computer

गांडूळखतातून कोट्यावधीची कमाई करणारी सना खान...तिची यशोगाथा आपल्यालाही प्रेरणा देईल !!

२०२० नंतर अनेक छोटेमोठे बिजनेस डबघाईला आले. अनेकांच्या समोर आर्थिक संकट उभे राहिले. पण या संकटातही घट्ट पाय रोवून उभी राहिली ही मेरठची मुलगी. आज ती गांडूळखतातून करोडो रुपयांची कमाई करत आहे. इंजिनिअरिंग पूर्ण करून एखाद्या मोठ्या कंपनीच्या पॅकेजच्या मागे न लागता ही तरुणी शेतात राहिली आणि गांडूळखत प्रकल्प तिने यशस्वी करून दाखवला. आज वाचूयात तिची प्रेरणादायी कहाणी..

उत्तर प्रदेश राज्यात मेरठ शहरातील सना खान असे त्या मुलीचे नाव आहे. ती एसजे ऑर्गेनिक्सची  (SJ Organics) मालकीण आहे. तिने आपल्या शेतात गांडूळखत प्रकल्प राबवला. रासायनिक खते आणि कीटकनाशके न वापरता गांडूळखत वापरल्याने पिकांना खूप फायदा झाला. हा प्रकल्प केला तर खूप शेतकऱ्यांना फायदा होईल आणि पिके वाढवायला त्याची मदतच होईल. तिला हे खूप लवकर लक्षात आले.

गांडूळखत म्हणजे गांडुळांच्या वापराने खत तयार करण्याची प्रक्रिया आहे. गांडुळे बायोमासचे (जैविक/ओला कचरा) सेवन करतात आणि ते worm casts च्या रुपात बाहेर टाकतात. ते बाहेर टाकलेले कम्पोस्ट मातीसाठी खूप पोषक असते. त्याला 'काळे सोने' असेही म्हणतात. गांडुळे साधारण तीन वर्षापर्यंत जगतात आणि खूप लवकर पुनरुत्पादन करतात. त्यामुळे ही प्रक्रिया बरीच स्वस्त आणि जास्त काळ टिकणारी असते. सेंद्रिय शेती करायची असेल तर गांडूळखत खूप महत्वाचे ठरते. गांडूळखत हे स्वच्छ, टिकाऊ आणि अजिबात कचरा न करता तयार होणारे खत मानले जाते. आणि या पद्धतीने शेती केल्यास येणारे पीक हे शरीरास जसे अपायकारक नसते तसेच मातीसाठीही अपायकारक नसते. सना यांना या खताचा इतका उपयोग आहे हे समजल्यावर सनाने पूर्ण प्रक्रिया शेतात राबवली व याचा प्रसारही केला. अनेक शेतकऱ्यांना ती याबाबत मार्गदर्शनही करते.

सनाने नेहमीच डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते परंतु प्रवेश न मिळाल्याने तिने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट म्हणून तिला गांडूळखत प्रकल्पात काम करावे लागणार होते. तेव्हा तिला याविषयी काहीच माहिती नव्हती. पण नंतर गांडूळखत प्रकल्पाचे महत्व कळले आणि वयाच्या २३व्या वर्षी सनाने आपला भाऊ जुनैद खान याच्या मदतीने एसजे ऑर्गेनिक्स सुरू केले. २०१४ साली त्यांनी हे सुरू केले.  

जेव्हा तिने हा व्यवसाय सुरू केला तेव्हा  अनेक अडचणी आल्या. गांडुळाला खायला बायोडेग्रेडेबल म्हणजे नाश होणार ओला कचरा लागतो. त्यासाठी तिने अनेक दुग्धशाळांना सम्पर्क केला. जो कचरा गांडूळांना दिला जातो ते कम्पोस्ट मध्ये रूपांतरित व्हायला दीड महिना लागतो. यानंतर कंपोस्टला चाळणी केली जाते आणि त्यात गोमूत्र टाकले जाते. चाचणी करून झाल्यावर नंतर ते बांधून बाजारात पोहोचवले जाते. तिथून ते शेतकरी किंवा नर्सरीचालक खत म्हणून विकत घेतात.

२०१५ साली सना यांच्या कंपनीला खरा नफा झाला. त्यानंतर हा व्यवसाय इतका वाढला की २०२० पर्यंत कंपनीला ५०० टन कचरा मिळाला आणि वार्षिक १ कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला. दरमहा तब्बल १५० टन गांडूळ खत तयार केले गेले. आज सनाला तिचा भाऊ आणि नवरा सय्यद अक्रम रझा यात मदत करत आहेत. अनेक जणांना त्यांनी रोजगार मिळवून दिले आहे. त्यांनी अजून जागा घेऊन काम वाढवले आहे. एक महिला उद्योजक कृषिक्षेत्रातही यशस्वी होऊ शकते हे सनाने सिद्ध केले आहे.

२०१८ ला सना यांचे काम पाहून तिच्या कार्याचा व्हिडीओ भारताच्या पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात दाखवला. एक तरुण महिला उद्योजिका म्हणून तिच्या कामाचा गौरव झाला. तेव्हा सनाचे सर्व स्तरांतून कौतुक होऊ लागले. सुरुवातीला अनेक खेड्यामध्ये सनाला असा अनुभव आला, की शेतकरी तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. इतकी लहान मुलगी कृषीतज्ञ असल्याप्रमाणे प्रशिक्षण देतेय हे अनेक जणांना सुरुवातीला पटायचे नाही, पण तिने हार न मानता गांडूळखत आणि सेंद्रिय शेती याविषयीचा प्रसार सुरू ठेवला. आता शेतकरी सनाचे प्रशिक्षण लक्षपूर्वक ऐकू लागले. आज ती यशस्वी आहे.

महिला उद्योजकांसाठी सल्ला देताना  सना म्हणते, “असा एक समज आहे की महिला केवळ घरगुती कामे करू शकतात. परंतु महिलांनी कृषी उद्योगात प्रवेश करायला अजिबात लाजू नये. या क्षेत्रातही बर्‍याच संधी आहेत. सक्षम महिला या क्षेत्रालाही खूप उंचीवर पोहोचवू शकतात. अधिकाधिक महिलांनी कृषी क्षेत्रात सक्रियपणे प्रवेश केला तर हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी वरदान ठरेल.”

खरंच सना खान यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला बोभाटातर्फे खूप शुभेच्छा..तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा.

 

लेखिक: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required