करण्याचे, त्या माहितीचे विश्लेषण करण्याचे, आणि त्याचा अहवाल बनवण्याचे काम सिबीलचे आहे. जवळपास २४०० बँका, आर्थिक संस्था तसेच बँक नसलेल्या अन्य आर्थिक संस्था सिबिलच्या सदस्य आहेत. यांच्याकडून आलेली ५५ कोटी लोकांची माहिती सिबिलकडे जमा आहे. २०१६ साली ट्रान्स युनियन या कंपनीने सिबिल मधील ८२ टक्के भाग भांडवल खरेदी केले. आता सिबिलचे नाव ट्रान्स युनियन सिबिल असे आहे. तुमच्या कर्जाचा आणि त्या कर्जाच्या परतफेडीचा संपूर्ण इतिहास सिबीलकडे असतो. पूर्वी कुठले लोन तुम्ही घेतले होते का, त्याची व्यवस्थित परतफेड केली का, काही हप्ते चुकवून दंड भरावा लागला होता का, अनेक दिवस कर्ज थकीत ठेऊन नंतर त्याची सेटलमेंट केली होती का, या सर्व माहितीवरून तुमचा सिबील स्कोअर काढला जातो.

स्रोत

हा सिबील स्कोअर कमीत कमी 300 ते जास्तीत जास्त 900 या मर्यादेत असतो. जितका सिबील स्कोअर मोठा, तितके तुमचे आर्थिक व्यवहार चांगले, आणि तितकीच तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते असे समजले जाते. जेव्हा तुम्ही एखाद्या वित्तीय संस्थेकडे अर्जासाठी निवेदन करता, तेव्हा सर्वप्रथम तुमचा सिबील स्कोअर तपासला जातो. हा स्कोअर 750 पेक्षा कमी असेल तर बँका तुम्हाला कर्ज नाकारू शकतात, किंवा काही अपवादात्मक परिस्थितीत कर्ज दिलेच, तर त्यावर जास्त व्याजदराची आकारणी करू शकतात. म्हणजेच सिबील स्कोअर 750 ते 900 च्या आत राखणे हे उत्तम आर्थिक व्यवहार असल्याचे लक्षण मानता येईल. पण सिबील स्कोअर उत्तम असला तरी कर्ज नाकारण्याचा अधिकार बँका राखून ठेवतात हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. 

आता प्रश्न असा येतो की, आपला सिबील स्कोअर चांगला कसा राखायचा? तर पुढील काही गोष्टी अमलात आणल्या तर तुमचा स्कोअर निश्चितच उत्तम स्थितीत राहू शकतो. - 

स्रोत

1. आपल्या क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवा. विनाकारण क्रेडिट कार्डवर खरेदी करणे टाळा. जर वेळेवर परतफेड केली नाही तर तुमचे नाव सिबील रेकॉर्ड मध्ये जाऊ शकते. 

2. आपले जुने लोन अकाउंट तपासून बघा. कुठल्या अकाउंटवर परतफेड करणे अथवा चार्जेस भरणे शिल्लक असेल तर ते त्वरित भरून टाका. 

3. कर्जाचे हप्ते वेळेवर भरा. हप्त्याच्या ठरलेल्या दिवशी अकाउंटवर पैसे आहेत याची खात्री करत चला. एखादा हप्ता चुकला तर त्यावर दंड लागू शकतो आणि त्याचीही नोंद तुमच्या सिबील रेकॉर्ड मध्ये होते हे लक्षात ठेवा.

आपला क्रेडिट स्कोअर तुम्ही स्वतः www.cibil.com या वेबसाईट वर 550 रुपयांचे शुल्क भरून तपासू शकता.

सबस्क्राईब करा

* indicates required