एलॉन मस्कने उचलून धरलेला डॉगकॉइन आहे तरी काय? त्याचा खऱ्याखुऱ्या कुत्र्याशी काय संबंध आहे?

एलॉन मस्क नावाचे प्रसिद्ध गृहस्थ सध्याच्या काळात परिस आहेत असे म्हणावे लागेल. ते ज्या गोष्टीला हात लावतात त्याला सोन्याचा भाव येतो. त्यांनी उभ्या केलेल्या कंपन्या आणि इतरही गोष्टी बघितल्या तर यात जराही अतिशयोक्ती नाही याचा अंदाज येतो. त्यांनी केलेल्या एकेका ट्विट्समुळे अनेकांचे पडलेले दिवस सुधारले, तर सुधारलेले दिवस पडल्याची उदाहरणे आहेत.
क्रिप्टोकरन्सी हा विषय तसा आधीपासून जगात प्रसिद्ध होत आहे. त्यात मस्करावांनी डॉगकॉइनच्या माध्यमातून उडी घेतल्याने या विषयाला आणखीन प्रसिद्धी मिळाली. आतातर मस्क यांची कंपनी स्पेसएक्सचे आगामी मंगळ मिशन हे डॉगकॉइन फंडेड असेल अशा बातम्या येत आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर आमच्या वाचकांना या डॉगकॉईनचा संपूर्ण परिचय करून देत आहोत.
तर वाचकहो तुम्हाला बीटकॉइन हे तर माहीतच असेल. तर जसे डॉलर आणि रुपया ही वेगवेगळी चलने (currencies) आहेत, तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये बिटकॉइन हे वेगळे चलन आहे. त्याच्या जोडीला आणखीही काही चलने आहेत. आता त्यात मस्कने डॉगकॉइन या नविन क्रिप्टोकरन्सीत आपली आवड दाखवली असल्याने डॉगकॉइनचे मार्केट वधारले आहे. अनेकांना वाटते की डॉगकोईनचा निर्माता स्वतः एलॉन मस्क आहे पण तसे नाही. या करन्सीला बिली मार्कस नावाच्या एका सॉफ्टवेअर डेव्हलपरने बनवले आहे. त्याची इच्छा होती की एक अशी करन्सी असावी जी इन्स्टंट, हलकीफुलकी आणि बँकिंग फी फ्री असावी.
आता या क्रिप्टोकरन्सीतील डॉग या नावाविषयी जाणून घेऊया.
तर, गोष्ट सुरू होते २०१० पासून. जपानमधील अत्सुको सातो या शिक्षकाने आपल्या कोबोसू नावाच्या कुत्र्याचे फोटो इंटरनेटवर टाकले. इंटरनेटवर कधी काय हिट होईल याचा नेम नाही. हेच या कुत्राच्या बाबतीत देखील झाले. या कुत्र्याचे हावभाव लोकांना प्रचंड आवडले. नंतर हा कुत्रा अनेक ठिकाणी झळकू लागला. टी शर्ट तसेच पुस्तकांवर देखील तो दिसू लागला. त्याचा फोटो लावून तोडकी मोडकी इंग्रजी असलेले मिस व्हायरल होऊ लागले. गेल्या २ वर्षात तर त्याची लोकप्रियता शिखरावर गेली आहे.
कोबोसू कुत्र्यापासून सुरु झालेला ट्रेंड क्रिप्टोकरन्सीत कसा परावर्तीत झाला, तर त्याचे उत्तर असे की डॉगकॉइनच्या निर्मात्यांना तरुणांना आकर्षित करायचे होते. सध्या डॉगकॉइनची मार्केट रँक ही ४८ आहे. हा आकडा चांगला मानला जातोय.
डॉगकॉइन ६ डिसेंबर २०१३ द्वारा अधिकृतपणे आणण्यात आले होते. एलॉन मस्क जेव्हा डॉगकॉइनसाठी ट्विट्स करायला लागले तेव्हापासून याकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. याच्या मायनिंगची म्हणजे डॉगकॉइन मिळवण्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास हे एकट्याने किंवा ग्रुपमध्ये करता येऊ शकतं. यासाठी कुठलेही बंधन नाहीत. त्याचप्रमाणे याची मायनिंग तुम्ही लिनक्स, विंडोज, मॅक, आयओएस, यावर देखील करू शकता. यासाठी कुठल्याही वेगळ्या डिव्हाईसची गरज लागत नाही.
सध्याच्या घडीला डॉगकॉइनचा सप्लाय १२९ बिलियन एवढा आहे. तसेच आजवर ११३ बिलियन कॉइन आधीच माईन केले गेले आहेत. आजच्या घडीला या कॉइनचे बाजार भांडवल हे ८० बिलियन डॉलर एवढे आहे. डॉगकॉइनची रुपया सोबत तुलना केली तर ती जवळपास ४५ रुपये एवढी आहे.
डॉगकॉइनची गोष्ट इथे संपत नाही, अतिशय वेगाने वधारी पाहणारा डॉगकॉइन मात्र गेल्या २ दिवसांत चांगलाच उतार पाहत आहे. आकड्यात सांगायचं झाल्यास ३६ टक्के उतार मिळाला आहे. यामुळे एक गोष्ट स्पष्ट होत आहे की क्रिप्टो करन्सी कुठलीही असो त्यात गुंतवणूक करताना मात्र सारासार विचार करूनच गुंतवणूक करायला हवी.