computer

स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी !!

न्यूटन, आईन्स्टाईन यांच्यानंतर विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडण्याचा अथक प्रयत्न करणारा एक ‘ज्ञानेश्वर’ “स्टीफन हॉकिंग” १४ मार्च, २०१८ रोजी समाधिस्त झाला. भौतिक शास्त्रातील मौलिक संशोधन, कृष्णविवरांचा (black Holes) विशेष अभ्यास करणारा हा शास्त्रज्ञ तब्बल ५५ वर्ष दुर्धर रोगाशी सामना करत होता. अवकाश आणि विश्वनिर्मिती या विषयावर ‘A Brief History of Time’ या सुगम भाषेत लिहिलेल्या पुस्तकानंतर जगाला त्यांची ओळख पटली.

अशा या महान शास्त्रज्ञाचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने पाहूयात त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी.

१. स्टीफन हॉकिंग हे शाळेत हुशार नव्हते

स्टीफन हॉकिंग यांच्या सारखा तल्लख बुद्धीचा शास्त्रज्ञ शाळेत हुशार नव्हता यावर विश्वास ठेवणं तसं कठीण आहे. असं म्हणतात की ते शाळेत असताना त्यांचे मार्क्स वर्गात सर्वात कमी असायचे. म्हणजे जवळ जवळ ‘ढ’ म्हणता येईल असा हा विद्यार्थी होता. पण या विद्यार्थ्याचा ओढा हा विज्ञानाकडे जास्त असल्याने त्याच्या शिक्षकांना आणि त्याच्या घरच्यांना या मुलात असलेलं वेगळेपण दिसून आलं. त्याची या विषयातील गती पाहता त्याला शाळेत आईन्स्टाईन हे टोपणनाव देखील देण्यात आलं होतं.

२. ऑक्सफर्ड मधील शिक्षण

स्टीफन हॉकिंग यांना गणिताची आवड होती. त्यांना गणितातच पुढचं शिक्षण घ्यायचं होतं पण त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी कॉस्मोलॉजी हा विषय निवडला आणि यासाठी त्यांनी एक परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांनी बाजी मारत स्कॉलरशीप मिळवली. कॉस्मोलॉजी विषयात पदवी मिळाल्यानंतर ते विद्येचं माहेरघर असलेल्या ‘केम्ब्रिज’ विद्यापीठात गेले.

३. डॉक्टरेट

स्टीफन हॉकिंग यांनी एक प्रबंध लिहून ‘संपूर्ण विश्वाचाही एखाद्या ताऱ्याप्रमाणे अंत होऊ शकतो’ हे दाखवून दिलं. या संशोधनासाठी त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली. ‘सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम’ हा त्यांचा या विषयातील दुसरा प्रबंध. यासाठी त्यांना ‘ऍडम्स प्राईझ’ पुरस्कार मिळाला

४. वाढदिवस आणि आयुष्यभराच्या आजाराची बातमी

१९६२ साली त्यांना त्यांच्या रोगाचा पहिल्यांदा संकेत मिळाला. त्यांना अचानक त्रास सुरु झाला आणि डॉक्टरांनाही या रोगाबद्दल काहीच माहिती नव्हतं. ८ जानेवारी १९६३ साली त्यांच्या वाढदिवशीच त्यांना एक असाध्य रोग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या या रोगाचं नाव होतं “ अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस ”. या रोगात मेंदूच्या आतील न्यूरॉन्स काम करणं बंद करतात, स्नायुवारचे नियंत्रण संपून शरीर कमजोर होत जाते आणि पुढे संपूर्ण शरीरच पॅरलाइज होतं. या रोगाबद्दल समजल्यानंतर स्टीफन हॉकिंग हे जेमतेम २ वर्ष जगतील असं सांगण्यात आलं होतं.

५. शरीर साथ देत नसलं तरी काम थांबलं नाही.

हा रोग जसजसा बळावत गेला तसतसा त्यांच्या शरीरावरचा ताबा सुटला आणि त्यांना कायमचं व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. यावेळी त्यांना निराशेने घेरलं होतं. पण त्यांनी एकदा हॉस्पिटल मध्ये एका रोग्याला दुर्धर रोगाशी लढताना पहिलं आणि त्यांनासुद्धा प्रेरणा मिळाली. त्यांनी याच काळात आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताचा आधार घेऊन कृष्णविवाराकडे आपलं लक्ष वळवले. शरीरावरचा ताबा सुटत असताना त्यांनी या संशोधनातली अवघड गणिते केवळ आपल्या मनात सोडवली. याच आधारावर त्यांनी मांडलेल्या शोधातील किरणोत्सर्जनाला ‘हॉकिंग रेडियेशन’ हे नाव देण्यात आलं. पुढे जाऊन त्यांच्या व्हील चेअरलाच एक कम्पुटर जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून ते या कम्पुटरवर काम करू लागले.

६. आवाज सुद्धा गेला

शरीर पंगु झाल्यानंतरही त्यांच्यावरचं संकट काही संपलं नाही. त्यांना १९८५ साली न्युमोनिया झाला. यात त्यांच्या श्वास नलिकेला छिद्र पाडून शस्त्रक्रिया करण्यात आली. हा एकाच उपाय उरलेला असल्याने जोखीम पत्करून त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. पण न्युमोनिया जरी बरा झाला तरी त्यांचा आवाज कायमचा गेला. यानंतर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी त्यांच्या कम्पुटर मध्ये काही बदल करून कम्पुटरलाच एक आवाज मिळवून दिला आणि यामार्फत स्टीफन हॉकिंग पुन्हा एकदा बोलू लागले. या मशीन मध्ये फक्त अमेरिकन इंग्लिश भाषा फिट करण्यात आली होती.

७. लग्न

१९६३ मध्ये आजारपणाचा शोध लागल्यानंतर त्यांनी १९६५ साली जेन वाइल्ड यांच्याशी विवाह केला. त्यांना ३ मुलं झाली. पुढे १९९५ साली त्यांचा घटस्फोट होऊन ते वेगळे झाले. त्यांना नवीन आवाज देणारे डेव्हिड मेसन यांच्या पत्नी एलेन मेसन यांनी डेव्हिड यांना सोडून स्टीफन हॉकिंग यांच्याशी १९९५ च्या सप्टेंबर मध्ये विवाह केला. हा विवाह देखील २००६ मध्ये घटस्फोटाने संपुष्ठात आला.

८. पहिल्यांदा झिरो ग्रॅव्हिटी मध्ये

आपल्या व्हील चेअरला सोडून त्यांनी पहिल्यांदा झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव घेतला. हे वर्ष होतं २००७. ते ८ मिनिटे गुरुत्वाकर्षणरहीत वातावरणात तरंगत होते.

९. लहान मुलांसाठी पुस्तक

आपल्या मुलीच्या आधारे त्यांनी “George’s Secret Key to the Universe.” हे पुस्तक लिहिलं. लहान मुलांना अवकाश संशोधनात आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं.

१०. दि थियरी ऑफ एव्हरीथींग

स्टीफन हॉकिंग यांच्या आयुष्यातील उतार चढाव, त्याचं संशोधन, त्यांचं खाजगी आयुष्य आणि त्याचं व्यक्तिमत्व जाणून घ्यायचं असेल तर ‘दि थियरी ऑफ एव्हरीथींग’ हा चित्रपट नक्की बघा. या चित्रपटात स्टीफन यांच्या भूमिकेत असलेला ‘एडी रेडमायन’ या कलाकाराने स्टीफन हॉकिंग हा हुबेहूब उभा केला आहे. त्याच्या भूमिकेसाठी त्याला ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला.

 

पुस्तके, चित्रपट किंवा डॉक्युमेंट्री कमी पडतील एवढं काम स्टीफन हॉकिंग यांनी करून ठेवलं आहे. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांचं संशोधन मानवाला पुढील अनेक वर्ष उपयोगी पडत राहील. या थोर शास्त्रज्ञाला बोभाटा तर्फे भावपूर्ण आदरांजली.

सबस्क्राईब करा

* indicates required