computer

हजारो वर्षं जुनी कपडे धुण्याची डोकेदुखी दूर करणार्‍या वॉशिंग मशिनचा इतिहास वाचायलाच हवा !

आज धुळीने माखलेले कपडे धुणं हे जिकिरीचं, कष्टाचं काम राहिलेलं नाही. फक्त धुवायचे कपडे एकत्र करायचे, वॉशिंग मशीन नामक यंत्रामध्ये टाकून द्यायचे आणि काही बटनं दाबायची की ते कपडे स्वच्छ होऊन 'रेडी टु ड्राय' या स्वरूपात आपल्यासमोर येतात. पण हे सगळीकडेच घडत नाही. आजही खेडोपाडी अनेक ठिकाणी नदीकिनारी जाऊन कपडे धुणं हीच पद्धत रूढ आहे. वॉशिंग मशीन येण्याच्या आधीच्या काळात हाताने कपडे धुणं हेच प्रचलित होतं.

पूर्वी कपडे कसे धुतले जायचे?

अतिप्राचीन काळी नुसत्या पाण्याने कपडे धुतले जायचे. यामध्ये केवळ कपडे साध्या पाण्यात भिजवणं, खळबळणं, धोपटणं या गोष्टी केल्या जात. धोबीघाट हे बहुधा नदीकिनारी असायचे आणि नदीच्या वाहत्या प्रवाहाच्या वेगामुळे कपड्यावरील मळ निघून जायचा. साबण, डिटर्जंट या गोष्टी वापरात येण्याआधीचा हा काळ.

जसजशी संस्कृती विकसित होत गेली, लोकसंख्या वाढीला लागली तसतशी नद्यांचे किनारे, दगड ही साधनं तोकडी पडू लागली. मग परदेशांत कपडे धुण्याच्या पद्धतींमध्ये लाकडाचा कपडे धुण्याचा टब, पोझिंग टब, डॉली टब असे कपडे धुण्याच्या टप्प्यांसाठी अनेक पर्याय निर्माण झाले. पण यातही कपडे धुणं किचकट आणि वेळखाऊ होतं. यात कपडे धुण्याच्या आधी २४ तास साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवावे लागायचे. ते धुण्यासाठीही पंधरा तास लागायचे. यामुळे लोकांचे कपडे धुण्याचं प्रमाण हळूहळू कमी झालं. या काळात लोक तागाचे कपडे वापरायचे. सारखं कपडे धुण्याची गरज भासू नये म्हणून जास्तीच्या तागाच्या कपड्यांची घरात तरतूद असणं हे तेव्हा प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं.

प्राचीन इजिप्त, रोम या ठिकाणी कपडे धुण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सेवा प्रसिद्ध होत्या. इथले लोक कपडे धुण्यासाठी प्रचंड आकाराची कुंडं वापरत. व्हाईट वॉश, पोटॅशियम किंवा सोडियम हायड्रॉक्साइडचा प्रखर द्राव, युरीन, पाणी यांचा वापर करून कपडे धुतले जायचे. रोमन आणि इजिप्शियन लोक कपडे धुण्यासाठी मानवी मुत्राचा वापर करत. त्याच्यात असलेला अमोनिया कपड्यांवर लागलेले ग्रीस विरघळवून कमी करत असे. त्यानंतर धोबी कपडे धोपटत आणि पाण्यात कपडे खळबळून काढत.

धुण्याआधी कपडे भिजवत असत. त्यासाठी प्राण्यांचे मांस आणि लाकडाची राख याचा उपयोग केला जात असे. नंतरच्या काळात साबणाचा लागलेला शोध या क्षेत्राला वेगळं वळण देणारा ठरला. साबण, डिटर्जंट सारख्या गोष्टींच्या वापरामुळे कपड्याचा मळ काढायला सोपं जातं हे लक्षात आलं आणि कपडे धुण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. साबणाच्या पाण्यात कपडे भिजल्यामुळे आपलं काम सोपं होतं हे लोकांच्या लक्षात आलं. परिणामी साबणाच्या पाण्यात भिजवून कपडे धुणं सुरू झालं.

कपडे धुण्यासाठी वॉशबोर्डचा वापर हा या प्रवासातला मैलाचा दगड आहे. हे वॉशबोर्ड्स वेगवेगळ्या प्रकारच्या सामग्रीपासून बनायचे. लाकूड, दगड, धातू, काच, उच्च तापमान सहन करू शकणारी माती यांचा वापर यासाठी केला जाई. पुढे हे वॉशबोर्ड्स जाऊन त्या जागी वॉशिंग मशीन आलं.

अठराव्या शतकाच्या मध्यात इंग्लंडमध्ये पहिल्यांदा स्टॅन्डनरनी जगाला वॉशिंग मशीन या यंत्राची ओळख करून दिली. त्यानंतर अमेरिकेतील हॅमिल्टन स्मिथ यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक वॉशर ड्रम तयार केला. या ड्रममध्ये कपडे एका ब्लेडद्वारे फिरवले जात होते. दुसऱ्या एका प्रवादानुसार वॉशिंग मशीनचा शोध १८ व्या शतकाच्या सुरुवातीलाच फ्रान्समध्ये लागला. या वॉशिंग मशीनला व्हेंटिलेटर म्हटलं गेलं. या वॉशिंग मशीनमधल्या ड्रमला अनेक छिद्रं होती. या ड्रमच्या खाली असणाऱ्या विस्तवावर हा ड्रम फिरवला जात असे.

१७९० मध्ये बीटमेन नावाच्या इंग्लिश माणसाने फक्त पाण्याच्या प्रवाहावर चालणाऱ्या वॉशिंग मशीनची निर्मिती केली होती. पण हा प्रयोग व्यवहारात उतरला नाही. एकोणिसाव्या शतकात जॉर्ज टी सँपसन या संशोधकाला कपड्यांच्या ड्रायरचे स्वामित्व हक्क मिळाले. त्याचं संशोधन कपडे वाळवण्यासाठी उपयोगात आणलं गेलं. हे कपडे वाळवणं स्टोव्हमधील उष्णतेच्या साहाय्याने होत होतं. १९ व्या शतकापर्यंत रुग्णालय आणि लॉन्ड्रीजपुरताच या वॉशिंग मशीनचा उपयोग मर्यादित होता. अगदी सुरुवातीपासूनच वॉशिंग मशीन अर्धवर्तुळाकारात फिरत होती आणि यात वॉशबोर्डचाही वापर करण्यात आला होता. हे बोर्ड मशीनच्या तळाशी असलेल्या कातकाम केलेल्या शेगडीच्या विरुद्ध दिशेने फिरत. कपडे या दोन्ही थरांमध्ये स्वच्छ होईपर्यंत घासले जात. पण यात एक अडचण होती. ती म्हणजे खूप नाजूक असलेले धागे अतिउच्च ताणामुळे खराब होत. हीच गोष्ट त्याच्या सुधारणेसाठी महत्त्वाची ठरली. या घर्षण होणाऱ्या पृष्ठभागामुळे कपडे कमकुवत होऊन ते लवकर विरण्यापासून रोखण्यासाठी त्या पृष्ठभागांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. पूर्वी बनवलेली मशीन्स ही लाकूड आणि धातूच्या गिअरची असत. नंतर वॉशिंग मशीनची वाढती लोकप्रियता आणि कपडे धुण्याच्या पद्धतीत होत गेलेला बदल लक्षात घेऊन या क्षेत्रातील तज्ञ कंपन्यांनी त्याच्या डिझाईनमध्ये स्वतःच लक्ष घातलं. १९०४ च्या दरम्यान आयडियल नावाच्या ब्रँडखाली होबजा या कंपनीने पहिल्या वॉशिंग मशीनची निर्मिती केली.

स्वयंचलित धुण्याच्या प्रक्रियेचा आविष्कार म्हणजे या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली सुधारणा. यामध्ये पूर्वी डॉली टब आणि लाकडी वॉशटबचा वापर केला जाई. शिवाय यामध्ये दट्ट्या वापरून कपडे आपटण्याची व फिरवण्याची क्रिया केली जायची. यात सुधारणा घडवून आणल्या गेल्या. यापैकी एक म्हणजे पाणी खालच्या बाजूने गरम करून ते वापरणं. नंतर विजेचा शोध लागल्यावर रिंगर्सची (कपडे पिळण्यासाठी वापरलं जाणारं साधन) जागा स्पिन ड्रायर्सनी घेतली. पुढे त्यात कालानुरूप बदल होत गेले आणि आजचं स्वरूप साकारलं.

आज वॉशिंग मशीनचे अनेक ब्रँड्स बाजारपेठेत उतरले आहेत. कपडे धुण्याचं काम जिकिरीचं, कष्टाचं राहिलेलं नाही. एका बाजूने विचार केला तर यामुळे शारीरिक कष्ट आणि वेळ वाचले आहेत हा याचा खूप मोठा फायदा आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर कपडे धुताना होणारी शरीराची विशिष्ट प्रकारची हालचाल, कमरेत वाकणं, उकिडवं बसणं, कपडे आपटताना हाताच्या स्नायूंना होणारा व्यायाम, आणि कपडे धुण्याच्या निमित्ताने होणारं एक प्रकारचं सोशलायझेशन हे सगळं दूर गेलं आहे. म्हटलं तर फायदा म्हटलं तर तोटा असा हा मामला आहे. तुम्हाला काय वाटतं?

असो, सगळे टप्पे लेखात देणं आणि त्या टप्प्यांचे फोटो आणि रेखाचित्रं देणं दोन्हीही शक्य नाही. तेव्हा या ठिकाणी (http://www.muzeum.svitavy.cz/foto.php?id_cl=191) भेट द्या, या क्षेत्रातल्या मानवी संशोधनाचे विविध टप्पे आणि उत्तरोत्तर सुधारणाचं कौतुक करत घरातल्या वॉशिंग मशीनमध्ये आजचे कपडे धुऊन काढा!!

स्मिता जोगळेकर