कोणताही सिनेमा शुक्रवारी का रिलीज होतो?

आठवडाभर कामाच्या रगाड्यात वैतागल्यानंतर शुक्रवार म्हणजे एक वरदान असतं, नाही का?  

शनिवार-रविवार कसा घालवायचा? बाहेर फिरायला जायचं की घरकाम करायचं, का मित्रांसोबत पार्टी करून टल्ली व्हायचं? असे अनेक प्लॅन तुम्ही बनवत असाल. पण आपण शुक्रवार वाट आणखी एका कारणानं पाहात असतो, ते म्हणजेच रिलीज होणाऱ्या नवीन सिनेमाचं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की हे सिनेमे शुक्रवारीच का रिलीज होतात?

तर आज मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे.  आपल्याकडे ही प्रथा आली हॉलिवूडमधून. १५ डिसेंबर १९३९ या शुक्रवारी "गॉन विथ द विंड" हा सिनेमा रिलीज झाला आणि त्यानं काय इतिहास घडवला हे तर तुम्हांला माहित आहेच. तसेही हे सिनेमावाले ’लक’वरती खूपच विश्वास ठेवतात. त्यामुळं शुक्रवारला लकी मानून हॉलिवूडमधले सगळे सिनेमे शुक्रवारीच रिलीज करण्यात येऊ लागले.  तुम्हाला प्रश्न पडला असेल ना,  आम्हाला ह्याचं उत्तर कुठून सापडलं? अरे भाऊ, सोप्पं आहे. इंटरनेटवर शोधाशोध केल्यावर सगळं काही सापडतं. 

’गॉन विथ द विंड’नंतर हॉलिवूडमध्ये सुरुवात झाली असली तरी भारतात ही प्रथा सुरु व्हायला १९६०चं दशक उजाडावं लागलं.  'मुघल-ए-आझम' हा अजरामर सिनेमा १९६० साली एका शुक्रवारी रिलीज झाला आणि त्यापुढं खऱ्या अर्थानं भारतात फ्रायडे रिलीजला सुरवात झाली. तसं पाहाता शुक्रवार हा सुट्ट्यानां जोडून असल्यामुळं सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना शुक्रवारी सिनेमा रिलीज करणं हे धंद्याच्या दृष्टीनं पण सोयीचं आहे.

आपल्याकडं प्रत्येक गोष्टीला धार्मिक आधार असतो.  तसा याही प्रश्नाला आहे. काही लोकांच्या मते शुक्रवार हा लक्ष्मीचा वार असल्यानं महत्वाचा आहे. त्यामुळंही सिनेमा डिस्ट्रीब्युटर्स लोकांच्या मानण्यानुसार त्यांच्या व्यवसायासाठी फ्रायडे रिलीज फायद्याचा आहे. धार्मिक आणि तितकीच अंधश्रद्धाळू असलेली ही बॉलीवूडनगरी हा नियम चांगलाच पाळते. 

आता नियम म्हटलं की अपवाद असणारच.  आजकाल सुट्ट्यांची सोय बघून कधी सिनेमा बुधवारी, तर कधी शुक्रवारी रिलीज केला जातो. तरीही जास्तीत जास्त सिनेमे शुक्रवारीच रिलीज होतात. तर अशी आहे मला सापडलेली स्टोरी.  तुम्हाला अजून काही वेगळी माहिती आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required