केट आणि विल्यम्स यांच्या तिसऱ्या मुलाच्या बातमीवर तिथली जनता खूष का नाहीय?

२०११मध्ये झालेल्या   शाही लग्नाचा सोहळा न्यूज चॅनेल्सनी इतका प्रसारित केला होता की जगात दुसरं काही घडतच नाहीय की काय असं झालं होतं! त्यानंतर   २०१३ मध्ये प्रिन्स जॉर्ज आणि २०१५मध्ये प्रिन्सेस शार्लट या दोन मुलांच्या जन्मानंतर केट मिडलटन तिसऱ्यांदा गरोदर असल्याची बातमी काल-परवा वाचली असेलच. लोकांना या राजघराण्याबद्दल विनाकारण कौतुक असतं.  प्रिन्सेस डायना तिच्या मृत्यूनंतरही लोकप्रियता टिकवून आहे, तर केटही तिथल्या लोकांची बरीच लाडकी आहे. पण सध्याच्या चर्चा पाहता केट आणि विल्यम्सच्या बाळाच्या आगमानाची वार्ता लोकांना तितकीशी आवडलेली दिसत नाहीय.

स्रोत

३० जुलैच्या या  बातमीनुसार 'हॅविंग किड्स' या लहान कुटुंबं असावी म्हणून काम करणाऱ्या एका संस्थेनं  केट आणि विल्यम्स यांना एक अनावृत पत्र दिलं होतं आणि त्यात त्यांनी "हम दो, हमारे दो" याचं स्वत:च्या वागणुकीतून जनतेला उदाहरण घालून द्यावं अशी विनंती केली होती. राजघराणं त्यांच्या तिसऱ्या मुलाला जगातल्या सगळ्या सुखसोयी उपलब्घ करून देऊ शकेल, पण त्या सोयी पुढच्या पिढीतल्या सर्वच मुलांना मिळू कदाचित शकणार नाहीत असं या संस्थेचं म्हणणं होतं. 

या बातमीनुसार युकेमध्ये मुलांच्या संख्येवर एकप्रकारे नियंत्रण आणलं जात आहे. पहिल्या दोन मुलांच्या पालनपोषणासाठी वर्षाकाठी प्रत्येक मुलाला  २,७८०पौंडापर्यंतची रक्कम  चाईल्ड टॅक्स क्रेडिट म्हणून मिळू शकते. पण तिसरं मूल, मुलगा असो वा मुलगी, त्यांना हे फायदे मिळू शकत नाहीत. परंतु त्या बाळाचा गर्भ राहण्यास बलात्कार किंवा इतर प्रकारची बळजबरी कारणीभूत असेल, म्हणजेच तिच्या संमतीशिवाय हे घडलं असेल, तर हा कायदा लागू होत नाही.  २०१५च्या अर्थसंकल्पात की कल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली. तेव्हापासून या विधेयकाचा विरोध केला जातोय. लोकांचं म्हणणं आहे की जी व्यक्ती तिसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळेस इतक्या वाईट अनुभवातून गेली असेल तर तिला पुन्हा अर्जांचे खेटे का घालावे लागावेत?

स्रोत

त्यामुळंच आता केंब्रिजचा ड्यूक आणि डचेसना तिसरं बाळ होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. लोकांचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलांना सरकारी मदत मिळत नसताना करदात्यांनी आणखी एका राजघराण्यातल्या बाळावर पैसे का खर्च करावेत? पण खरी गोष्ट अशी आहे की विल्यम आणि केट यांना प्रवासासाठी आणि त्यांच्या प्रॉपर्टीज जपण्यासाठी राणीला मिळणाऱ्या भत्त्यातून काही रक्कम मिळते. त्यांचा इतर खर्च हा प्रिन्स चार्ल्स चालवत असलेल्या डची ऑफ कॉर्नवॉलमधून चालतो. 

ते काही असो, सध्या कॅथरिनबाईंना सकाळी मळमळ आणि वांत्या सुरू झाल्या आहेत आणि येणारं बाळ हे गादीवर बसणाऱ्यांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर असणार आहे. सध्याच्या राणीसाहेब एलिझाबेथनंतर प्रिन्स चार्ल्स (त्यांचा नंबर कधीच लागणार नाही असा लोकांचा खरा कयास आहे), प्रिन्स विल्यम्स, त्यानंतर त्यांची दोन मुलं- प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस शार्लटनंतर या बाळाचा गादीसाठी नंबर लागेल. प्रिन्स हॅरी यामुळं आणखी एक स्थान खाली गेला आहे.

दरम्यान, डयुरेक्सने प्रिन्स विल्यमला एक संदेश दिला आहे..

स्रोत

कुणाचं काय तर कुणाचं काय!!!!

सबस्क्राईब करा

* indicates required