computer

अमेझॉनच्या जंगलात अन्न-पाण्यावाचून ३ आठवडे राहून, चित्ते-जंगलीप्राण्यांपासून वाचून् परत आलेला योसी घिंसबर्ग!!

'आज कूछ तुफानी करते है ' हा डायलॉग कितीही भारी वाटत असला तरी मोठे धाडस करणे अनेकांच्या जीवावर बेतत असते. काहीजण असे धाडस करून कसेबसे वाचतात, पण त्यांना आयुष्याची अद्दल घडते. मात्र काही अवलिये असेही असतात की जे 'डर के आगे जीत है' म्हणत मोठ्यातली मोठी धाडसी कारवाई पार पाडून सहीसलामत परत येतात.

आज एका अशा धाडसी तरुणाची गोष्ट आपण वाचणार आहोत. याने अमेझॉनच्या घनदाट जंगलात हरवल्यावर हिंमत न सोडता मार्गक्रमण केले आणि तो तिथून सहीसलामत बाहेर आला. योसी घिन्सबर्ग हे आहे या तरुणाचे नाव. अवघे २१ वर्ष वय असलेला तरुण अशा जंगलात अडकला होता, जिथे त्याला पाणी, अन्न काहीही मिळणे शक्य नव्हते.

३ आठवड्यांच्या या काळात त्याने अनेकवेळेस मृत्यूचा सामना केला. कधी हिंस्त्र प्राणी, कधी विषारी साप अशी शेकडो संकटे समोर असताना त्याच्या परत येण्याची गोष्ट ही प्रचंड चित्तथरारक आहे. त्याच्या या कहाणीवर जंगल नावाचा हॉलीवूड सिनेमा देखील आला आहे. योसी म्हणतो की सहसा सिनेमा हा खऱ्या कहाणीपेक्षा जास्त मसाला लावून तयार केलेला असतो. पण माझी कहाणी ही सिनेमापेक्षा चित्तथरारक आहे.

योसी हा तरुण इस्रायली नेव्हीत ३ वर्षाची त्याची सेवा पूर्ण करून परत आला होता. अनेक तरुण जसे एखादा सिनेमा बघून पुस्तक वाचून प्रेरित होऊन काहीतरी भन्नाट करण्यासाठी घराबाहेर पडतात तसेच हा पण पॅपीलॉन नावाचे पुस्तक वाचून अमेझॉनच्या जंगलाची सफर करण्यासाठी निघाला. वर्ष होते १९८१!

या भावाला सोबत करण्यासाठी अजून दोन लोक भेटले. मार्कस स्टॅम नावाचा स्वित्झर्लंडचा एक शिक्षक आणि केव्हीन गेल नावाचा एक अमेरिकन फोटोग्राफर. हे लोक बॉलिव्हिआ या देशात पोहोचले. तिथे त्यांना कार्ल रुप्रेटर नावाचा एक भूविज्ञानतज्ञ भेटला. आधीच उत्साहाने सळसळणाऱ्या या तरुणांना कार्लने एक जबरदस्त प्लॅन सांगितला.

आपण अमेझॉनच्या जंगलात सोन्याचा शोध घेण्यासाठी निघालो आहोत असे त्यांना त्याने सांगितले. या तिन्ही भारावलेल्या पोरांनी त्याच्यासोबत प्रवास सुरु केला. जंगलाच्या दिशेने आता त्यांचा प्रवास सुरु झाला होता. सोबत असलेले अन्न-पाणी काही काळाने संपले. म्हणून त्यांनी माकड मारून खायला सुरुवात केली. सोन्याची लालूच त्यांना ऊर्जा देत होतीच.

योसी म्हणतो की जेव्हा भूक एका पातळीपर्यंत जाते तेव्हा माणूस काहीही खायला मागेपुढे बघत नाही. आता यात स्टॅम मात्र माकड खायला नकार देत होता. त्यांच्यात भांडणे व्हायला लागली. त्यातच मग रुप्रेटर आणि स्टॅम यांनी ही यात्रा अर्ध्यातच सोडण्याचा निर्णय घेतला. उरलेले दोघे-योसी आणि गेल यांनी एक कामचलाऊ तराफा सोबत घेत प्रवास सुरु केला.

ते ज्या नदीतून प्रवास करत होते, तिथे मध्येच एक धबधबा आला. तिथे त्यांना या तराफ्यावर काही ताबा ठेवता आला नाही. त्यातही गेल भाग्यशाली होता. त्याला किनारा सापडला. तर योसी वाहून गेला. तब्बल अर्धा तास तो वाहत होता. यात तो दगडांना ठोकला जात होता, झाडांवरून आदळत होता. त्याला काय त्रास होत होता हे फक्त तोच सांगू शकतो.

त्याला कसातरी एक किनारा सापडला. त्याच्याकडे ना खायला काही होते, ना प्यायला. तिकडे गेल पाच दिवसांनी सापडला होता. त्याला एका स्थानिक मच्छिमाराने वाचवले. पण योसी पुढचे तीन आठवडे जिवंतपणे नरकप्रवास करणार होता. एकदा थेट चित्ता समोर आला. नंतर त्याने एका हिंस्त्र मांजरीला जवळच्या लायटरने पळवून लावले.

त्याने जेम्स बॉण्डचे सिनेमे पाहिल्याचा फायदा त्याला आता झाला होता. आपण इथून बाहेर कसे पडायचे हे त्याला माहित नव्हते. कारण तो पार आतपर्यंत गेला होता. आपण इथेच मरणार आहोत हे त्याला कळून चुकले. त्रास भोगण्यापेक्षा स्वतःचा जीव घ्यावा असेही त्याला वाटून गेले.

याच प्रवासात मात्र त्याला एक महिला भेटली. त्याने तोवर सर्व हिंमत सोडली होती. अशाच वेळी त्याला त्या महिलेत एक आशेचा किरण दिसला होता. पण खरंतर ती महिला त्याला भेटणे हा त्याचा भास होता. योन्सी पूर्णपणे वेडावला होता. काय करावे काही कळत नाही, त्यातही शरीर पूर्णपणे कमकुवत झालेले अशी त्याची परिस्थिती झाली होती.

पायाला जखमा झाल्याने पाय कुजला होता. डोक्यालाही जबर जखम झाली होती. आपले मरण आता जवळ आले आहे याची पूर्ण खात्री त्याला झाली होती. अशातच त्याला एका इंजिनचा आवाज ऐकू आला. त्याच्या खंगून गेलेल्या शरीरात ऊर्जा सळसळू लागली. त्याचा सहकारी गेलने काही स्थानिक लोकांना सोबत घेऊन त्याला शोधून काढले होते.

ते दोघे भेटले तेव्हा गेलनेही पण योसी सापडेल अशी आशा सोडली होती आणि तो परत फिरणार होता. गेल त्याला जेव्हा परत घेऊन आला, तेव्हा हा माणूस इतका कठीण त्रास सोसून जिवंत येऊ शकतो हे कुणालाही पटत नव्हते. योसीला ३ महिने दवाखान्यात ठेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले.

स्टॅम आणि रुप्रेटर नंतर सापडलेच नाहीत. रुप्रेटर तर कोणी भूविज्ञानतज्ञ नव्हे, तर इंटरपोल शोध घेत असणारा गुन्हेगार असल्याचेही समजले. योसी बरोबर १० वर्षांनी १९९२ ते १९९५ त्याच जंगलात जाऊन राहिला. हा पठ्ठ्या सध्या मोटिव्हेशल स्पीकर म्हणून जगभर फिरतो. त्याने थेट ३ लग्ने केली आणि त्याला ४ मुले आहेत.

त्याच्या कहाणीवर आधारित हॅरी पॉटर फेम डॅनियल रेडक्लिफचा जंगल हा सिनेमा २०१७ साली येऊन गेला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required