computer

मोजक्याच लोकांनी सर केलेलं जगातलं अवघड शिखर ड्रोन कॅमेऱ्यामधून पाहाता येतं!!

ड्रोन कॅमेऱ्याने फोटोग्राफीला नवीन उंची मिळवून दिली आहे. ज्या ठिकाणी माणसाला पोहोचता येत नाही तिथे ड्रोन कॅमेरा सहज जाऊ शकतो. पूर्वी फक्त क्रेनने शक्य असलेला एरियल व्ह्यू ड्रोनने सहज शक्य होतो.

समजा ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून हिमालयात सफर करता आली तर? ही कल्पना सत्यात उतरली आहे.

हिमालय हा २४०० किलोमीटर जागेत पसरला आहे. हिमालयात लहानमोठ्या तब्बल १५००० हिमनद्या आहेत. बऱ्याच हिमनद्यांचा अजून शोध लागलेला नाही. डेव्हिड कसझ्लीकोव्स्की या नावाजलेल्या फोटोग्राफरने ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून हिमालयातील काही अज्ञात ठिकाणांना कॅमेऱ्यात कैद केलं आहे. 

डेव्हिड हा पुरस्कारप्राप्त फोटोग्राफर आहे. तो माऊंटन फोटोग्राफीमध्ये तज्ञ समजला जातो. तो सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच शिखरावर म्हणजे K2 वर K2 Touching the Sky नावाची डॉक्युमेंटरी तयार करतोय. माऊंट एव्हरेस्ट हे जगातले सर्वात उंच शिखर आणि K2 हे त्या खालोखाल उंचीचे आहे. पण चढाईच्या दृष्टीने K2 हे एव्हरेस्टपेक्षा कठीण आहे. विशेषतः हिवाळ्यात तर K2 वर चढाई करताच येत नाही. त्यामुळेच की काय डेव्हिडने या कामासाठी K2 ची निवड केली असावी. हा फोटो पाहा.

हा फोटो पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बाल्टोरो आणि गुडविन ऑस्टिन या हिमनद्यांच्या प्रदेशातील आहे. समोर जो पाण्याचा कुंड दिसतोय तो तब्बल ६५ फूट रुंद आहे. दोन हिमनद्यांच्या कुशीत असलेली ही जागा कोणत्यातरी सिनेमातल्या दृश्यासारखी वाटते.

डेव्हिडने सांगितल्याप्रमाणे इथला बर्फ वितळतो, पुन्हा तयार होतो, त्याचा आकारही बदलत राहतो, त्यामुळे फोटोत दिसणारं दृश्य पुढच्यावेळी कदाचित बदललेलं असेल. 

ड्रोनने फोटो घेतल्यानंतर डेव्हिड आणि गाईड्सच्या एका टीमने या जागेला भेट दिली. रात्रीच्या अंधारात ही जागा कशी दिसत होती पाहा.

हिमालय अशा अनेक आश्चर्यानी भरलेला आहे. फोटोग्राफर्सना तो नेहमीच आव्हान देत राहील.

सबस्क्राईब करा

* indicates required