दुचाकी आणि चारचाकींच्या इन्शुरन्सचे कोणते नियम मागे घेतले गेलेत? त्यांचं आणि गाड्यांच्या स्वस्ताईचं काय गणित आहे?

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सुखद बातमी यायचे काय नाव घेत नाहीये. पण ज्यांना नवीन गाड्या घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आली आहे. आता नवीन कार किंवा बाईक विकत घेणे स्वस्त होणार आहे. भारतातली इन्शुरन्स नियमक संस्था- इरडा या संस्थेने लॉंग टर्म पॅकेज्ड थर्ड पार्टी आणि ऑन डॅमेज पॉलिसी नियम मागे घेतले आहेत. या नियमांनुसार कारसाठी ३ वर्षांचा आणि दुचाकीसाठी ५ वर्षांचा थर्ड पार्टी कव्हर घेणे अनिवार्य करण्यात आले होते. यामुळे कार किंवा बाईक विकत घेत असताना वाहनाची किंमत वाढत असे. लॉकडाऊनमुळे सगळ्याच गोष्टींची खरेदी बंद आहे. त्यात कार आणि बाईकचाही समावेश आहेच. या खरेदीला पुन्हा चालना मिळावी या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
इरडाच्या साईटवर या संबंधी माहिती देण्यात आली आहे. लॉंग टर्म पॅकेज्ड प्रॉडक्ट हटविण्याचा निर्णय लवकरच अंमलात येईल असे त्यात म्हटले आहे. हा नियम २०१८ पासून सुरू करण्यात आला होता. त्यावेळी १ लाख ८० हजार पैकी फक्त ६० हजार वाहन इन्शुरन्स होते.
सध्या असलेल्या लॉंग टर्म पॅकेज कव्हरची चिकित्सा केल्यावर १ ऑगस्टपासून नव्या कार्ससाठी ३ वर्षं आणि २ व्हीलरसाठी ५ वर्षांच्या थर्ड पार्टी आणि ऑन डॅमेज कव्हर घेण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. याचा अर्थ आता विमा कंपन्या तीन किंवा पाच वर्षांच्या थर्ड पार्टी कव्हरसोबत फक्त एक वर्षांच्या ऑन डॅमेज कव्हरची विक्री करू शकतात. आधी याऐवजी लॉंग टर्म पॅकेज कव्हर घेणे गरजेचे होते.
थर्ड पार्टी इन्शुरन्स काय असतो?
मोटार व्हेईकल ऍक्टनुसार सगळ्या गाड्यांसाठी थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स किंवा थर्ड पार्टी विमा कव्हर करणे गरजेचे असते. जर तुमच्या वाहनामुळे दुसऱ्याला किंवा त्याच्या प्रॉपर्टीला नुकसान होत असेल तर ही विमा पॉलिसी याला कव्हर करण्याचे काम करत असते. याला विमा घेणारा पहिली पार्टी असतो. विमा कंपनी दुसरी पार्टी. तर ज्याचं किंवा जिचं नुकसान होतं ते तिसरी पार्टी. यात तिसरी पार्टी नुकसान झाले की दावा करते. त्यातल्या त्यात ऑन डॅमेज पॉलिसीमध्ये थर्ड पार्टी पॉलिसीचे सगळ्या कव्हर व्यतिरिक्त विमा असलेल्या वाहनालासुद्धा नुकसानीमुळे विमा संरक्षण मिळतं.
सोशल डिस्टन्सिंगमुळे सार्वजनिक वाहनांपेक्षा खाजगी वाहन वापरण्याकडे लोकांचा कल वाढतोय. तुम्हांला नवी कार किंवा बाईक घ्यायची असेल तर या बदललेल्या नियमांचा तुम्हांला फायदा होईल. आणि तुम्हांला खरेदीसाठी कोणती गाडी घ्यावी, त्यांच्या किंमती काय, इतर गाड्यांच्या तुलनेत तुमच्या आवडीची गाडी कशी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आमचे बोभाटा सुस्साट व्हिडीओज नक्की पाहा..