computer

भूकंप नेमका होतो कसा? एपिसेंटर, रिश्टर स्केल म्हणजे काय? ते कसं मोजतात? जाणून घ्या सविस्तर माहिती...

देशात नुकतेच ओडिशा, छत्तीसगड, आणि काल मिझोराममध्ये लागोपाठ भूकंपाचे तीव्र झटके बसलेले आहेत. दरवर्षी असे हजारो लहान-मोठे भूकंपाचे धक्के बसत असतात. काही क्षणांत एखाद्या विस्तिर्ण प्रदेशातल्या घरे-इमारती जमीनदोस्त करून मोठ्या प्रमाणात वित्त आणि जिवितहानी करणारे हे भूकंप नेमके कसे तयार होतात? त्यांची तीव्रता कशी मोजली मोजली जाते? ही सगळी सविस्तर ‌माहिती आज आपण या लेखात घेऊयात.

भूकंप म्हणजे काय आणि तो नेमका कसा येतो?

भूकंपाची निर्मिती जाणून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची संरचना समजून घ्यायला हवी. कांद्याला जसे अनेक थर असतात, त्याच प्रकारे आपली पृथ्वी ही अनेक थरांनी बनलेली आहे. तुम्ही हे वाचलं असेल की अब्जावधी वर्षांपुर्वी पृथ्वी हा एक तप्त गोळा होता. हळूहळू पृथ्वीचा बाह्य थर थंड होत गेला. मात्र आजही पृथ्वीच्या गर्भात प्रचंड उष्णता आहे. पृथ्वीचे मुख्य तीन थर आहेत‌. पहिला आहे केंद्राभोवतीचा गाभा (Core), या गाभ्याभोवती आहे प्रावरण (Mantle) आणि प्रावरणाभोवती आहे भूकवच (Crust). पृथ्वीचे प्रावरण हे प्रवाही आणि उष्ण अशा खडकांनी बनलंय. पृथ्वीच्या गाभ्याचेही दोन भाग आहेत. एक बाह्यगाभा जो वितळलेल्या, प्रवाही अशा लाव्हा स्वरूपात आहे, तर दुसरा अंतर्गाभा हा घन-धातू स्वरूपात आहे.

पृथ्वीचं बाह्यकवच किंवा भूकवच हे सुमारे १०० किलोमीटर जाडीचं आहे. ते एकसंध नाही, तर ते ७ मोठ्या (युरेशियन भूपट्ट, आफ्रिकी भूपट्ट, ऑस्ट्रेलियन भूपट्ट, पॅसिफिक भूपट्ट इ.) आणि १४ लहान (भारतीय भूपट्ट, अरेबीयन, कॅरीबियन भूपट्ट, स्कॉटिआ भूपट्ट इ.) भूपट्टांनी (टेक्टॉनिक प्लेट्स) बनलेलं आहे. पृथ्वीच्या गाभ्यातल्या प्रचंड उष्णतेमुळं वितळलेल्या लाव्हा स्वरूपातील प्रावरणाचा भाग वरच्या दिशेने प्रसरण पावतो, प्रवाहित होतो, आणि थंड झाला की परत खाली खचतो. पाण्यावर जसे लाकडाचे तराफे तरंगतात त्याच पध्दतीने तरल रूपातल्या प्रावरणावरती विशाल भूपट्ट मंदगतीने तरंगत असतात.

या प्लेट्स एकमेकांवर आदळणे, एकमेकांत अडकणे, घर्षण होणे आणि एकमेकांपासून दूर सरकणे हे सारे अतिशय संथ गतीने पण नेहमीच होत असते. कधीकधी या भूपट्टांच्या कडा एकमेकांत अडकून दोन्ही बाजूच्या खडकांमध्ये प्रचंड ताण निर्माण होतो. त्यामुळे ते तुटून वेगळे होतात व पुढे-मागे, वर-खाली सरकतात. याला 'प्लेट टेक्टॉनिक' म्हटलं जातं. हे खडक तुटून वेगळे होताना वर्षानूवर्षे साठलेली उर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दिशेने विमुक्त होते. या उर्जेच्या शक्तीशाली लहरींमुळेच जमिनीवर सौम्य आणि तीव्र स्वरूपाची कंपने निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला जमिन थरथरणे, हादरे बसणे, जमिनीला भेगा पडणे असे प्रकार अनुभवायला मिळतात. यालाच आपण भूकंप म्हणतो.

आताचे खंड, पर्वत, ज्वालामुखी, या सर्व गोष्टी या प्लेट्सच्या वेगळं होणं आणि एकमेकांवर आदळल्यानं निर्माण झालेल्या आहेत. कोट्यावधी वर्षांपूर्वी एकसंध असलेली ही जमीन हळूहळू वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागली जाऊन आताचे खंडिय आणि समुद्री भूपट्ट बनलेले आहेत आणि अजूनही ते बनत आहेत.

भारतात आतापर्यंत झालेले काही मोठे भूकंप:

२६ जानेवारी २००१ - गुजरातमधल्या कच्छ जिल्ह्यात झालेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपानं ३० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला, १ लाख ६६ हजार लोक जखमी झाले, आणि जवळपास ४ लाख घरं उध्वस्त झाली होती.

(कच्छ येथील भूकंप)

३० सप्टेंबर १९९३ - लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी आणि आसपासच्या गावात आलेल्या ६.३ तीव्रतेच्या भूकंपानं ७ हजार ९२८ लोक मृत्युमुखी पडले, १६ हजार लोक जखमी झाले, १५ हजार ८५४ जनावरांचा मृत्यू झाला, ५२ गावातील ३० हजार घरं जमिनीत गडप झाली, आणि १३ जिल्ह्यातल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले होते.

१५ ऑगस्ट १९५० - उत्तर आसाममध्ये आलेल्या ८.५ तीव्रतेच्या भूकंपामुळं ११ हजार ५३८ लोकांचा बळी गेला होता.

(उत्तर आसाम येथील भूकंप)

१५ जानेवारी १९३४ - नेपाळ आणि बिहारमध्ये झालेल्या ८.१ तीव्रतेच्या भूकंपामुळं १० हजार ७०० लोकांचा मृत्यु झाला होता.

(नेपाळ आणि बिहार येथील भूकंप)

एपिसेंटर आणि हायपोसेंटर

भूकंपाची दोन केंद्रं असतात - एक हायपोसेंटर आणि दुसरं एपिसेंटर. जमिनीच्या पृष्ठभागाखाली जिथे दोन भूपट्ट तुटतात म्हणजेच जिथून भूकंपाची सुरूवात होते, त्या दोन्ही खडकांच्या सीमेवरील बिंदू हा हायपोसेंटर असतो. हे हायपोसेंटर जमिनीत जेवढ्या खोलवर असेल तितकीच भूकंपाची तीव्रता कमी असते, आणि ते जितके ते जमिनीच्या पृष्ठभागाच्या जवळ असेल तेवढीच भूकंपाची तीव्रता जास्त असते.

दुसरीकडे एपिसेंटर किंवा अभिकेंद्र हा तो बिंदू आहे जो हायपोसेंटरच्या थेट वरती जमिनीच्या पृष्ठभागावर असतो आणि तो नकाशात दाखवता येतो. शांत पाण्यात खडा टाकल्यानंतर जसे गोलाकार तरंग निर्माण होतात तसेच या अभिकेंद्रापासून कंपन लहरी बाहेरच्या दिशेने पसरतात. या अभिकेंद्रावर भूकंपाची तीव्रता सर्वाधिक असते आणि जसजसे आपण अभिकेंद्रापासून दूर जाऊ तसतसे या कंपनांची तीव्रता कमी होत जाते. भूकंप कुठे झाला, हे सांगतेवेळी प्रामुख्यानं हे अभिकेंद्र लक्षात घेतलं जातं.

भूकंपाची तीव्रता कशी मोजतात?

(भूकंपमापक यंत्र)

"भूकंपाचं केंद्र कोणतं?" यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो "भूकंप किती मोठा होता?" भूकंपाची तीव्रता ही अवमुक्त झालेल्या उर्जेच्या आधारावर मोजली जाते आणि ती मोजण्याचं एकक आहे- रिश्टर स्केल. १९३५ मध्ये चार्ल्स रिश्टर या भू-वैज्ञानिकाने भूकंपातून निर्माण होणाऱ्या तरंगाना मापण्यासाठी रिश्टर स्केलची निर्मिती केली. लघूरूपात याला लोकल मॅग्नीट्युड (ML) लिहीतात. कंपनाचे मापन करण्यासाठी भूकंपमापक यंत्र (seismograph) वापरलं जातं. हे यंत्र भूकंपाच्या लहरींचं कागदावर चित्रण करतं. भूकंपमापकावर चित्रित झालेल्या भूकंपलहरींच्या सर्वोच्च एककाचे लघुगणक एककात (Logarithmic scale) रूपांतर करून स्केलमधील तीव्रता काढली जाते.

रिश्टर स्केल हे एकक भूकंपाच्या तरंगाना अंकांमध्ये मापण्यासाठी वापरलं जातं. हे आपल्या मूळ किंमतीच्या १० पट अधिक किंमतीत व्यक्त होतं. म्हणजे १ रिस्टर स्केल हे वास्तविक १० असतं, तर २ रिश्टर स्केल हे १०० होईल. रिश्टर स्केल एका युनिटने वाढल्यास भूकंपाची तीव्रता १० पटींनी वाढलेली असते आणि प्रत्येक वाढणाऱ्या युनिट मागे अवमुक्त होणारी उर्जा ३१.६ पटींनी वाढलेली असते. थेट शब्दांत सांगायचं तर रिश्टर स्केल ०.२ एककांनी वाढला तर अवमुक्त होणारी उर्जा दुपटीने वाढते.

रिश्टर स्केलच्या मदतीने भूकंपाच्या तीव्रतेनुसार त्याचे वर्गीकरण खालील पध्दतीने केलेले आहे.

२.० आणि त्यापेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप हे जगात कुठे ना कुठे दररोज होत असतात. पण यांचा प्रभाव सहसा मानवी जीवनावर दिसून येत नाही. याऊलट ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप अतोनात नुकसान घडवू शकतात. इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप हा हा २२ मे १९६० रोजी चिली देशात झाला होता. या भूकंपाची तीव्रता ९.४ ते ९.६ इतकी नोंदवली गेलीये. ज्याचा परिणाम जपान, फिलीपीन्स, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड या देशांपर्यंत दिसून आला होता.

वाचकहो, भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे. कितीही प्रयत्न केला तरी ती टाळता येत नाही. आपण फक्त हे का आणि कसे घडते हेच जाणून घेऊ शकतो. हो ना?

सबस्क्राईब करा

* indicates required