ज्यांच्या शिफारसीवरून ५००आणि १०००रूपयांच्या नोटा बंद केल्या, हे अनिल बोकील आहेत तरी कोण ?
काल रात्री ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अधिकृत सरकारी चलन म्हणून बाद केल्यावर अचानक अनिल बोकील या नावाची चर्चा सुरु झाली आहे. कोण आहेत हे अनिल बोकील ?
अनिल बोकील नावाचा बोलबाला तेव्हा झाला जेव्हा त्यांना पंतप्रधान मोदींनी त्यांना फक्त ९ मिनीटांसाठी भेटण्याची वेळ दिली होती आणि प्रत्यक्षात चर्चा दोन तासांपर्यंत लांबली. अनिल बोकील हे अर्थक्रांती संस्थानचे एक महत्वाचे सदस्य आहेत. अर्थक्रांती ही पुण्यातल्या काही विचारवंतांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे.
काळा पैसा , चलन फुगवटा, महागाई , भ्रष्टाचार , दरडोई उत्पन्नात वाढ. अतिरेकी संस्थांना होणारा अर्थ पुरवठा या सर्व समस्या ताबडतोब आटोक्यात आणाण्यासाठी त्यांनी एक पाच सूत्री कार्यक्रम बनवला आहे. पंतप्रधान आणि अनिल बोकील यांच्या चर्चेतला महत्वाचा मुद्दा आज प्र्त्यक्षात अंमलात आला आहे .
अर्थक्रांतीच्या पंचसूत्री कार्यक्रम असा आहे:-
१ )आयात कर वगळता आयकरासहित एकूण ५६ प्रकारचे कर रद्द करण्यात यावेत. परिणामी पेट्रोल डिझेलसहित सर्व रोजच्या वापरताल्या वस्तू स्वस्त होतील. करदात्यांच्या हातात येणारा पगार वाढेल आणि खर्चाचे प्रमाण ही वाढेल. अशा पध्दतीने उद्योगाला चालना मिळेल आणि काळा पैसा तयार होण्याचे थांबेल.
२) १०००/५००/१०० च्या नोटा रद्द कराव्या. यामुळे आजच्या तारखेस पोत्यात भरून ठेवलेले चलन बदलणे भाग पडेल. मोठ्या नोटा नसल्यावर खोट्या चलनी नोटा छपण्याचे धारिष्ट्य कोणीही करणार नाही. अतिरेक्यांना पैसा पुरवणे कठीण होईल . आकाशाला भिडणारे घरांचे दर मर्यादित होतील.
३ ) अमुक मर्यादेच्या पलीकडील सर्व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करण्याची सक्ती व्हावी.
४) रोख पैशांच्या व्यवहारावर मर्यादा घालावी .
५) बँक ट्रँजॅक्शन टॅक्स हा एकच कर अमलात आणावा. तो कर जास्तीत जास्त २ टक्के आणि कमीतकमी ०.७ टक्के असावा. असे केल्यास जितका कर गोळा केला जातो त्यापेक्षा जास्त ४००००० करोड कर सरकारला मिळेल.
जर खरोखरी अनिल बोकीलांच्या सर्व शिफारसींचा शासनाने विचार केला, तर आपल्याला कमी कर भरावे लागून जास्त पगार मिळेल.




