computer

एक मजेशीर करार - व्हापचिठ्ठी- वहाबचिठ्ठी

सध्या एखादे अ‍ॅप डाउनलोड करताना किंवा एखाद्या वेबसाईटच्या सेवा वापरताना सगळ्यात शेवटी एक करार असतो , जो आपल्यापैकी जवळजवळ कोणीच वाचत नाही. आमच्या अटी आणि शर्ती तुम्हाला मंजूर आहेत का ? आणि असल्यास या चौकोनात मान्याता द्या असे लिहिलेले असते. काही वेबसाईटमध्ये तुम्ही आमची 'प्रायव्हसी पॉलीसी' वाचली आहे का असाही प्रश्न असतो. थोडक्यात सेवा वापरण्यासाठी आपण त्या कंपनीसोबत एक करार करत असतो जो आपण कधीच वाचत नाही. मर्यादित रित्या हे करार सुरक्षित असतात पण एखादे लोन देणारे अ‍ॅप वापरून नंतर अटी आणि शर्यती का वाचल्या नाहीत असा टाहो फोडणारे लोकही तुम्हाला भेटतील.आपण सुशिक्षित  लोक करार करताना किती निष्काळजीपणे वागतो याचा प्रत्यय तुम्हालाही कधीतरी आला असेलच. पण मग आपल्यापेक्षा अडाणी शेतकरीजास्त हुशार असातात हे सांगणारा एक किस्सा नुकताच आमच्या वाचनात आला.

माझे वडील  पडघे आणि परिसरात अंतू मास्तर ह्या नावाने परिचित होते.
त्यांचा व्यवसाय स्टॅम्प व्हेंडर आणि बॉण्ड रायटर असा होता.
पडघे परिसरातील आणि गावातील अनेक व्यवहार त्याची लिखापढी ही आमच्या ओटीवर झालेली असे.
७० सालापर्यंत लोकांच्या घरी गुरे ढोरे असत.मग त्या काळात शेतकरी लोक ज्यांच्याकडे बैल असत त्यांचेकडून बैल सहा महिन्यासाठी घेऊन जात असत.
त्या बैलांना शेतीच्या कामासाठी जुंपत असत.त्या बैलांच्या मोबदल्यात बैलांच्या मालकाला काही भात दिले जात असे.
याला वहाब असे म्हणत.त्याचा जो करार होई त्याला म्हणायचे व्हापचिठ्ठी ( वहाबचिठ्ठी).
पावसाळा सुरू होताना हे बैल घेतले जात व नोव्हेंबर महिन्यात हे बैल मालकांना परत केले जात.
आमचे वडील त्या व्हापचिठी लिहून त्याला कायदेशीर स्वरूप देत असत.
त्यात लिहिलेला मजकूर  म्हणजे आजकाल ज्याला 'टर्म्स अँड कंडिशन्स' म्हणत त्या अशा असत.तो मजकूर असा असे.
प्रथम बैल मालकाचे नाव लिहिले जात असे.
त्याच्या पुढे लिहून घेणार असें लिहिले जाई.
नंतर बैल ज्याला दिला जात असे त्याचे नाव लिहिले जाई.त्याच्या नावापुढे लिहून देणार म्हणून लिहिले जाई.
त्याच्या पुढील मजकूर अतिशय रंजक असे 
१ तुमचा बैल एक वाहाफने घेतला आहे त्याचे वर्णन.बैल -एक रंग-काळा शिंगे-उभी, तीन दुराचा म्हणजे एक वर्ष वयाचा बैल एक वाहाफने घेतला आहे.
२ त्याचा वाहाफचा ठराव भात मण चार झिणीचे येत्या नोव्हेंबरमध्ये देऊ.
३ तुमचे बैल चांगले चारून हुशार करून येत्या नोव्हेंबेरात तुमचे ताब्यात देऊ.
४ घावा फटका लागू देणार नाही.शिसा बासा झाल्यास मी जबाबदार नाही.
५ गेल्या हरवल्यास मी जबाबदार आहे.
ही वाहाफचिठ्ठी राजीखुषीने लिहून दिला असे लिहिले जात असे. एकूण असा मजकुर लिहून खाली लिहून देणार आणि लिहून घेणार ह्यांच्या सह्या घेयल्या जात व दोन साक्षीदार म्हणुन सह्या घेत अशा शंभर एक वाहाफाच्या चिठ्ठ्या आमचे वडील त्या काळात लिहीत असत.
या एका करारापोटी माझ्या वडीलांना रोख १० पैसे दिले जात असत. त्यापैकी एक आणा स्टँपसाठी खर्वाचा लागत असे. 
आता मला हे सांगा की तुमच्या गावातही अशी चिठ्ठी किंवा करार लिहिला जात असे का ?

 महेश वैद्य