computer

इसवीसन‌ पूर्व काळातील‌ वर्षे ही उलट क्रमाने का मोजली जातात?‌ हे वाचा आणि गोंधळ दूर करून‌ घ्या...

बऱ्याचदा इतिहासातल्या घटना वाचताना-ऐकताना इसवीसन पूर्व काळाचा संदर्भ येतो. पण इथं आपला गोंधळ उडतो‌ तो कालगणनेचा. कारण इसवीसन‌ पूर्व काळ हा उलट्या क्रमानं मोजला जातो. पण असं का? चला, समजून‌ घेऊया.

आपण वापरतो ती कालगणना 'ग्रेगोरियन कॅलेन्डर' किंवा ख्रिस्ती कालगणना म्हणून ओळखली जाते. यामध्ये हजारो‌ वर्षांचा काळ सोप्यारीतीने मोजता यावा यासाठी येशूच्या जन्माच्या घटनेला आधारभूत मानलं जातं आणि त्याप्रमाणे इतिहासातला काळ हा दोन‌ भागांत विभागला जातो. येशूच्या जन्मापूर्वीचा काळ हा 'ख्रिस्तपूर्व' (BC or Before Christ) तर येशूच्या जन्मानंतरचा काळ हा 'एनो डोमीनी' (AD or Anno Domini) या उपनामांनी ओळखला जातो.

एनो डोमीनी या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे 'प्रभूचं वर्ष'. पण कालगणना ही कोणत्याही धर्माशी किंवा श्रध्दास्थानाशी निगडीत असू नये, यासाठी बहुतांश देशात आज ख्रिस्तपूर्व काळाला 'BCE' (Before Common Era) आणि ख्रिस्त जन्मानंतरच्या काळाला 'CE' (Common Era) ही उपनामं लावली जातात. येशूचं दुसरं नाव हे 'इसा' असल्यानं या कालगणनेलाच‌ 'इसवी सन' असं म्हणतात.

इसवीसन पूर्व काळातल्या एखाद्या घटनेचं वर्ष सांगायचं झाल्यास ती घटना येशूच्या जन्माच्या किती वर्षांआधी घडली हे मोजलं जातं. उदाहरणार्थ, गौतम बुध्दांचा जन्म हा इ.स.पूर्व ५६३ मध्ये झाला, याचा अर्थ ही घटना येशूच्या जन्माआधी ५६३ वर्षे आधी घडली आणि मृत्यु इ.स.पूर्व ४८३ मध्ये झाला म्हणजेच तो येशूच्या जन्माआधी ४८३ वर्षांआधी झाला. आणखी एक उदाहरण घ्या. प्राचीन सिंधू संस्कृतीचं. या संस्कृतीची सुरूवात झाली BCE ३३०० मध्ये म्हणजे येशूच्या जन्माआधी ३३०० वर्षांपूर्वी या संस्कृतीचा उदय झाला. आणि ही संस्कृती लयाला गेली BCE १३०० मध्ये, म्हणजेच येशूच्या जन्माआधी १३०० वर्षांपूर्वी तीचा शेवट झाला.

यावरून तुम्हाला समजेल‌ की इसवीसन पूर्व (BCE) कालगणनेत येशूच्या जन्माआधीचा काळ जसजसा पाठीमागे मोजला जाईल, तसतसशी‌ वर्षसंख्या ही मोठी होत जाईल. याउलट जसजसा तो येशूच्या जन्मवर्षाच्या जवळ येईल, तसतशी वर्षसंख्या कमी होत जाईल. येशूच्या जन्माच्या आधीची ५ वर्षे ही ख्रिस्तपूर्व ५, ४, ३, २ अशा उलट्या क्रमानं असतील आणि येशूच्या जन्मवर्षाआधीचं एक वर्ष हे इ.स.पूर्व १ असेल.

यानंतर सुरू होईल 'इसवी सन' (AD or CE) कालगणना. येशुच्या जन्माचं वर्ष हे इसवी सन १ आहे. त्यापुढचा काळ हा २, ३, ४, ५ अशा सरळ क्रमात मोजला जातो. हे वर्ष आहे २०२०. याचा अर्थ येशूच्या जन्मापासून आतापर्यंत २०२० वर्षे लोटली आहेत.

आता तुम्हाला कोणीही विचारलं की इसवीसन पूर्व २००० आणि ५०० या दोन्हींमधला आधीचा काळ कोणता? तर उत्तर असेल इ.स.पूर्व २०००!! आणि त्यानंतर १५०० वर्षांनी आलं इ.स.पूर्व ५००. याऊलट इसवी सन १९०० आणि २००० या दोन्हीमध्ये आधीचा काळ आहे इ.स १९००!!

आता झाला ना गोंधळ दूर? तुम्हांला असे आणखी काही प्रश्न पडले असतील तर विचारा. आम्ही नक्कीच त्याचं उत्तर घेऊन येऊ.

सबस्क्राईब करा

* indicates required