या आजीची ५०० रुपयांची देणगी लाखोंच्या देणगीपुढं महान का ठरलीय?

कोरोनामुळे अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे जगासमोर होत असलेला माणुसकीचा आविष्कार!! अनेक मोठमोठ्या दिग्गजांनी करोडो रुपयांची मदत केली आहे. पण अनेक मध्यमवर्गीयांनी सुद्धा आपल्या कुवतीनुसार मदत केली आहे. पण आज आम्ही एका आजीबाईची गोष्ट सांगणार आहोत. तिची पेन्शन सहाशे रुपये आहे तर त्यातले ५०० रुपये तिने कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी दिले आहेत.
म्हैसूरमधल्या ७० वर्षीय कमलम्मा यांची ही गोष्ट आहे. ही आजीबाई लोकांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करते. पण कोरोनाचा कहर सुरू झाल्यावर तिला आपले काम सोडावे लागले. तिला मिळत असलेल्या ६०० रुपये पेन्शनवर ती स्वतःचा उदरनिर्वाह कसाबसा चालवते.
म्हैसूर रोटरी क्लबमार्फत वाटली जाणारी अन्नाची पाकिटं कमलम्माला देखील मिळतात. तिथल्या रोटरी क्लबच्या सदस्यांनी सांगितले की आम्ही अन्नाचे पाकिटे वाटपाच्या कामात असताना ही आजीबाई आमच्या जवळ आली, सुरुवातीला आम्हाला वाटले की अन्नासाठी आली असेल. पण जेव्हा तिने ५००रुपये मदत देण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले. आम्ही तिला ते पैसे स्वतःजवळच ठेवण्यास सांगितले. पण तिने उत्तर दिले की, "मी महिनाभरापासून तुमची मेहनत बघत आहे. त्यात आपण पण हातभार लावावा अशी माझी इच्छा आहे. ही रकम कमी असली तरी तुम्ही स्वतःजवळ ठेऊन घ्यावी."
तिची ही मदत कितीही कमी वाटत असली तरी स्वतःच्या कमाईच्या ९० टक्के मदत तिने केली आहे. जर मोठ्या लोकांच्या कमाई आणि केलेली मदत या टक्केवारीशी तुलना केल्यास तिची मदत किती मोठी आहे हे कळून येते.
कमलम्माच्या या मदतीचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे, सगळीकडे तिचे कौतुक होत आहे. अशात या आजीबाईची माहिती सगळ्यांना व्हावी म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न!!!