बाळाचं नाव ठरवण्यासाठी नातेवाईकांचं मतदान!! गोंदियाच्या दांपत्याची आगळीवेगळी शक्कल

नावात काय आहे? असं कोणत्यातरी महान माणसानं सहज म्हटलं असलं तरी शेवटी नाव हीच माणसाची ओळख असते ना भाऊ! अगदी मरेपर्यंत आणि मृत्यूनंतरही त्याला त्याचं तेच नाव चिकटून राहतं. त्यातही आजकाल प्रत्येक मायबाप आपल्या छकुल्याचं नाव ठरवण्यासाठी भरपूर विचार करताना दिसतात. पण सुचवलेल्या आणि सुचलेल्या ढीगभर नावांमधून परफेक्ट नाव निवडणं काही सोपं काम नाही.

बाळाचं नाव ठरवण्यासाठीच्या याच कन्फ्युजनमधून गोंदियातील मिथुन आणि मानसी या दांपत्यानं एक गजब शक्कल लढवली. बाळाच्या कुंडलीवरून ज्योतिष्याने तो पुढे राजकारणी नेता होणार असल्याचं सांगितल्यानंतर या दोघांनी नाव निवडण्यासाठी चक्क नातेवाईकांकडून मतदानच करून घेण्याचा निर्णय घेतला! यासाठी त्यांनी सर्व नातेवाईकांना १५ एप्रिलला एका ठिकाणी निमंत्रित केलं. मग काय, एकीकडे नवरा, दुसरीकडे बायको आणि मतदारांच्या भूमिकेत सर्व नातेवाईक... अशी परिस्थिती होती. सर्व मतदारांना बॅलेट पेपर्सही वाटण्यात आले. या मतपत्रिकांवर तीन नावं लिहिलेली होती... यक्ष, युवान आणि याविक. नातेवाईकांना या तीन नावामधलं एक नाव कागदावर लिहून आपलं 'बहुमूल्य मत' नोंदवायचं होतं. निवडणूकीसाठी 'बालक नाम चयन आयोग' बनवलेला होता आणि विशेष म्हणजे या समारंभासााठी स्थाानिक आमदारही उपस्थित होते!

मतदान संपल्यानंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार इथं एकूण १९२ जणांनी मतदान केलं होतं. यापैकी सर्वाधिक मतं ही 'युवान' या नावाला पडली आणि बाळाचं नाव ठेवलं गेलं 'युवान'.

राव.. साधं नाव ठेवायला मतदान घेतलं गेलं तिथं आता बाळ कुठल्या शाळेत जाणार ते कुणाशी लग्न करणार या सगळ्या गोष्टींचं काय होणार ते एक देवच जाणे!!

सबस्क्राईब करा

* indicates required