खुद्द नवरदेवाच्या तोंडून ऐका यवतमाळच्या गे मॅरेजची खरीखुरी कहाणी..

बोभाटाचे वाचक आदित्य जोशींनी यवतमाळला झालेल्या समलैंगिक विवाहाच्या पार्श्वभूमीवर त्या लग्नातल्या भारतीय नवऱ्यामुलासोबत-हृषीसोबत-दिलखुलास गप्पा मारल्या आणि ती मुलाखत बोभाटासोबत शेअर केली आहे.. चला वाचूया, या लग्नाच्या चर्चांबद्दल आदित्यला काय वाटले आणि हृषीची या लग्नापाठीमागे काय भूमिका होती..

                                                                  ============================================================

 

काही आठवड्यांपुर्वी तुम्ही ही बातमी वाचली असेल :  यवतमाळमध्ये एका मराठी माणसाने एका चिनी माणसाशी लग्न केले. आधी सगळ्या मराठी वृत्तपत्रांमध्ये अन् नंतर इंग्रजी चॅनेल्सवर व पेपरांमध्ये ही बातमी आली. आय.आय. टी.  मुंबईचा माजी विद्यार्थी हृषी हा तो मराठी माणूस. 

स्रोत

बारा जानेवारीला मराठी पेपर आणि वेबसाईट्सवर, अगदी बोभाटावर सुद्धा, हे लेख प्रकाशित झाले. ह्यातले अनेक लेख वाचून माझी चिडचिड झाली. "चिनी बाय्फ्रेंड", "दोघे एकाच ऑफीसात आहेत", "घरच्यांचा विरोध होता", "आईचा विरोध झुगारून" हे (चुकीचे) उल्लेख त्या लेखांमध्ये होते. " यवतमाळनेसुद्धा पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार सुरू केला आहे", असे धादान्त गैरसमज त्या लेखांमध्ये व्यक्त होत होते. आणि मग जेव्हा हे लेख फेसबुकवर शेअर होऊ लागले, तेव्हा त्या लेखांवरच्या कमेन्ट्स तर भयंकर होत्या. "संस्कृती बुडू लागली आहे", "हे काय अनैसर्गिक", "कसली विकृती ही" अशा कमेन्ट्स जवळजवळ सगळीकडे वाचायला मिळत होत्या. ह्या कमेन्ट्स अनपेक्षित नव्हत्या,  पण त्या योग्यही नव्हत्या. माझ्यासारख्या गे लोकांना ह्या अशा उद्गारांना अनेकदा सामोरे जावे लागते. समलैंगिकांबद्दल  काहीही माहिती नसलेले लोक फारसा विचार ना करता,  "तुम्ही गे लोक म्हणजे थिल्लरअसता", "तुम्हाला काय, आज एक उद्या दुसरा" असं काहीही  बोलून मोकळे होतात. पण मग जेव्हा हृषीसारखे लोक लग्न करून 'चार-चौघांसारखे' संसार करण्याचे धाडस करतात, तेव्हा त्यांचाही असाच फडशा पाडला जातो हे पाहून मन अस्वस्थ झाले. एक महिन्यापूर्वी त्या दोघांशी वांद्र्याला भेट झाली होती. जरासा लाजाळू विन आणि मितभाषी हृषी ह्या दोघांची जोडी मला खूप गोड वाटली होती. मी लगेच हृषीला मेसेज केला आणि त्याच्याशी बोलायची एक वेळ ठरवली. हृषीच्या प्रेमाबाद्दल, लग्नाबद्दल, त्या लग्नाला मिळालेल्या चांगल्या आणि वाईट पब्लिसिटीबद्दल आमचा हा संवाद :

 

आदित्य: तुला आणि विनला लग्न करायचे आहे हा निर्णय घरच्यांना कधी सांगितलात? त्यांची काय प्रतिक्रिया होती?  

हृषी : एखाद्या लग्नाला अनेक पैलू असतात.  दोन मनांचे एकत्र येणे, धार्मिक विधींमधले लग्न आणि लग्नाची कायदेशीरता. हे लग्न पहिल्या पद्धतीचे होते. भारतामध्ये कायदेशीर मान्यता पूर्णपणे स्पष्ट नाही ह्याची साहजिकच मला जाणीव होती . मी आणि विन एक वर्षांपूर्वी भेटलो आणि एकमेकांना पसंत करू लागलो. आणि हो, तो व्हिएतनाममधला आहे, चीनमधला नाही. बहुतेक पेपरवाल्यांनी त्याला चीनी माणूस करून टाकला आहे. असो. तर, मी त्याला एप्रिलमध्ये मागणी घातली आणि त्याने हो म्हटले. आम्ही जूनमध्ये साखरपुडा केला. एकत्र राहू लागलो आणि एकमेकांना जाणून घेऊ लागलो. आम्हाला लवकरच जाणीव झाली की आम्हाला एकमेकांबरोबर आयुष्य काढायचे आहे. डेट करण्याच्या आधीपासूनच आम्हाला माहीत होते, आम्हाला कायदेशीर लग्न करायचे आहे. आमच्या दोघांचीच मूल दत्तक घेण्याची इच्छा असल्याने आमच्या लग्नाला कायदेशीर मान्यता असणे गरजेचे होते. 

स्रोत

आदित्य: पण मग हे लग्न मोठ्या स्तरावर, अडी -अडचणींशिवाय तुम्ही अमेरिकेत करू शकला असतात. भारतात का?

हृषी : भारतात केलेले फंक्शन पूर्णपणे माझा निर्णय होता. मी स्वतःला समजून घ्यायला, मग घरच्यांना सांगायला आणि मग त्यांना समजून घ्यायला अनेक वर्ष लागली. पण मग मला कधी लग्न करता येईल का हा प्रश्न मनाला भेडसावत असे. विनच्या रूपात प्रेम लाभले म्हणून मग योग्य जुळून आला. मी अमेरिकेत स्थायिक आहे, मी अमेरिकेत लग्न करू शकलो असतो, नक्कीच. पण मग मित्र, शाळेतले शिक्षक, नातेवाईक अमेरिकेला येऊ शकले नसते. काही आले असते, पण सगळे येऊ शकले नसते. आणि आज मला आणि माझ्या लग्नाला जर ह्या सगळ्या लोकांचा पाठिंबा आहे, तर मला त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा, हे फंक्शन करणे गरजेचे वाटले. मला पूर्णपणे जाणीव आहे की ह्या लग्नाला कायदेशीर मान्यता भारतात नाही. पण माझ्यासाठी माझ्या प्रियजनांच्या उपस्थितीत मी केलेला हा 'स्नेहमिलन सोहळा ' नक्कीच होता. 

आदित्य: ह्या लग्नात तुम्ही काय काय केलेत ?

हृषी : पेपरमध्ये आले आहे की आम्ही वैदिक पद्धतीने लग्न केले. ही माहिती त्यांना कुठून मिळाली माहीत नाही. आम्ही आंतरपाटमध्ये ठेवून लॅपटॉपवर मंगलाष्टके लावली, एकमेकांना माळा घातल्या. आणि उपस्थितांच्या पाया पडून रीतसर आशीर्वाद घेतले. ह्या लग्नात भटजी, हवन वगैरे नव्हते. लग्ना-आधी हळद आणि एक डान्सचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता. इतकेच. त्या हॉटेलमध्ये खूप चांगली सोय होती: स्वच्छता, जेवण, सगळे चोख होते. हे यवतमाळमधले बेस्ट हॉटेल आहे असे मी ऐकलेच होते. 

आदित्य: तुमच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. लोक कमेंट्स करत आहेत. त्या वाचून तुला सध्या काय वाटत आहे?

हृषी : लोकांना समलैंगिकतेबद्दल माहिती नाहीये हे पाहून खेद वाटला. भारताच्या इतिहासात डोकावून पाहिले, मंदिरांमध्ये, लोककथांमध्ये अनेक संदर्भ मिळतात. समलैंगिकतेचा स्वीकार करणे अनेक शतके भारतात अगदी सामान्य होते. सेक्शन ३७७ आणि समलैंगिक लोकांना वाईट साईट हिणवण्याचा हा प्रकार भारतात आलेल्या इंग्रजांनी आपल्यावर लादला. आणि आपण आज त्यांच्याच विचारात गुरफटून गेलेलो आहोत हे पाहून वाईट वाटले. 

आदित्य: ओके . मग ह्यापुढे काय?

हृषी : आम्ही अमेरिकेला परत आलो आहोत. काही काळाने आम्ही मूल दत्तक घेऊ इच्छितो. सरोगसीद्वारे स्वत:चे मूल जन्माला घालणे शक्य असले तरी जगात अनेक अनाथ मुलांना कुटुंबाची गरज आहे. 

स्रोत

आदित्य: फार छान.. मग आता उखाणा घे. (झी वर 'होम मिनिस्टर ' जास्त बघितल्याचा माझ्या मनावर प्रभाव नक्की झाला आहे )

हृषी : दोन घेतो. एक इंग्लिश, एक मराठी. इंग्लिश: Ring is ring... Vinh is my king

आदित्य: आणि मराठी?

हृषी : कपावर कप , कपावर  बशी .. विनला सोडून बाकी सगळ्या म्हशी!!

 

हसतच आम्ही आमचा फोन कॉल बंद केला. 

मला हृषीचे कौतुक वाटते. घरच्यांच्या विरोधासमोर नमते घेऊन बाईशी लग्न केलेले अनेक गे पुरुष मला माहीत आहेत. अशा स्त्रीशी लग्नानंतर प्रतारणा सुरु राहते. घरच्यांच्या विरोधाला कंटाळून अमेरिकेला, युरोपला जाऊन स्थायिक होणारे गे पुरुषही मला माहीत आहेत. पण स्वतःच्या देशात परत येऊन, स्वतःच्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत आपल्या जोडीदाराशी आयुष्यभराचे नाते पक्के करण्याच्या हृषीच्या ह्या पावलाला धाडसच म्हणता येईल. 

नव-दांम्पत्यास मनःपूर्वक शुभेच्छा!

 

लेखक आदित्य जोशी हे समलैंगिकांच्या समान अधिकारांसाठी कार्यरत असणारे कार्यकर्ते आहेत.  

सबस्क्राईब करा

* indicates required