इंग्रजांशी पंगा घेणारी भारतातली पहिली राणी- राणी वेलु नचियार!! गनिमी काव्याने तिने इंग्रजांना जेरीस आणले होते!!
'मेरी झांसी नहीं दूंगी' अशी गर्जना करणारी आणि इंग्रजी सत्तेपुढे न झुकणारी झाशीची राणी तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. झाशीच्या राणीने इंग्रजांविरोधात केलेल्या बंडामुळे संपूर्ण देशात इंग्रजविरोधी वातावरण निर्माण झाले. पण, त्याही आधी इंग्रजांना धूळ चारणारी एक राणी याच भारतात होऊन गेली. जिने झाशीच्या राणीच्या कैक वर्षे आधी इंग्रजांना आपला हिसका दाखवला होता. या राणीचे नाव होते राणी वेलु नचियार!
इंग्रजी सत्तेविरोधात आवाज उठवणारी आणि इंग्रजांशी पंगा घेणारी भारतातील ही पहिली राणी होती. तामिळनाडूमध्ये आजही राणी वेलु नचियारच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या जातात. वीरमंगाई (वीरमाता) म्हणून आजही तिथे आदराने तिचा उल्लेख केला जातो.
रामनाड संस्थानचे राजा चेल्लूमुत्थू विजयरागुनाथ सेतूपती आणि राणी स्कंधीमुत्थल या दांपत्याच्या पोटी ३ जानेवारी १७३० रोजी राणी वेलुचा जन्म झाला. वंशाला दिवा हवाच असा दुराग्रह न करता या दांपत्याने आपल्या मुलीलाच आपला उत्तराधिकारी समजून राजशकट हाकण्यासाठी आवश्यक असणारे सगळे ज्ञान तिला दिले. तिच्या शिक्षणाची तजवीज केली. युद्धकलेतही राणी वेलु अगदी निपुण होती. घोडेस्वारी, भालाफेक, तलवारबाजी, धनुर्विद्या अशा बहुतेक युद्धकलात ती पारंगत झाली होती. फ्रेंच, इंग्रजी आणि उर्दू अशा परदेशी भाषाही तिला चांगल्या प्रकारे अवगत होत्या.
शिवगंगाइ राज्याचे राजकुमार मुथूवादुगानाथापेरीया उदैयाथेवार यांच्याशी वयाच्या १६ व्या वर्षी तिचा विवाह झाला. दोघांनाही वेल्लाची नावाची एक मुलगीही झाली. दोन दशके त्यांनी आपल्या राज्यात सुखनैव राज्य केले.
१७७२ साली इंग्रजांची नजर या राज्यावर पडली. अर्कोटच्या नवाबाला हाताशी धरून इंग्रजांनी शिवगंगाईवर हल्ला चढवला. कोलीयार कोली नावाने प्रसिद्ध असलेल्या या युद्धात इंग्रजांनी प्रचंड नरसंहार घडवून आणला. लहान मुले, वृद्ध, स्त्रिया कुणाचीच त्यांनी गय केली नाही. या युद्धात राणी वेलु नचियारचे पती आणि इतर सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले.
राणी वेलुला काही काळ आपल्या मुलीसोबत राज्यातून परांगदा व्हावे लागले. पण ती हरली नव्हती. आठ वर्षे भूमिगत राहून तिने इंग्रजांविरुद्ध युद्ध लढण्यासाठी सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. शेजारच्या अनेक राजांशी तिने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. आठ वर्षांच्या या काळात डिंडिगुलचे राजा गोपाल नायकर यांनी तिला आपल्या राज्यात आश्रय दिला. मैसूरचा सुलतान हैदर अलीनेही तिला आपल्या राज्यात आश्रय देण्याची तयारी दाखवली. इंग्रजांविरोधात लढण्याची तिची जिद्द आणि तिचा विश्वास पाहून हैदर अलीही प्रभावित झाला. महिन्याला ४०० पौंड रक्कम, ५००० सैनिक आणि ५००० घोडदळ देऊन तिला युद्धात सहाय्य करण्याचे वचन दिले. सर्वांच्या मदतीने राणीने स्वतःचे सैन्य उभे केले.
इंगाजांशी लढताना तिने गनिमी काव्याचा वापर केला. आपण नेमके कुठे आहोत याचा थांगपत्ताच तिने इंग्रजांना लागू दिला नाही. इंग्रजांचा शस्त्रसाठाच नेस्तनाबूत केला तर इंग्रज कमकुवत होतील हे जाणून तिने इंग्रजांच्या शस्त्रसाठ्यावरच हल्ला करण्याचा बेत आखला. यासाठी तिच्या सैन्याची प्रमुख आणि तिची विश्वासू साथीदार कुनैलीची तिने निवड केली. महान कुनैलीने राज्य राखण्यासाठी आत्मसमर्पण करण्याची तयारी दाखवली. कुनैली आपल्या अंगावर तूप ओतून घेऊन स्वतःच्या शरीराला आग लावून या शस्त्रसाठ्यात घुसली. शहीद कुनैली ही इतिहासातील पहिला मानवी बॉंब होती.
संपूर्ण शस्त्रसाठाच उध्वस्त झाल्याने इंग्रज सैन्य कमजोर झाले. प्रत्यक्ष युद्धात इंग्रजांची खूपच धूळधाण झाली. राणीच्या कुशल रणनीतीमुळे आणि धाडसी निर्णयामुळे राणी वेलुला पुन्हा एकदा शिवगंगाईवर ताबा मिळवण्यात यश मिळाले. शिवगंगाईवर सत्ता स्थापन करून राणी वेलु नचियारने पुढील कित्येक दशके निर्धोकपणे राज्य केले. तिच्या नंतर आपला वारस म्हणून तिने आपली मुलगी वेल्लाची कडे राज्याची सूत्रे सोपवली.
ब्रिटिशांविरोधातील या लढ्यात राणीला ज्या ज्या शेजारी संस्थानिकांनी मदत केली त्या सर्वांशी राणीने सौहार्दपूर्ण संबंध राखले. राणी वेल्लाचीने देखील हीच रीत पुढे सुरू ठेवली.
तिच्या अखेरच्या काळात ती हृदयविकाराने ग्रस्त होती. २५ डिसेंबर १७९६ रोजी राणीचा मृत्यू झाला. पण तामिळनाडूवासियांमध्ये देशाभिमानाची आणि देशप्रेमाची राणीने चेतवलेली ज्योत आजही धगधगत आहे.
३१ डिसेंबर २००८ साली भारत सरकारने राणीच्या सन्मानार्थ पोस्ट तिकीट जारी केले आहे. तामिळनाडूतील लोक आजही राणी वेलु नचियारच्या स्मृती प्राणपणाने जपत आहे.
मेघश्री श्रेष्ठी




