मुव्हिंग डे काय असतो? कॅनडाच्या या शहरात एकाचवेळी लाखो लोक घर का बदलतात?

प्रत्येक देशाची वेगळी परंपरा असते. तिथले लोक, त्यांचे राहणीमान, घरं, संस्कृती यावरून त्या देशाची ओळख होत असते. आपल्याकडे स्वतःचे घर असणे हे खूप महत्वाचे मानले जाते. म्हणजे स्वतः चं घर असेल तर तो सुखी आणि जो भाड्याने राहतो त्याला केविलवाण्या नजरेने पाहिले जाते. बिचारा अजून विंचवासारखे घर पाठीवर घेऊन फिरतोय बघा. अशी वाक्य ऐकायला मिळतात. इतकेच काय तर मुलगा बघतानाही स्वतःचे घर असणे ही सर्वात मोठी अट असते. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कॅनडामध्ये मॉन्ट्रियल या शहरात जवळपास ४५% लोक भाडयाने राहतात. आणि तिथे दरवर्षी १ जुलै हा 'मुव्हिंग डे' म्हणजे घर खाली करून दुसऱ्या घरात जायचा दिवस म्हणून साजराही करतात. 'मुव्हिंग डे' ची रंजक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
१ जुलै ही खरंतर कॅनडाची राष्ट्रीय सुट्टी असते. पण एक परंपरा म्हणून इथे मुव्हिंग डे पाळला जातो. ही परंपरा १७५० ची आहे. कॅनेडत फ्रान्सने वसाहत स्थापन केल्यानंतर त्याला न्यू-फ्रान्स नाव दिले होते. या भागाचे महत्त्वाचे अधिकारी फ्रान्सोइस बिगोट (François Bigot) यांनी १ मे हा मूव्हिंग डे ठरवला होता. १८६६ मध्ये हे आदेश नागरी कायद्यांमध्ये औपचारिकपणे केले गेले होते. १९७४ पर्यंत ते तसेच होते. या कायद्यामुळे घरमालक आणि भाडेकरू यांच्यात कुठलेही वाद न होता सहमतीने १ मे ही तारीख ठरवणे आणि कायद्यानुसार करार करून त्यावर सही करणे ठरवले जाते. पण नंतर ही तारीख ३० एप्रिल पासून पुढे ३ महिने वाढवण्यात आली. ३० जून हा शेवटचा दिवस ठरवून १ जुलै हा मूव्हिंग डे झाला. आणि तो आजही पाळला जातो. तसा काही कायदा नाही पण एक परंपरा म्हणून तोच दिवस पाळला जातो. आणि विशेष म्हणजे या एका दिवशी लाखो लोक घरं बदलतात.
मॉन्ट्रियल हे कॅनडाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. इथली घरं त्याच्या गोल जिन्यांसाठी(spiral staircase) ओळखली जातात. प्रत्येक घराबाहेर असे जिने असतातच. मागच्या वर्षी मॉन्ट्रियलमध्ये तब्बल २,५०,००० लोकांनी मूव्हिंग डेच्या दिवशी घरं बदलली होती. ७०,००० कुटुंब जेव्हा एकत्र घरं बदलतात तेव्हा माँट्रियालचे रस्ते गर्दीने भरून जातात. अनेकजण आपल्या गाड्या भरून सामानाची ने आण करताना दिसतात. या शहरात एकूण लोकसंख्येच्या मानाने घरमालक फक्त ५५ टक्के आहेत. कुठल्याही शहरातील हा सर्वात कमी दर आहे.
या मुव्हिंग डे ची तयारी १ महिना अगोदर पासून सुरू होते. घर शोधणे तिथल्या सोयी बघणे, सामानाची आवरावर करणे, ते व्यवस्थित पॅक करण्यासाठी बॉक्स आणून ठेवणे. अशी एक ना अनेक कामं असतात. तसेच माँट्रियालर्ससाठी हे एक सर्वात मोठे आव्हान म्हणजे या दिवसांमध्ये गोळा होणारा कचरा! या दिवसांत जवळपास ५,५०,००० टन कचरा जमा होतो. त्यात तुटके फर्निचर, जुने कपडे, पेपरबॉक्स, मुलांची जुनी खेळणी आणि खराब झालेले स्वयंपाकघरातील सामान असे बरेच काही साठते. अवजड वस्तूं डम्पिंग ग्राऊंड वर टाकल्या जातात. शहर रहिवाशांना जास्तीत जास्त रिसायकल करण्यासाठी सांगितले जाते. पण नीट माहिती नसल्याने वस्तू तशाच फेकल्या जातात. यात अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा भाग, टायर, बांधकाम साहित्य आणि पेंट्स असतात.
या विचित्र परंपरेमुळे अनेक गोष्टींवर ताण येतो, त्यात सामान हलवून देणाऱ्या कंपन्यांचे मालक आणि कर्मचारीही असतात. त्यांना या दिवसात १४, १५ तास काम करावे लागते. मे महिन्यांत त्यांना जास्तीचे कर्मचारी कामावर घ्यावे लागतात. त्यांनी बुकिंग उघडले की काही दिवसांतच सर्व ट्रकचे बुकिंग फुल होऊन जाते. बुकिंग शिवायही अनेकजण त्यांना ऐनवेळी विनंती करतात. त्यासाठी अधिकचे पैसेही मिळतात पण कामगार, चालक अक्षरशः थकून गेलेले असतात. तिथल्या मूव्हर्स कंपनीच्या माणसांना अनेक विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते. काहीजण अक्षरशः ट्रकसमोर आडवे येऊन थांबतात. ते सामान काढून घराबाहेर थांबलेले असतात. पण सामान हलवण्यास ट्रक न मिळाल्याने त्यांना असे पाऊल उचलावे लागते.
सर्वसामान्य लोकांवरही एक विचित्र ताण असतोच. बऱ्याचदा मुव्हिंग डे मदतीसाठी मित्रांना खास बियर, पिझ्झाचे आमिश देऊन बोलावले जाते. घरात कोणी आजारी असतील तर अजून ताण असतो. काहीही झालं तरी ही विचित्र परंपरा लोक पाळताना दिसतात. त्यांचे म्हणणे असे आहे की हा मदतीचा दिवस असतो. अनेकजण एकाच दिवशी घर हलवतात त्यामुळे शेजारच्याला मदतही करतात. जुने वाद विसरून या दिवशी सगळेजण एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे धावतात. हे एक सामाजिक कामासारखे आहे.
१ जुलै हा कॅनडासाठी राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. त्यादिवशी कॅनडाची स्थापना झाल्यामुळे तो वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. कॅनडाच्या इतर सर्व शहरांमध्ये मोठे समारंभ, रस्त्यावर रॅली, परेड, फटाक्यांची आतिषबाजी चालू असते. सर्व लोक यामध्ये उत्साहात सहभागी होतात. पण मॉन्ट्रियलमध्ये मुव्हिंग डे गेले २५० वर्षे केला जातोय. कारण ही परंपरा आहे ती पाळायलाच हवी, असे तिथली लोक मानतात. सर्व ऑफिसेसमध्ये यासाठी आठवडाभर सुट्टी दिली जाते. मुलांचेही शैक्षणिक वर्ष संपलेले असते.
अशी ही मॉन्ट्रियलच्या मुव्हिंग डे ची कहाणी आहे. इकडे आपण दरवर्षी घर बदलाच्या विचारानाचे घामाघूम होऊ. पण इथले लोक एका वेगळ्या स्फूर्तीने हे सर्व पाळतात. आता काळ बदलतोय, तिथे उष्णतेच्या लाटा सुरू झाल्या आहेत. हा उन्हाळा असला तरी उष्णता विचित्र पद्धतीने वाढते आहे. ही परंपरा ते काळानुसार बदलतात की अशीच सुरू ठेवतात हे पाहणेही उत्सुकतेचे ठरेल.
लेखिका: शीतल दरंदळे
आणखी वाचा: