अॅमस्टरडॅममध्ये जगातील पहिला थ्रीडी प्रिंट पूल तयार करण्यात आलाय...हे थ्रीडी प्रिंट काय असते जाणून घ्या!!

नदीवर बांधलेले पूल म्हणजे कुठल्याही शहराचे वैभव असते. जुन्या बांधलेल्या पूलांनी शहराला ऐतिहासिक रूप दिसते, तर नवीन आधुनिक पुलांनी शहराला आधुनिक रूप मिळते. जगभरात आजपर्यंत असे अनेक नवीन पद्धतीचे पूल बांधले गेले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानामुळे हे सहज शक्य होऊ लागले आहे. पण तरीही आजपर्यंत ३D पूल तुम्ही पाहिला नसेल ना? तर तुम्हाला ऐकून नवल वाटेल, अॅमस्टरडॅममध्ये जगातील पहिला थ्रीडी प्रिंट केलेला स्टील पूल बांधला गेला आहे. आणि नुकताच तो सर्वांना वापरण्यासाठी उघडला आहे. आज माहिती करून घेऊयात या थ्रीडी पुलाविषयी!
नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅममध्ये जगातील पहिला थ्रीडी प्रिंट केलेला स्टील पूल बनविण्यात आला आहे. अॅमस्टरडॅममध्ये ८ लाखांपेक्षा जास्त लोक राहतात. या शहरात अनेक कालवे आहेत. येथे व्हेनिससारखी जलवाहतूकही होते. त्यामुळेच तिथे एका कालव्यावर हा पूल बांधण्यात आला आहे. १२मीटर लांबीच्या या पुलाचे नाव एमएक्स ३ डी ब्रिज आहे. हा तयार करण्यासाठी तब्बल ४,५०० किलो स्टेनलेस स्टील वापरण्यात आले आहे. आणि हा चक्क रोबोटच्या मदतीने बांधला गेला आहे! पूल तयार करण्यासाठी चार व्यावसायिक रोबोटची मदत घेण्यात आली. या पुलाचे डिझाइनही रोबोटसनेच केले आहे. त्यांच्या साहाय्याने पूलाचे भाग जोडले, कापले आणि नंतर ते थर लावून पूर्ण केले आहेत. याचे वजन सुमारे ६ टन इतके आहे .त्याच्या डिझाइनिंगपासून छपाईपर्यंत सुमारे ६ महिन्यांचा कलावधी लागला आहे. एका बोटीतून पुलाचे सर्व भाग कालव्यामध्ये आणले गेले. त्यानंतर ते क्रेनने उचलले आणि कालव्याच्या दोन्ही बाजूंनी ठेवले आणि नंतर ते एकमेकांसोबत जोडण्यात आले.
या पुलाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याला सेन्सर्स बसवले आहेत. यावर १२ सेन्सर बसवल्यामुळे या पुलाची स्थिती समजून घेणे सोपे होईल. सेन्सरद्वारे त्यामधील बदल सातत्याने तपासून घेता येईल. हा पूल तात्पुरता म्हणजे २ वर्षांसाठी बसवला आहे, कारण जुन्या पुलाची दुरुस्ती चालू आहे. जुना पूल नव्याने बांधणार आहेत. हा ३D प्रिंट स्टील पूल अॅमस्टरडॅममधील ओडेजिड्स एशेरबर्गव्हाल (oudezijds Achterburgwal) कालव्यावर बांधण्यात आला आहे. १८ जुलै रोजी तो पादचारी आणि सायकल चालकांसाठी उघडण्यात आला आहे.
केंब्रिज विद्यापीठाच्या मार्क गिरोलामी यांनी लंडनमधील ॲलन ट्युरिंग संस्थेत या पुलाचे डिजिटल मॉडेल बनविले. हा पूल किती वजन सहन करु शकेल? वेगवेगळ्या वातावरणाचा या पुलावर काय परिणाम होईल या सर्व बाबी तपासल्यानंतरच हा पूल कालव्यावर बसविण्यात आला आहे. तसेच सेन्सर्समुळे या सगळ्या शक्यता संगणकावर अभ्यासल्या जाणार आहेत. त्यामुळे तो पूर्णपणे सुरक्षित आहे.
त्याचे निर्माते मार्क गिरोलामी सांगतात की ३ डी-प्रिंटेड स्टीलची ताकद खूप जास्त आहे. हे कोणत्याही सामान्य स्टीलपेक्षा जास्त मजबूत आहे. भविष्यात असे मोठे पूलही बांधता येतील.
या पूलामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा अजून एक आविष्कार जगासमोर आला आहे.
लेखिका: शीतल दरंदळे