computer

अखंड भारताचे प्रतिक असलेल्या भारतमातेच्या वाराणसीमधल्या मंदिराबद्दल तुम्हांला ठाऊक आहे?

वाराणसी म्हटल्यावर तुम्हाला पहिल्यांदा काय आठवतं? हिंदूंचे पवित्र धार्मिक स्थळ, विश्वेश्वर मंदिर, पवित्र गंगा नदी, इथले अनेक घाट आणि छोटी-छोटी मंदिरे. अगदी दररोज या शहराला हजारो नव्हे, लाखो भाविक भेट देत असतील. कुठल्याही काळात या शहरातील भक्तांची, पर्यटकांची गर्दी कमी होत नाही. हिंदू धर्मात तर या शहराला अनन्य साधारण महत्त्व आहेच, पण स्वातंत्र्य युद्धाच्या काळात या शहरात अखंड भारताची एक वेगळी प्रेरणा निर्माण झाली होती. जिथे हिंदू देवदेवतांची असंख्य छोटी छोटी मंदिरे आहेत, त्याच वाराणशी शहरात एक भारत माता मंदिरही आहे हे मात्र फार कमी लोकांना माहिती असेल.

भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लाखो लोकांनी जमेल त्या मार्गाने लढा दिला. कुणी अहिंसेच्या मार्गाने, तर कुणी संघर्षाच्या. पण प्रत्येकाच्या मनात भारत मातेची एक मूर्ती कोरली होती. "फोडा आणि राज्य करा" या ब्रिटिशांच्या कपटनीतीला भीक न घालता भारतीयांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले. या अखंड भारतात फक्त पाकिस्तान आणि भारत यांचाच समावेश नव्हता, तर यात भारतीय उपखंडातील आणखी दोन-तीन देशांचा समावेश होता. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांसाठी भारतमाता हीच त्यांची खरी देवता होती. आपल्या या देवतेप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम दाखवण्यासाठी त्यांनी भारत माता मंदिर उभारण्याचे ठरवले. स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते कन्हैयालाल माणेकलाल मुन्शी यांना पहिल्यांदा ही कल्पना सुचली. महात्मा गांधींनी त्यांच्या या कल्पनेचे समर्थन केले. वाराणसीच्या महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या परिसरात हे मंदिर उभारण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यापिठाचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसैनिक बाबू शिवप्रसाद गुप्ता यांनी विद्यापीठाच्या परिसरात मंदिर उभारण्याची तयारी दाखवली.

अतिशय अनोख्या अशा या मंदिरात तुम्हाला कुठल्याची देव-देवतेची मूर्ती आढळणार नाही. मग आहे काय या मंदिरात? या मंदिराच्या मध्यभागी आयताकृती खोबणीत भारतमातेचा संगमरवरी नकाशा स्थापण्यात आला आहे. हा नकाशा आजच्या भारताचा नाही, तर क्रांतिकारकांच्या स्वप्नातील अखंड भारताचा आहे. यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंकेचाही समावेश आहे. तेव्हाची अखंड भारताची कल्पना इतकी विस्तृत होती. या सगळ्यांचा मिळून भारत बनतो असे समजले जाई. या प्रदेशातील पर्वत, नद्या, पठार या सगळ्यांचे शिल्प या भारत मातेच्या नकाशात अंतर्भूत करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिनी हा नकाशा फुलांनी सजवला जातो. भारताच्या भोवताली पसरलेल्या समुद्राच्या जागी नदीचे पवित्र पाणी ओतले जाते. या नकाशाला एक विलोभनीय रुप प्राप्त होते.

१९१८ साली या मंदिराचे बांधकाम सुरु झाले आणि १९२४ साली ते पूर्ण झाले. १९३६ साली महात्मा गांधींच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त यांनी या उद्घाटनप्रसंगी गाण्यासाठी एक गीत लिहिले होते. ते गीत आज मंदिराच्या आतील एका भिंतीवर लावले आहे. देवी-देवतांच्या गदारोळात या मंदिरालाही तितकेच महत्त्व दिले जाते. वाराणसीला भेट देणारे भाविक, पर्यटक न चुकता या भारतमातेचे दर्शन करतात. यात परदेशी पर्यटकांचा सुद्धा समावेश असतो.

या मंदिराने नक्कीच अनेकांना स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याची प्रेरणा दिली. अखंड भारताचे विस्तृत स्वप्न किमान या मंदिराच्या रुपात तरी जिवंत आहे. आजही अनेकांना पाकिस्तानसह भारत अखंड जोडला जावा अशी भाबडी आशा आहे.

भारतीय अखंडत्वाचे आणि बंधुत्वाचे मूर्त स्वरुप पाहणासाठी एकदा या मंदिराला भेट द्यायलाच हवी.

भारत मातेला पहिल्यांदा चित्ररूप देणारे अबनिन्द्रनाथ टागोर होते तरी कोण ?? वाचा एका क्रांतिकारकाबद्दल !!

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required