computer

पुण्यातल्या केक आर्टिस्टने सर्वात मोठे आयसिंग स्ट्रक्चर बनवून दोन जागतिक विक्रम केलेत!! ही कलाकृती तर पाहा!!

लॉकडाऊनमध्ये सगळीकडे युट्यूबवर रेसिपी शिकून केक बनविण्याची स्पर्धा चालू झाली होती. यातून काहींनी केकचा व्यवसाय पण सुरू केला. पण पुण्यातील एका महिलेने या केकमधून चक्क वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. १०० किलो वजनाचे खाण्याजोगे वेगन रॉयल आयसिंग स्ट्रक्चर बनवून त्यांनी जागतिक विक्रम केला आहे.

प्राची ढबाल देब असे त्यांचे नाव आहे. केक स्पेशालिस्ट म्हणूनच त्यांची ओळख आहे. पण आता ही ओळख नव्या उंचीवर गेली आहे. त्यांनी अजून एक विक्रम केला आहे. जास्तीतजास्त संख्येत वेगन रॉयल आयसिंग स्ट्रक्चर तयार तयार करण्याचा हा विक्रम आहे. या डबल विक्रमाची माहिती त्यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

हा अवाढव्य केक तब्बल ६ फूट ४ इंच लांब, ४ फूट ६ इंच उंच तर ३ फूट ५ इंच रुंद होता. या विक्रमावर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डकडून सांगण्यात आलेली गोष्ट महत्वपूर्ण आहे. " देब या स्वतः बनवलेल्या विनाअंड्याच्या वेगन रॉयल आयसिंग स्ट्रक्चरसाठी ओळखल्या जातात. जास्तीत जास्त संख्येत हे आयसिंग बनवण्याचा त्यांचा विक्रम आहे. त्यांना केकची राणी असेच म्हटले गेले पाहिजे."

प्राची यांचे वय जास्त आहे असेही नाही. अवघ्या तिशीत त्यांनी जागतिक स्तरावर केकमधल्या एक्सपर्ट म्हणून नाव कमवले आहे. रॉयल आयसिंग बनवणे ही खूपच कठीण केक रेसिपी समजली जाते. ही कला त्यांनी जागतिक तज्ञ सर एडी स्पेन्स यांच्याकडून शिकली आहे. पूर्णपणे शाकाहारी सामग्रीपासून हा केक तयार होत असतो.

हा भव्य केक तयार करण्यासाठी त्यांना केकचे १५०० तुकडे तयार करावे लागले. नंतर ते सर्व एकत्र करून मग महिनाभरात हा परिपूर्ण केक तयार झाला आहे. २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा ४ इंचाचे रॉयल आयसिंग बनवले होते. २०२० साली त्यांनी मोठा प्रयोग करत ३.९ फुटाचा केक तयार केला.

त्यांचा हा प्रवास आता वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डवर येऊन थांबला आहे. एखाद्या गोष्टीला पॅशन बनवून त्यापासून किती मोठे यश मिळवता येऊ शकते याची उदाहरणे अनेक आहेत. पण केक सारखी म्हणायला गेले तर छोटी गोष्ट, पण त्यापासून देखील जागतिक विक्रम करता येतात हे प्राची यांनी दाखवून दिले आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required