अमेरिकेच्या पोस्ट खात्यानं काढलं दिवाळीनिमित्त एक खास तिकिट!!
भारतात साजरा होणारा सर्वात मोठा हिंदू सण म्हणजे दिवाळी. हिंदूंचा सण असला तरी भारतातील विविध जाती धर्माचे लोक तितक्याच उत्साहाने दिवाळी साजरी करतात. दिवाळी जवळ येताच वेध लागतात ते म्हणजे पारंपरिक खरेदीचे , घराची साफसफाई इथं पासून ते दिवाळीला रांगोळी कोणती काढायची इथपर्यंत!!
या वर्षी दिवाळी यायच्याआधीच थेट परदेशातून एक भेट भारतीयांना-खरंतर अमेरिकेत राहणार्या भारतीयांना- मिळाली आहे. अशी भेट की जिच्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमानच वाटेल. युनायटेड स्टेट्सच्या डाक विभागानं एका नवीन पोस्ट तिकिटाचं अनावरण केलंय. आणि ते तिकीट आहे भारतात साजर्या होणाऱ्या दिवाळी ह्या सणाचं. आहे ना खुशखबर ?
युनायटेड स्टेट्सच्या डाक विभागाला दरवर्षी ४०००० हून अधिक सूचना पोस्ट तिकीटाच्या बाबतीत तेथील नागरिकांतर्फे करण्यात येतात आणि आश्चर्य म्हणजे अमेरिकेचं पोस्ट ऑफिस त्यातल्या काही सूचना अंमलातही आणतं. म्हणजेच त्यांच्याकडची Citizens’ Stamp Advisory Committee मिळालेल्या सूचनांपैकील २५ सूचनांवर विचार विनिमय करते व त्यानंतर पोस्ट मास्तर जनरल त्यावर शिक्कामोर्तब करतात.
यावर्षीच्या ५ ऑक्टोबरला या खास पोस्ट तिकीटाचं कायमस्वरूपी रूपात Consulate General of India, New York इथल्या ऑफिसात अनावरण करण्यात आलं. हे खास पोस्ट तिकिट म्हणजे खरंतर सोनेरी चमकीदार पार्श्वभूमीच्या पुढे पारंपरिक पणती असलेला एक फोटोग्राफ आहे. पारंपारिक पंजाबी ढोलांच्या गजरात या तिकिटाचं कसं अनावरण झालं हे वरच्या व्हिडिओत पाहायलाच हवं.




