५० वर्षांनंतरही अजूनही ना उलगडलेलं कोडं: बँकेला गंडा घालून ३०० मिलियन येन पळवणारा कोण होता?

एकही चूक नसलेला गुन्हा (परफेक्ट क्राईम) कधीच होऊ शकत नाही असे म्हणतात. पण आज आम्ही एका अशाच घटनेबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. हा गुन्हा घडलाय जपानमध्ये. आज या घटनेला ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय तरी हा गुन्हेगार सापडला नाही. आता तो कदाचित कधीच सापडणार नाही. तर काय घडलं होतं ते समजावून घ्यायला आपण जाऊया १९६८ सालाच्या जपानमध्ये.
डिसेंबर १०, १९६८ निहोन शिन्ताकू गिन्को बँकेचे मॅनेजर भरपूर चिंतेत होते. त्यांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना कुणीतरी धमकावत होते. त्यांच्या घरी एक पत्र आलं होत. पत्रात लिहिले होते की जर ३०० मिलियन येन मिळाले नाहीत तर मॅनेजर साहेबांचे घर उडवून देण्यात येईल. हे पत्र हाताने लिहिलं नव्हतं, तर पेपर आणि मासिकांमधून एक-एक अक्षर कापून ते तयार करण्यात आलं होते. अर्थातच पोलिसांना बोलावण्यात आलं. त्यांनी बँकेवर आणि मॅनेजरच्या घरावर पाळत ठेवायला सुरुवात केली.
जापनीज लोक हे शिस्तबध्द आणि कामसू म्हणून ओळखले जातात. जपानमध्ये काम कधीच थांबत नाही अशी ख्याती आहे. आपल्या बँकेतले कामंदेखील नेहमीप्रमाणे चालू होती. मॅनेजर साहेबांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घडणाऱ्या पूर्ण घटनांची माहिती दिली होती. रोजच्यासारखे काम चालू ठेवायचे होते. तोशिबा ही कंपनी आपल्या बँकेची एक क्लायंट होती. जापनीज प्रथेनुसार आज कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार होता आणि त्यासाठी रोकड येणार होती निहोन बॅंकेतून. बँकेच्या मॅनेजरने आपल्या ४ विश्वासू साथीदारांना ही रोकड घेऊन तोशिबामध्ये जायला सांगितलं. ते बँकेच्या गाडीमधून ही रोकड घेऊन निघाले.
ते चार लोक गाडीत बसून थोडंच अंतर गेले असतील की त्यांना पोलीस सायरन ऐकू येऊ लागला. ते एका जेलसमोर असताना त्यांना एक बाईकस्वर पोलीस दिसला. त्या बाईकस्वाराने कशीबशी आपली बाईक कारसमोर आणून थांबवली आणि तो बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबत बोलू लागला. "मॅनेजरचं घर बॉम्बने उडवलं आहे, काही लोक मेले आणि काही जखमी झाले आहेत. पोलीस संरक्षण असतानासुद्धा गुन्हेगाराला आपला प्लॅन पूर्ण करता आला आहे. अजून धोका पूर्ण टळला नाही आणि आता बँक पुढचं टार्गेट आहे. त्यात तुम्ही बँकेचे नाव असलेल्या गाडीतून जात आहात तर तुम्हाला अधिक जास्त धोका आहे. मला तुमची कार तपासू द्या." असं त्या बाईकस्वाराचं म्हणणं होतं.
कार तपासण्यासाठी तो बाईकवरून आलेला पोलीस गाडीखाली गेला. त्यानं काही करायच्या आधीच या चार बँक कर्मचाऱ्यांना गाडीतून धूर येताना दिसू लागला. तो पोलीस ऑफिसर गाडीखालून निघण्याचा प्रयत्न करत होता आणि बँकेचे कर्मचारी आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले. थोड्या अंतरावर त्यांना एक आडोसा सापडला. हा आडोसा होता जेलची भिंत. भिंतीआड लपून ते लोक बॉम्बस्फोटाची वाट पाहू लागले. काही वेळ वाट पाहिल्यानंतरही आवाज आला नाही. त्यांनी वाकून पाहण्याचा प्रयत्न केला, पण तेथे कोणताही पोलीस ऑफिसर नव्हता आणि कार पण गायब झाली होती.
पोलिसाने कार सेफ जागी पोहोचवली असेल असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी जवळचा फोन शोधून बँकेत फोन लावायचा ठरवलं. बँक मॅनेजरने फोन उचलला. मॅनेजर एकदम शांत होता. पलीकडून त्यांना मॅनेजरने कोणताही स्फोट झालेला नाही आणि त्यांचं घर व्यवस्थित आहे ही माहिती दिली. आणि या चार कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार व्यवस्थित समजला.
तो बाईकस्वार पोलीस नव्हता. त्याने हा प्रकार पूर्णपणे प्लॅन करून केला होता. कारमधून पळवलेली रक्कम होती ३०० मिलियन येन. त्यानं जे धमकीचे पत्र पाठवलं होते तेव्हढीच. जेव्हा त्याजागी तपासणी केली तर २०० पेक्षा जास्त पुरावे सापडले होते. त्यात एक वॉर्णींग फ्लेअर होती. जिचा वापर त्याने बॉम्बचा आभास निर्माण करण्यासाठी केला होता. बाकी सगळे पुरावे हे तपासाची दिशाभूल करणारे होते.
तपासात पोलिसांना कळलं की त्या चोराने कार जवळच्या एका पार्कपर्यंत नेली होती आणि तिथे कॅशचे बॉक्स एका वेगळ्या कारमध्ये ठेवले होते. ती दुसरी कार पण चोरीची होती. पण पुढे तो कुठे गेला हे कळलं नाही. पोलिसांनी त्या चोराचं एक चित्र पण सगळीकडे प्रसिद्ध केलं होते. पण तपासाला गती येत नव्हती. पोलिसांनी वारंवार टोकियो मध्ये असलेल्या बाईकवाल्या तरुण मुलांची चौकशी केली पण हाती काही लागलेच नाही. एका पोलीस अधिकाऱ्याच्या १९ वर्षीय मुलाला आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले होते, पण त्याने आत्महत्या केली. दुसरा एक आरोपी पकडण्यात आला होता पण पुढे तपासात तो परीक्षा देत होता हे निष्पन्न झालं.
(संशयित)
हा चोर एखादा पोलीस अधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या मुलगा असावा असा अंदाज लावला जातो. बँकेतील अंतर्गत माहिती त्याला कशी मिळाली हा प्रश्न सोडवला गेला नाही. अजून एक वदंता अशीही आहे की एका पावरबाज राजकारण्याच्या मुलाने हे घडवून आणलं होते. आपल्या वडिलांच्या कनेक्शनमुळे त्याला पैसा देशाबाहेर घेऊन जाणं शक्य झालं. आज घटनेला ५० पेक्षा अधिक वर्ष होऊन गेले आहेत. आता खरं तर या गुन्ह्यासाठी कुणाला शिक्षा पण होऊ शकत नाही. तरीही आजवर कुणीही या गुन्ह्याची कबुली द्यायला पुढं आलं नाही. एकूणच एखाद्या फिल्म प्लॉटसारखा ट्विस्ट असणारं हे कोडं अजूनही उलगडलं नाहीय.