४६ वर्षांनतर पहिल्यांदाच भारतीय संघात सामील झालाय पारसी खेळाडू....त्याची आजवरची कामगिरी पाहून घ्या !!

टी-ट्वेन्टीचा सर्वात मोठा सण आयपीएल अर्ध्यात आवरला गेला असला तरी कसोटी प्रेमींसाठी मेजवानी येत आहे. नुकतेच बीसीसीआयने जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली आहे. सोबतच इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांसाठी देखील संघाची निवड करण्यात आली आहे.
या निवड झालेल्या संघात स्टॅन्डबाय प्लेयर म्हणून निवड झालेल्या गुजरातचा वेगवान बॉलर अर्जन नागवासवाला याने पहिला सामना खेळण्यापूर्वीच एक इतिहास घडवला आहे. अर्जन हा भारतीय संघात सामील होणारा ४६ वर्षांनंतर पहिला पारसी खेळाडू ठरला आहे. अर्जनच्या आधी भारताकडून फारुख इंजिनिअर या पारशी खेळाडूने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
अर्जन नागवासवाला हा गुजरातच्या वलसाड येथील नारगोल गावाचा आहे. त्याने गुजरातसाठी १६ प्रथम श्रेणी, २० लिस्ट ए तसेच १५ टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने अनुक्रमे ६२, ३९ आणि २१ विकेट्स पटकावल्या. अर्जनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर त्याचा राष्ट्रीय संघाचा मार्ग सुकर झाला आहे. महाराष्ट्र विरुद्ध खेळताना त्याने अवघ्या १९ धावा देत ६ विकेट पटकावल्या होत्या.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पारसी खेळाडू संख्येने कमी असले तरी महत्त्वाची कामगिरी करून गेले आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघात डायना एडलजी या महिला पारशी क्रिकेटपटुचा समावेश होता. डायना यांनी भारतासाठी शेवटचा सामना १९९३ साली खेळला होता.
क्रिकेटबद्दल अशी आणखी कोणती माहिती तुम्हांला वाचायला आवडेल हे आम्हांला जरूर कळवा.