युक्रेनच्या बाजूने सायबर युद्धात उतरला आहे ॲनोनिमस हॅकर ग्रुप!! कोण आहेत हे आणि ते काय करतात?
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी समोर येत आहेत. रशियाच्या तगड्या आक्रमणापुढे टिकाव धरणे युक्रेनला कठीण होऊन बसले आहे. यातच पुढची कडी म्हणजे सायबर वॉर! रशियाच्या सायबर हल्ल्याला तोंड देणे युक्रेनला कठीण होऊन बसले आहे. यातच ॲनोनिमस नावाच्या जगातील सर्वात प्रसिद्ध हॅकर ग्रुपने युक्रेनकडून रशियाविरुद्ध सायबर हल्ल्याचे बिगुल फुंकल्याने या विषयाला वेगळेच वळण लागले आहे.
ॲनोनिमस ग्रुपचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. या हॅकर ग्रुपची जगभर चांगलीच लोकप्रियता आहे. हॅकर होण्याची इच्छा असणाऱ्या मुलांसाठी हा ग्रुप म्हणजे साक्षात गुरुस्थानी आहे. या ग्रुपवर जितकी टीका होते तितकेच त्यांचे चाहतेही आहेत. हा ग्रुप चुकीच्या गोष्टींविरुद्ध सायबर वॉर छेडतो असे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे असते.
रशियाने युक्रेन विरुद्ध पुकारलेल्या युद्धाला विरोध म्हणून रशियाच्या अनेक महत्वाच्या वेबसाईटवर या हॅकर ग्रुपने हल्ला केला. या हल्ल्यामुळे त्यांच्या कित्येक महत्वाच्या साईट्स डाऊन झाल्या. या ग्रुपचा ना कोणी लीडर आहे, ना या मागील चेहरे आजवर कधी समोर आले आहेत. त्यांचे ब्रीदवाक्य है 'आम्ही सेना आहोत' असे आहे. यावरून या समूहात बरेच लोक असण्याची शक्यता आहे.
त्यांनी घातलेला मास्क ही त्यांची एकमेव ओळख आहे. हा मास्क एलन मुर या लेखकाच्या व्ही फॉर व्हेंडेंटा या पुस्तकातील नायकाच्या मास्कवरून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. या पुस्तकात देखील नायक मास्क घालून चुकीच्या कारस्थानांना उघडे पाडत असतो.
तसेच सोळाव्या शतकात स्पेनकडून लढणारा एक योद्धा गाय फॉक्स याची वेशभूषा बघितली तर सध्याच्या ॲनोनिमसच्या मास्कशी जुळते. यावरून अनेकांना असेही वाटते की त्यांनी या गाय फॉक्सकडून प्रेरणा घेतली असावी.
हा ग्रुप ऑनलाइन चॅटरूममध्ये भेटून आपली मोहिम ठरवतो. मध्यंतरी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड नामक कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या झाल्यावर त्यांनी पोलिसांची अनेक अकाउंटस् हॅक केली होती.
आपण जगातील प्रायव्हसीसाठी लढतो असा त्यांचा दावा आहे. जगात कुठलीही मोठी घडामोड घडत असली ही हा ॲनोनिमस हॅकर ग्रुप आपल्या काही ना काही उचापत्यांनी चर्चेत येत असतो. याआधी अनेक वेळा अमेरिकन सरकारच्या एजन्सी, सीआयए यांना त्यांनी टार्गेट करून झाले आहे.
२००८ साली एपिलेप्सी फाउंडेशनला निशाणा केल्यावर त्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. वेस्टबोरो बाप्टिस्ट चर्च, आयसिस, चर्च ऑफ सायंटोलॉजी यांना पण त्यांनी निशाणा केले होते. आयसिसच्या हजारहून जास्त साईट्स बंद केल्याचा दावा त्यांनी केला होता.
उदय पाटील




