computer

हृदयप्रत्यारोपण म्हणजे काय? हृदयप्रत्यारोपणाआधी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत?

जब तक धडकनें हैं, तब तक सांसें हैं... अगदी खरं आहे. हृदय हा तसं पाहता शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव. जिवंतपणाचं लक्षण म्हणजे त्याचं धडधडणं. पण कधीतरी त्याच्यावरच बिचाऱ्यावर इतका ताण येतो, की ते पार निकामी होतं, दुरुस्त होण्यापलीकडे जातं. कधी कधी जन्मतःच ते फारसं तंदुरुस्त नसेल तर लवकर काम करेनासं होतं. अशा वेळी एकच उपाय शिल्लक राहतो, तो म्हणजे त्याच्या जागी दुसरं हृदय बसवणं.

हृदय प्रत्यारोपण म्हणजे निकामी झालेल्या हृदयाच्या जागी निरोगी हृदय बसवणं. आता असं निरोगी हृदय कुठून आणणार? तर एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीकडून. होय! मृत्यू झाल्यावर काही तासांच्या आत जर त्या व्यक्तीचं हृदय काढून घेतलं तर ते एखाद्या जिवंत माणसाच्या कामी येऊ शकतं. अर्थात हे करण्यासाठी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांची परवानगी हवी. पहिलं प्रत्यारोपण १९६७ मध्ये झालं आणि त्यानंतरच्या पाच दशकांमध्ये त्याचा प्रवास एक प्रयोग ते हृदयविकारावरची एक यशस्वी उपचारपद्धती असा झाला आहे.

पण हृदय प्रत्यारोपण हा पर्याय कधी वापरतात? तर जेव्हा हृदय अन्य उपचारांना योग्य प्रतिसाद देत नाही, पण पेशंटची बाकी परिस्थिती चांगली आहे तेव्हा. जन्माच्या वेळी हृदयाला छिद्र असणं, हार्ट अटॅकमुळे हृदयाच्या स्नायूंपाशी स्कार टिश्यूज(ऊती तुटणं) निर्माण होणं, डायलेटेड कार्डिओमायोपथी हा हृदयाच्या स्नायूंचा विकार अशा परिस्थितीत हृदय प्रत्यारोपण हा पर्याय स्वीकारला जातो.

मात्र हा पर्याय विचारात घेण्याआधी काही प्रश्न विचारून पाहाणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ,

१. इतर सर्व उपचार पद्धतींंचा उपयोग करून झाला आहे का?

२. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करूनच तुमचं आयुष्य वाचणार आहे का? शस्त्रक्रियेनंतर आणखी किती आयुष्य जगता येईल असं वाटत आहे?

३. हृदय किंवा फुफ्फुसाचे विकार सोडल्यास बाकी तुम्ही संपूर्ण फिट आहात का?

४. शस्त्रक्रियेनंतर जीवनशैलीत जे बदल होतील ते स्वीकारायची तुमची तयारी आहे का? किचकट औषधोपचार, पथ्यं किंवा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर ठरावीक कालांतराने कराव्या लागणाऱ्या टेस्ट्स यांना तोंड द्यायची तयारी आहे का?

ह्यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर नाही असेल, तर पेशंट ह्या शस्त्रक्रियेसाठी पात्र नाही. याशिवाय लठ्ठपणा, इतर काही गंभीर व्याधी, इन्फेक्शन्स असतील तरी ही शस्त्रक्रिया करू नये.

पण समजा, या सगळ्या चाळण्यांतून तुम्ही बाहेर पडलात, म्हणजे हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी तुम्ही योग्य उमेदवार असाल तरी प्रत्यक्ष प्रत्यारोपण करण्यासाठी काय करावं लागतं?

सगळ्यात पहिली पायरी म्हणजे पेशंटचं नाव प्रत्यारोपण यादीत दाखल करणं. अर्थातच त्याआधी सर्व संबंधित चाचण्या करून घेणं आवश्यक. या चाचण्यांचे निकाल, तुमची मेडिकल हिस्ट्री, सोशल हिस्ट्री, मानसिक चाचण्या यांच्या आधारे पेशंटसाठी ही शस्त्रक्रिया किती प्रमाणात यशस्वी ठरेल हे ठरवता येतं.

त्यापुढचा टप्पा म्हणजे ह्रदय दान करू इच्छिणाऱ्या डोनरची उपलब्धता. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी व त्रासदायक ठरू शकते. या काळात तुमचे मित्र, नातेवाईक यांची तुमच्या पाठीशी उभी राहणारी भक्कम यंत्रणा हवी. या काळात डॉक्टर्स पेशंटच्या सतत संपर्कात राहतात, जेणेकरून पेशंटच्या तब्येतीत काही चढउतार होत नाहीत ना याकडे लक्ष ठेवता येतं.

हृदय प्रत्यारोपणासाठी आवश्यक असणारा दाता म्हणजे ब्रेनडेड रुग्ण किंवा नुकतीच मरण पावलेली व्यक्ती. बहुधा ब्रेनडेड रुग्ण अपघात, डोक्याला झालेली गंभीर इजा यामुळे ब्रेनडेड असतात. जरी विविध यंत्रांच्या साह्याने त्यांचं शरीर जिवंत ठेवलेलं असलं तरी त्यांचा मेंदू मृत झालेला असतो. मात्र दुर्दैवाने अजूनही आपल्याकडे या बाबतीत पुरेशी जागृती झालेली नाही. प्रत्यारोपणासाठी उपलब्ध असलेल्या हृदयांची संख्या बरीच कमी आहे.

हृदय उपलब्ध होताच, ट्रान्सप्लांट सेंटरमधील सर्जन ते डोनरच्या शरीरातून शस्त्रक्रिया करून काढतात. यानंतर ते थंड केलं जातं आणि नंतर एका खास सोल्युशनमध्ये ठेवलं जातं. हे हृदय उत्तम स्थितीत आहे याची सर्जन खात्री करून घेतो.

शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला हार्ट लंग मशिनवर ठेवतात. त्यामुळे रुग्णाला रक्तातील जीवनसत्त्वे, ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होतो. त्यानंतर सर्जन रुग्णाचं हृदय (हृदयाच्या वरच्या कप्प्याची मागील भिंत सोडून) शस्त्रक्रियेने बाहेर काढतात आणि डोनर हार्टच्या वरच्या कप्प्याची मागची बाजू उघडून ते आधीच्या भिंतींशी जोडून टाकतात. अशा प्रकारे हृदय त्याच्या जागी बसवलं जातं.

यानंतर सर्जन रक्तवाहिन्या जोडतो आणि हृदय आणि फुफ्फुस यांतून रक्ताचा प्रवाह सुरू होतो. हृदयात आवश्यक उब निर्माण झाली की त्याची धडधड पुन्हा एकदा सुरू होते. सर्जन जोडलेल्या रक्तवाहिन्या व हृदयाचे कप्पे यांत कुठे लीकेज नसल्याची खात्री करून घेतो. त्यानंतर रुग्णाला हार्ट लंग मशीनपासून वेगळं केलं जातं. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असून ती दीर्घकाळ चालते.

हुश्श! झालं एकदाचं ऑपरेशन. पण थांबा, पिक्चर अभी भी बाकी हैं!! आताच तर खरी कसोटी आहे. शरीरात दुसरं हृदय तर बसवलं, पण शरीर ते स्वीकारणार का? याचं कारण म्हणजे कोणतीही फॉरेन बॉडी 'रीजेक्ट' करण्याची शरीराची प्रवृत्ती. आपल्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी शरीरभर फिरून शरीराच्या पेशींपेक्षा काही वेगळं दिसलं की ते बाहेर फेकण्यासाठी लगेच अलर्ट कॉल जनरेट करतात. अगदी डोळ्यांत धुळीचा एखादा कण गेला किंवा पायात काटा रुतला तरी शरीर लगेच ते बाहेर टाकू पाहतं, मग एक मोठा अख्खा अवयव ते इतक्या सहज कसा स्वीकारेल? या शस्त्रक्रियेतला खरा धोका असतो तो इथेच. शरीराने हे प्रत्यारोपण केलेलं हृदय जर स्वीकारलं नाही तर मृत्यूचाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर पेशंटच्या तब्येतीकडे, त्यातल्या चढ उतारांकडे बारीक लक्ष ठेवावं लागतं. १०० डिग्रीपेक्षा जास्त ताप, फ्ल्यूसदृश लक्षणं, धाप लागणं, छातीत वेदना, बीपी वाढणं ही ऑर्गन रिजेक्शनची लक्षणं आहेत. शिवाय शस्त्रक्रियेनंतर शरीरात कुठे इन्फेक्शन झालं आहे का हेही तपासावं लागतं. १०० डिग्रीपेक्षा जास्त ताप, थंडी भरून येणं, घसा खवखवणं, जखम भरून न येणं, सूज व वेदना, दीर्घकाळ राहणारा खोकला, डायरिया, मळमळ, फ्ल्यूसदृश लक्षणं यापैकी काहीही आढळल्यास त्वरित डॉक्टरी सल्ला घ्यावा लागतो.

सुदैवाने, जर बसवलेल्या ह्रदयामुळे रुग्णांच्या शरीरात कोणताही नकारात्मक परिणाम दिसला नाही तर एक ते दोन आठवड्यांत त्याला डिस्चार्ज मिळतो. प्रत्यारोपणानंतर रुग्णांची ठरावीक काळाने बायोप्सी केली जाते. बायोप्सीमध्ये हृदयाच्या खराब पेशी दिसल्या तर त्यानुसार आवश्यक उपचार केले जातात. बहुतेक वेळा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया इन्शुरन्स कंपन्यांंकडून कव्हर केल्या जातात.

दिलेल्या औषधांचं काटेकोर सेवन, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केलेला सातत्यपूर्ण आणि नियमित व्यायाम, हेल्दी फॅट्सचं प्रमाण वाढवून मीठाचं प्रमाणात सेवन अशी काही पथ्यं पाळून रुग्ण प्रत्यारोपणानंतरही उत्तम प्रकारे आयुष्य जगतात. जवळपास ८५% लोक सर्जरीआधी करत असलेल्या गोष्टी तितक्याच प्रभावीपणे करू शकतात.

हृदय प्रत्यारोपण तंत्र प्राथमिक अवस्था सोडून बरंच पुढं आलं आहे. पण तरीही अधिक दाते मिळण्यासाठी जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्यांबद्दल बोलताना ठीक आहे, पण आपण आपल्याच सुहृदांच्या किंवा आपल्या स्वत:च्या मरणोत्तर अवयव दानाबद्दल काही विचार केला आहे का?

 

लेखिका: स्मिता जोगळेकर 

सबस्क्राईब करा

* indicates required