आपण क्रूड ऑइल घेतो कुठून? आणि त्याचा भाव घटतो आहे की वाढतो आहे? आपल्याला त्याचा फायदा काय होतो?

यापूर्वी आपण क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलाबद्दलचा लेख वाचल्यावर बर्याच जणांच्या मनात एक प्रश्न नक्की आला आहे. "तेल इतके स्वस्त झाले आहे तर सर्वसामान्य जनतेला त्याचा प्रत्यक्ष फायदा का होत नाहीय? आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का कमी होत नाहीत?" तर वाचकहो, हे समजून घेण्यासाठी आधी आपण क्रूड ऑइल म्हणजे कच्चे तेल किती प्रकारचे आहे ते समजून घेणे आवश्यक आहे.
कच्च्या तेलाचे अनेक प्रकार आहेत. पण तेलाच्या बाजारात क्रूडच्या किंमतीवर ज्यांचा परिणाम होतो ते प्रकार समजून घेऊ या!!
पहिला प्रकार WTI crude- वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट क्रूड ऑइल म्हणजे अमेरिकेत तयार होणारे क्रूड ऑइल. काल दिवसभर चर्चा होत होती ती याच तेलाची. तेल विहिरींतून उपसलेले हे तेल अमेरीकेत ओक्लाहोमा या प्रांतात साठवले जाते. या साठवणूकीची मर्यादा संपत आल्याने आणि तेलाला मागणी नसल्याने या तेलाचे फ्यूचर्समधले म्हणजे वायदे बाजारातले भाव काल कोसळले. या कच्च्या तेलात सल्फर म्हणजे गंधकाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे या तेलाचा दर्जा अत्यंत उच्च समजला जातो. या तेलाची घनता कमी असते. त्यामुळे या तेलाला स्वीट आणि लाईट असे संबोधले जाते.
दुसरा प्रकार ब्रेंट ब्लेंड - या तेलाला नॉर्थ सी ऑइल म्हटले जाते. या तेलाचा भाव युरोपातील मागणीवर अवलंबून असतो. याचा दर्जा WTI पेक्षा कमी असतो, पण त्याच्या घनतेमुळे त्याला लाइट ऑइल असेच म्हटले जाते. भारताला या भागातून तेल मिळत नाही, पण भारत ज्या प्रदेशातून कच्चे तेल विकत घेतो त्याच्या भावावर या ब्रेंट ब्लेंडचा प्रभाव असतो.
मग आपण क्रूड ऑइल घेतो कुठून? आणि त्याचा भाव घटतो आहे की वाढतो आहे? आपल्याला त्याचा फायदा काय होतो? हे तीन महत्वाचे प्रश्न अनुत्तरीतच आहेत नाही का? चला, आता या प्रश्नांची उत्तरं पण शोधू या!
आपण क्रूड ऑइल आखाती देशातून घेतो हे सर्वांना माहिती आहेच, पण आखाती देश म्हणजे कोण कोणत्या देशातून घेतो हे समजून घेऊ या.
आपण घेतो त्या कच्च्या तेलाला ओपेक बास्केट असे म्हणतात. ओपेक म्हणजे “Organization of Petroleum-Exporting Countries”. हा अनेक देशांचा समूह आहे. आपण या समूहाकडून तेल विकत घेतो. ओपेक बास्केटमध्ये सात वेगवेगळ्या देशांच्या कच्च्या क्रूडचा समावेश होतो. दुबई, नायजेरीया, सौदी अरेबिया, अल्जेरीया, इंडोनेशिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको असे हे सात देश आहेत. पण अधिकाधिक तेल दुबई, नायजेरीया आणि सौदी अरेबिया या देशांतूनच येते.
हे तेल वाहतूकीसाठी स्वस्त पडते हे त्यामागचे महत्वाचे कारण आहे. हे तेल वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट क्रूड ऑइल आणि ब्रेंट ब्लेंडपेक्षा हलक्या दर्जाचे असते. ते स्वीट नसते. म्हणजेच त्यात सल्फरचे प्रमाण जास्त असते. लाइटही नसते, कारण त्याची घनता जास्त असते. साहजिकच ते इतर तेलापेक्षा चार ते पाच डॉलर स्वस्त असते. आपल्या देशात ८३ टक्के तेल हे बाहेरच्या देशातूनच येते. म्हणून स्वस्त आणि कमी वाहतुकीच्या खर्चात ओपेकखेरीज दुसरा पर्याय आपल्याकडे नाही. या स्वस्त तेलाच्या शुध्दीकरणात आपण आपले पर्यावरण जलद गतीने नष्ट करत असतो हा वेगळाच मुद्दा आहे, पण गरीब देश करणार तरी काय?
आता पुढचा प्रश्न! ओपेक बास्केटचे भाव आता घसरले आहेत का? होय, निश्चितच घसरले आहेत. पण वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट इतके ते कमी झालेले नाहीत. काल दिवसभर चर्चा रंगली होती ती वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट या कच्च्या तेलाची, ओपेक बास्केटची नाही. तरीपण ओपेक तेलाच्या प्रति बॅरलचे भाव किती कमी झाले ते बघू या.
आज हा लेख लिहित असताना ओपेक ऑइल गेल्या २२ वर्षांच्या नीचांकाला आहे. आजचा भाव १४.१३ डॉलर्स प्रती बॅरल असा आहे. तरीही अजून भाव कमी होत नाही आहेत याची कारणे म्हणजे-
१. केरोसीन, डिझेल यांवर सरकारला भरपूर सबसिडी द्यावी लागते.
२. तेल शुध्दीकरणाचा खर्च ओपेकच्या भावावर अवलंबून नसतो.
३. सरकार तेलावर जे कर आकारते ती एक गुंतागुंतीची बाब आहे. राज्य सरकार वेगवेगळ्या पध्दतीने कर आकारते, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे.
४. कोविडच्या लॉकडाऊनमध्ये तेलाची मागणी घटली आहे.
५. स्वस्त झालेले तेल साठा करून ठेवण्याची पुरेशी व्यवस्था आपल्याकडे नाही. आपली आवश्यकता १.५ कोटी टन साठवण्याची आहे, पण सध्या उपलब्ध सुविधा फक्त ०.५ कोटी टन साठवण्याची आहे. ही साठवण आपल्याला जेमतेम आठवडाभर पुरते.
शेवटचे आणि सगळ्यात महत्वाचे कारण असे की क्रूड स्वस्त झालेले असले तरी त्याचे पैसे सरकारला अमेरिकन डॉलरच्या चलनातच भरावे लागतात. सध्या अमेरिकन डॉलर रुपयाच्या तुलनेत महागल्याने तेलाचे भाव पडले तरी झालेला फायदा वाया जातो.
आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुमच्या मनात काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पण हा लेख संपवण्यापूर्वी आणखी काही गोष्टी लक्षात घ्या-
असं म्हणतात की जगातील पहिलं महायुद्ध भूभागावर काबू मिळविण्यासाठी लढले गेले, ,दुसरे जगातल्या संसाधनावर हक्क मिळवण्यासाठी तर तिसरं कदाचित 'एनर्जी' म्हणजे ऊर्जेसाठी लढले जाईल.
बऱ्याच तज्ज्ञांच्या मते तिसरं युद्ध जाहीररित्या लढले न जाता अप्रत्यक्षपणे बाजाराच्या माध्यमातून वर्षानुवर्षे चालत राहिल. फक्त त्याला युद्ध न म्हणता स्पर्धा म्हटले जाईल. या ऊर्जेसाठी अमेरिका मध्यपूर्वेत लढते आहेच, पण अत्यंत वेगळ्या पध्द्तीने सोव्हिएत रशिया पण स्पर्धेत आहेच. या तेलाच्या स्पर्धेत अनेक घटना अशा घडल्या आहेत की प्रत्येक घटनेवर एक स्वतंत्र सिनेमा काढता येईल. यानंतर बोभाटाच्या माध्यमातून एकेक कथेचा पट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
१९७५ साली झालेल्या यामेनीच्या अपहरणाची स्टोरी अशीच मनोरंजक आहे, ती वाचू येत्या काही दिवसांतच!