computer

राजकीय इतिहासातल्या खळबळजनक घटना, तुम्हांला यांच्याबद्दल काय वाटतंय ?

महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेंनी केली की आणखी एक अज्ञात हात या कटाचा भाग होता? सरकारने किंवा पोलीसांनी काही पुरावे नष्ट केले? ही चर्चा आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचली आहे. १९४८ साली महात्मा गाधींची हत्या झाल्यावर जवळजवळ सत्तर वर्षांनंतर पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

या मागची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न केला तर असे आढळून येते की जगातल्या अनेक आवडत्या लाडक्या व्यक्तिंचा मॄत्यु अचानक झाल्यावर या मृत्युमागे काहीतरी काळेबेरे असल्याच्या चर्चा सुरु होतात. या चर्चा केवळ अफवा असतात असे नव्हे. प्रत्येक प्रकरणात काही प्रश्नांची उकल होत नाही. अनेक चौकशी आयोग नेमले जातात. संशयाला वाव देणारे अनेक प्रसंग या निमित्ताने जनतेच्या समोर येतात. काही दिवस चर्चा होतात आणि नाहीशा होतात.

अशाच काही खळबळजनक चर्चांचा आढावा आज आपण बोभाटात घेणार आहोत.  

१. महात्मा गांधी हत्या

महात्मा गांधी यांना नथुराम गोडसे याने मारले हे जगजाहीर आहे. नथुराम गोडसेने ३ गोळ्या झाडून महात्मा गांधीची हत्या केली. पण आता एक नवीन वाद तयार झाला आहे. तो म्हणजे म. गांधींना चौथी गोळी देखील लागली होती आणि ही ज्याने कोणी चालवली होती ती व्यक्ती अज्ञात आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी हत्येच्या मागील षड्यंत्राची नव्याने चौकशी व्हावी म्हणून याचिका दाखल केली आहे. अभिनव भारतचे ट्रस्टी ‘पंकज फडणीस’ यांनीसुद्धा हत्येची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या चौथ्या बुलेटसंबंधी काही पुरावे समोर येत आहेत, पण त्यावेळी नक्की काय झालेले हे अजूनही अज्ञात आहे.

२. राजीव गांधी हत्या

चेन्नईजवळच्या श्रीपेरम्बदूरमध्ये झालेल्या एका सुसाईड बॉम्बिंगमध्ये राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. १९९१ रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान श्रीपेरम्बदूरच्या सभेत हा प्रकार घडला. चौकशी आणि पुरावे गोळा केल्यानंतर ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ एलेम’ (LTTE) या संघटनेने ही हत्या घडवून आणली हे सिद्ध झालं..
आता वाद असा आहे की राजीव गांधी यांची हत्या ही त्याकाळातील लिट्टे (LTTE) या संघटनेनेच केली की याच्यामागे काही राजकीय षड्यंत्र होतं?

३. लाल बहादूर शास्त्री हत्या

आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू संशयास्पद आहे असं अनेकदा म्हटलं जातं. उझबेकिस्तानमधील ताश्कंदमध्ये शास्त्रींना हृदयविकाराचा झटका आला.  यातच ते मरण पावले. पण त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा आरोप केला. मृत्युनंतर शास्त्रींचे शरीर काळे-निळे झालेल्याचं त्यांनी सांगितलं जातं. हा संशय असूनसुद्धा त्यावेळी पोस्टमॉर्टमला सरकारने परवानगी दिली नाही. त्यामुळे पुरावे कधीच समोर येऊ शकले नाही.

ताश्कंदमधील हॉटेलच्या ज्या रूममध्ये शास्त्री होते, त्या रूममध्ये साधी टेलिफोन लाईन नव्हती आणि त्यामुळे त्यांना तीव्र झटका आलेला असताना देखील बाजूच्या खोलीपर्यंत चालत जावे लागले. पण तोपर्यंत त्यांना मृत्यूने गाठले होते.

भारतीय इतिहासात लाल बहादूर शास्त्री हे पहिले पंतप्रधान होते ज्यांचा मृत्यू देशाबाहेर झाला.

४. नागरवाला घोटाळा

 जेव्हा कोणाची तरी हत्या होते तेव्हाच काही संशयास्पद असतं असं नाही. नागरवाला घोटाळा प्रकार देखील असाच आहे. २४ मे, १९७१ साली ‘भारतीय स्टेट बँके’ला इंदिरा गांधी यांनी फोन करून ६० लाख रुपये मागितले. खुद्द पंतप्रधानांनी पैसे मागितले असल्याने कोणताही चेक बँकेत देण्यात आला नाही. या पैश्यांची रिसिट पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यास सांगितले गेले. 

नंतर माहित झाले की इंदिरा गांधी यांनी असा कोणताही फोन केला नव्हता. हा फोन करून पैसे उकळणारा माणूस होता ‘रुस्तम सोहराब नागरवाल’.  

नागरवालला अटक झाल्यानंतर चौकशी सुरु झाली. पण केस सुरु असतानाच नागरवालचा संशयास्पद मृत्यू झाला. यानंतर ही केस बदलायला सुरुवात झाली. बँक व्यवस्थापक व आणखी काही साक्षीदारांचा संशयास्पद मृत्यूने इंदिरा गांधी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर हा कट रचल्याचा आरोप झाला.
त्यावेळी नेमके काय घडलेले हे इतिहासाच्या कुपीत आजही बंद आहे.


मंडळी इतिहासात अशाकाही घटना घडतात, ज्याचा उलगडा कधीच होतं नाही. या चार घटना त्यापैकीच एक!!

वरील सर्व प्रकरणांमध्ये अनेक तर्क लावलेले गेले. 'अंदरकी बात', ' कट कारस्थान', 'परकीय शक्तींचा हात' अशा सर्व साधारण चर्चेपासून ' परग्रहावरून आलेली काही माणसे' अशा खूळचट कल्पनेपर्यंत शक्य तितक्या वावड्या उठल्या. डावे-उजवे, साम्यवादी-भांडवलशाही-सरकार-मिडीया-परकीय शक्ती-फ्री मेसन- इल्युमिन काहींणी असे सगळेच आरोपी असल्याचा दावा केला गेला. पण सत्य काय ते कोणालाच शोधता आले नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required