computer

सौदी तेलविहिरींवरच्या दहशतवादी हल्ल्याने भारतावर कोणते गंभीर परिणाम होणार आहेत ? वाचा सविस्तर माहिती !!

सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीवर दहशतवाद्यांनी ड्रोन हल्ला केला. हा हल्ला कंपनीच्या दोन प्लांट्सवर झाला आहे. या हल्ल्याने दिवसभराच्या तेल उत्पन्नाच्या ५७ लाख बॅरल इतकं प्रमाण कमी झालं आहे. सोप्प्या शब्दात बाजारात येणारा एकूण तेल पुरवठा ५ टटक्क्यांनी कमी होणार आहे.

याचा भारतावर कसा परिणाम होईल?

आधीच आपल्याकडे पेट्रोलचे भाव अधूनमधून वाढत असतात. या घटनेने पुढच्या काही दिवसात पेट्रोलचे भाव हमखास वाढण्याची शक्यता आहे. अरामकोने म्हटल्याप्रमाणे काही दिवसातच नुकसान भरून काढण्यात येईल, पण तेल उत्पादन पूर्वपदावर यायला आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

आज आम्ही फोटोच्या माध्यमातून या हल्ल्याची संपूर्ण माहिती, त्याची कारणं आणि परिणाम सांगणार आहोत.

१. १४ सप्टेंबर रोजी हा हल्ला झाला. अरामकोचे हे दोन्ही प्लांट्स जगातल्या सर्वात मोठ्या पेट्रोलियम प्रक्रिया केंद्रापैकी एक आहेत. अबैक आणि खुरेश या दोन तेलखाणींवर हा हल्ला झाला. फोटोमध्ये हल्ल्याच्या ठिकाणाहून येणारा धूर आपण पाहू शकतो.  

२. या फोटोमध्ये अबैक तेल प्रक्रिया केंद्राचं नुकसान दिसत आहे. छताच्या भागाचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.

३. हल्ल्याची दुसरी जागा असणारी खुरेश तेल खाणीची ही दृश्य आहेत. हल्ल्यामुळे तेलखाणीच्या महत्वाचा भाग कोसळला आहे.

४. हा हल्ला पहिल्यांदा झालेला नाही, यावर्षी मे महिन्यात अरामको कंपनीच्या पाईपलाईनवर झालेला हल्ला देखील एकाच दहशतवादी गटाने केलेला हल्ला होता. या फोटोमध्ये या हल्ल्याची दृश्य दिसत आहेत.

५. हे सगळं बघितल्यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असणार की हे केलं कोणी ? या हल्ल्याची जबाबदारी यमनच्या हौथी बंडखोरांनी घेतली आहे. पुढेही असे हल्ले करू आणि हा आमचा हक्क आहे असं हौथी बंडखोरांनी म्हटलं आहे.

६. हल्ल्या मागचं कारण काय ?

सौदी अरेबियाने यमनमध्ये केलेल्या ढवळाढवळीचा हा परिणाम आहे. स्थानिक सरकारला उखडून काढण्यासाठी हौथी बंडखोर १९९० पासून कार्यरत आहेत. २०१५ साली या वादात सौदी अरेबिया उतरली. या बंडखोरांना हाकलून लावण्यासाठी सौदी अरेबियाने मदत केली होती. सध्या यमनमध्ये असलेलं सरकारही सौदीच्या हातातील बाहुलं आहे. याचा राग म्हणून हौथी बंडखोर सौदीवर चिडलेले आहेत. यमनमधलं सध्याचं वातावरण गृहयुद्धाचं आहे.

७. या अशांततेत इराण हौथी बंडखोरांना मदत करतंय. याच मदतीतून असे हल्ले होत असतात. १४ सप्टेंबरला झालेला हल्ला इराणनेच करवून घेतलेला आहे असा आरोप होतोय.

८. हा हल्ला कोणताही विचार न करता केलेला आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. अरामको आपले शेअर्स बाजारात आणण्याचा विचार करत आहे. वर्षाच्या अखेरीस किंवा २०२० च्या सुरुवातीला शेअर्स बाजारात येतील. या दृष्टीने देखील हा हल्ला महत्वाचा आहे. कदाचित अरामको आपले शेअर्स लोकांसाठी खुला आणण्याचा विचार पुढे ढकलेल. याचा भारताच्या एका मोठ्या कंपनीवर परिणाम होणार आहे

९. अरामको भारतातल्या रिलायन्स कंपनीतला ३० टक्के समभाग विकत घेणार होती. कदाचित हा व्यवहारही पुढे ढकलला जाऊ शकतो. या व्यवहाराने रिलायन्सच्या डोक्यावर असलेलं प्रचंड मोठं कर्ज उतरणार होतं. हे कर्ज काही लाख कोटींमध्ये आहे. हल्ल्यामुळे रिलायन्सचं कर्जमुक्त होण्याचं स्वप्न देखील पुढे ढकललं गेलं आहे.

(स्फोटकं वाहून नेणारा ड्रोन)

मंडळी, सौदीतला हल्ला आपल्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन्ही परिणाम करणारा आहे. याखेरीज आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे, दहशतवाद्यांच्या हातात ड्रोन नावाचं नवीन हत्यार लागलंय. हे हत्यार अमेरिकेने अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांना थोपवण्यासाठी वापरलं होतं, पण आता तेच हत्यार विध्वंसक म्हणून वापरलं जात आहे. अशा ड्रोन हल्ल्याचा भारतालाही धोका आहे. त्यादृष्टीने सुरक्षाव्यवस्थेत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required