प्रचंड ताकदीने कोसळणारा नायगरा धबधबा दोनवेळा संपूर्ण कोरडा पडला होता? काय घडले होते तेव्हा?

उत्तर अमेरिका खंडातील प्रेक्षणीय व अपूर्व देखाव्यांपैकी एक जगप्रसिद्ध धबधबा म्हणजे नायगारा. या धबधब्यात सगळ्यात उंचीवरून पाणी पडताना पाहणे म्हणजे पर्वणीच असते. हा कॅनडा व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या सरहद्दीवर आणि ईअरी व आँटॅरिओ या सरोवरांना जोडणार्या नायगारा नदीवर आहे. गोट बेटामुळे या धबधब्याचे दोन भाग झाले आहेत. कॅनडाकडील धबधब्यास 'कॅनडियन फॉल्स' किंवा 'डॉर्सशू फॉल्स' व अमेरिकेकडील धबधब्यास 'नायगारा फॉल्स' किंवा 'अमेरिकन फॉल्स' असे म्हणतात. या नायगारा धबधब्याला दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देत असतात. पण तुम्ही कधी ऐकलेय? हा धबधबा सुकलाय? किंवा यातले सगळे पाणी संपलेय आणि हा कोरडा पडलाय! तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की आजपर्यंत इतिहासात असे दोनदा घडले आहे.
पहिली घटना घडली ती १८४८ ला. २८ मार्च आणि २९ मार्च १८४८ला जेव्हा एरी लेकवरुन बनलेला बर्फ फुटू लागला. तेव्हा तलावाच्या विरुद्ध दिशेला जोरदार वारा वाहू लागला. तो वारा इतक्या जोरात होता की त्यामुळे सर्व बर्फ नायगारा नदीच्या मुखात साठून राहिला. ते थंडगार बर्फाचे तुकडे खूप मोठे आणि कठीण होते. अक्षरशः कोट्यवधी टन इतक्या बर्फाने पाण्याचा प्रवाह रोखून धरला आणि पाणी वाहायचे थांबले. फोर्ट एरीचे नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले होते. जवळपासच्या पीठ गिरणी कामगारांना दिसले की पाणी थांबले आहे, तेव्हा त्यांनी नदीवर जाऊन पाहिले. नदीचे कोरडे पात्र पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या पाण्याचे चाकांचे काम थांबलेले आढळले. असे म्हणतात तेव्हा १८१४ च्या चिपावाच्या युद्धातील पाण्यात टाकून दिलेली काही शस्त्रे दिसली. काहींना पाइनचे लाकूड दिसले. असे अचानक पाणी संपणे इतके विचित्र होते की लोक घाबरले. हा जगाचा शेवट आहे की काय, अशी भीती त्यांना वाटली. म्हणून त्यांनी चर्चमध्ये जाऊन एकत्र प्रार्थना केली. धबधब्यात पाणी सुरू व्हायला ३० तास गेले. काहीकाळाने वाऱ्याची दिशा बदलली, बर्फ तुटला आणि अडकलेले पाणी वाहायला लागले. नायगारा नदीत पाणी आल्यामुळे धबधबा ही वाहू लागला. तेव्हा सगळ्यांना हायसे वाटले. पण अशी घटना ऐतिहासिकच होती.
दुसरी घटना घडली १९६९ साली जेव्हा नायगारा धबधबा 'बंद' झाला होता. २५ जून, १९६९ ते २ नोव्हेंबर १९६९ पर्यंत अमेरिकन सैन्य दलाच्या अभियांत्रिकी महामंडळाने नायगारा धबधब्यात एक ६०० फूट धरण बांधले. हे धरण बांधण्यामागचा उद्देश असा होता की भूगर्भशास्त्रज्ञ खाली दगडी बांधकामांचा अभ्यास करू शकतील. ते धरण बांधल्यामुळे पाणीही वळणार होते. त्या धरणाला पाणी वळविण्यासाठी २७,८०० टन खडक व माती लागली. हे काम झाल्यावर पर्यटकांसाठी एक वॉकवेही बांधला गेला. पण जसे भूगर्भशास्त्रज्ञांनी काम संपवले, धरण खाली कोसळलेबव एका रात्रीनंतर पाणी परत आधीसारखे वाहू लागले. नंतर सर्वांनी ठरवले की या नैसर्गिक प्रवाहाशी कोणीही खेळायचे नाही. निसर्गात ढवळाढवळ करायचा मानवाचा प्रयत्न या नायगारा धबधब्याने हाणूनच पाडला.
असं म्हणतात हा पाण्याचा प्रवाह थांबण्याची अजून एक घटना घडू शकते. कदाचित काही तासांसाठी नायगारा धबधब्याचे पाणी थांबू शकते! येत्या काही वर्षांत ११५वर्षे जुन्या असलेल्या पादचारी पुलांची दुरुस्ती करण्यासाठी न्युयॉर्क राज्याने गोट आयलंड जवळील पाणी वळवण्याची योजना केली आहे. पण यासाठी फक्त १५ टक्के नायगारा धबधब्याचा प्रवाह वळवला जाऊ शकतो. तितका भाग कोरडा दिसू शकेल. उर्वरित भागात पाण्याचा प्रवाह वाढेल. यासाठी जवळपास २६ मिलियन डॉलरचा खर्च अपेक्षित आहे.
पुढे येणारा काळच ठरवेल की हा प्रयत्न जमतोय का फसतोय! कारण निसर्गात झालेली ढवळाढवळ कधीकधी उलटूही शकते.
लेखिका: शीतल दरंदळे