computer

अमेरिका आणि रशियाच्या भांडणात झाम्बियाने मंगळ मोहीम कशी सुरु केली? त्या मोहिमेचं पुढे काय झालं?

झाम्बिया. दक्षिणपूर्व आफ्रिकेतला एक देश. त्याला हे नाव मिळालं तिथून वाहणाऱ्या झांबेझी नावाच्या नदीवरून. १९६४ मध्ये हा देश स्वतंत्र झाला आणि लगेचच या देशाने अवकाशात चढाई करण्याचं स्वप्न पाहिलं. त्या काळात अवकाशात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि रशिया या महासत्तांमध्ये स्पर्धा होती. त्यांच्यातलं शीतयुद्ध जगजाहीर होतं. त्यात हा देश मध्ये पडला आणि त्याने या दोन्ही ताकदवान भिडूंना थेट आव्हान दिलं - चांद्र मोहिमेत आम्ही तुम्हाला टक्कर देणार! ह्या सगळ्यामागे होता एक धडपड्या स्वभावाचा माणूस - एडवर्ड मकुका एन्कोलोसो.

मूळचा शाळाशिक्षक असलेला मकुका हा झाम्बियाच्या नॅशनल अकेडमी ऑफ सायन्सचा डिरेक्टर होता. मकुकाच्या डोळ्यात झाम्बियाचा ध्वज चंद्रावर फडकवण्याची स्वप्नं होती, पण त्याहून महत्त्वाकांक्षी योजना त्यांच्या मनात आकार घेत होती- ती म्हणजे मंगळावर उतरणं. बरं त्याला नुसतंच मंगळावर उतरण्यात रस नव्हता, त्यापुढे जाऊन त्याला मंगळवासी (खरोखर असलेच तर) लोकांमध्ये ख्रिश्चन धर्म रुजवायचा होता. त्याने त्या दिशेने एक योजनाही आखली होती. त्यानुसार मंगळावर जाणाऱ्या यानामध्ये एक १७ वर्षीय प्रशिक्षित स्पेस गर्ल (अवकाशकन्या), २ प्रशिक्षित मांजरी आणि एक ख्रिस्ती मिशनरी यांचा समावेश होता. मात्र मंगळवासियांची इच्छा नसेल तर त्यांच्यावर ख्रिस्ती धर्म लादू नये असं त्याने त्या मिशनऱ्याला बजावून ठेवलं होतं.  

त्याच्या टीममध्ये एकूण १२ सदस्य होते आणि त्यांना त्याने ऍफ्रोनॉट असं नाव दिलं होतं. मकुकाला खात्री होती, हा कार्यक्रम यशस्वी झाला तर स्वर्गावर झाम्बियाचंच नियंत्रण प्रस्थापित होणार. शिवाय त्या काळात झाम्बिया गुलामगिरीतून नुकताच मुक्त झाला होता. एकंदर वर्णभेदाच्या पार्श्वभूमीवर आफ्रिकन लोकांना निम्न म्हणजे खालच्या दर्जाची वागणूक मिळत असे. त्यामुळे हम भी किसीसे कम नही हे पाश्चात्त्यांना दाखवून देण्यासाठी ही नामी संधी होती. त्याकाळच्या सरकारचा त्याला कितपत पाठिंबा होता हे समजायला मार्ग नाही. याचं एक कारण असं होतं की अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या शीतयुद्धात झाम्बियाने उदासीन(न्यूट्रल) भूमिका स्वीकारली होती. परंतु त्याच्या स्वतःच्या दृष्टीने मात्र हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं होतं. 

नुसतं स्वप्न पाहून न थांबता मकुकाने त्या दिशेने तयारीही सुरू केली.  या ऍफ्रोनॉट्सच्या प्रशिक्षणासाठी एक तात्पुरत्या स्वरूपाचं प्रशिक्षणकेंद्र उभारण्यात आलं. इथे या प्रशिक्षणार्थ्यांना २०० लिटरच्या एका ऑइल ड्रममध्ये ठेवून एका खडबडीत टेकाडावरून खाली सोडून दिलं जायचं. तो ड्रम मग आतल्या माणसांसह घरंगळत खाली येई. अवकाशात जो वेटलेसनेस म्हणजे वजनविरहित अवस्थेचा अनुभव येतो त्यासाठीची ही रंगीत तालीम होती.

वेटलेसनेस म्हणजे काय, तर अवकाशात प्रवास करतेवेळी अवकाशवीरांच्या शरीरावर गुरुत्वीय बलाव्यतिरिक्त इतर कोणतंही बल कार्य करत नसल्याने शरीराला वजन नसल्यासारखं वाटण्याची स्थिती. शिवाय गुरुत्वबल असलं तरी ते दुरून कार्य करत असल्यामुळे त्याची जाणीव होत नाही आणि शरीर अतिशय हलकं (जवळपास शून्य वजनाचं) असल्याचा आभास निर्माण होतो. वेटलेसनेसची तालीम करण्यासाठी टायरचा झोकाही वापरला गेला. याशिवाय अजून एक कसरत म्हणजे हातावर चालणं. कारण चंद्रावर माणसाला अशाच प्रकारे चालता येतं. 

त्यांच्या रॉकेटचं नाव होतं डी कालू. रॉकेट कसलं, तो एक साधा ड्रम होता. ३ मीटर बाय २ मीटरचा, अल्युमिनियम आणि कॉपरपासून बनवलेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे - मकुकाच्या मते - अवकाशात प्रवास करायला योग्य असा. 

मकुकाचा युनिफॉर्मपण वैशिष्ट्यपूर्ण होता. कॉम्बॅट हेल्मेट, खाकी रंगाचा लष्करी गणवेश आणि खांद्यावर रेशमी, रंगीबेरंगी कपडा. त्याचे सहकारी हिरव्या रंगाची सॅटिनची जाकिटं आणि पिवळ्या ट्राऊझर्स घालत. यात गॉडफ्रे म्वान्गो या एकवीस वर्षाच्या तरुणाला चंद्रावर उतरण्याची कामगिरी पार पाडायची होती, तर माथा म्वाम्ब्वा ही सोळा वर्षांची तरुणी मंगळ मोहिमेसाठी निवडली गेली होती. त्याचा सायक्लॉप्स नावाचा कुत्रा अंतराळात गेलेल्या पहिल्या रशियन कुत्रीच्या - लायकाच्या - पावलावर पाऊल ठेवून जाणार होता.

सगळी तयारी तर झाली. मुहूर्त निश्चित झाला, पण कुठेतरी माशी शिंकली! मोहिमेला परवानगी नाकारली गेली. झालं! मकुका चांगलाच अस्वस्थ झाला. तो पार युनेस्कोपर्यंत पोहोचला. तिथे त्याने आपल्या स्पेस प्रोग्रॅमसाठी तब्बल ७ दशलक्ष पाउंड (झाम्बियन) एवढा निधी मागितला. अर्थातच त्याची मागणी युनेस्कोने नाकारली. असंही म्हटलं जातं की त्याने १.९ बिलियन डॉलर्स एवढी रक्कम काही देशांकडे मागितली होती. पण एवढं जंगजंग पछाडूनही पैसा उभा राहिला नाहीच. 

एक मात्र खरं, निधीची कमतरता एवढी एकच अडचण नव्हती. खरी समस्या याहून मोठी होती. हळूहळू मकुकाच्या सहकाऱ्यांचं लक्ष मोहिमेपासून विचलित व्हायला लागलं होतं. हे काही आता होत नाही, असाही त्यातल्या काहीजणांचा ग्रह व्हायला लागला होता. आकाशातल्या चंद्रापेक्षा त्यांना आता आपल्यातल्याच काहीजणांची भुरळ पडायला लागली होती. त्यांच्यात 'प्रेमप्रकरणं' सुरू झाली होती. याला अगदी त्याची स्पेस गर्ल माथा म्वाम्ब्वा हीही अपवाद नव्हती. या मोहिमेच्या रिहर्सल कालावधीदरम्यान तिला चक्क दिवस गेले. तिच्या आईवडलांनी तिला घरी घेऊन जाणं हा मकुकासाठी मोठा हादरा ठरला. 

असेच छोटेछोटे धक्के सांभाळत असतानाच अमेरिकेने १९६९ मध्ये अवकाशात पाऊल ठेवल्याचं जाहीर केलं आणि त्याचे सहकारी स्पेस अकॅडमी सोडून गेले. मकुकाच्या आशाआकांक्षांचा चुराडा झाला.  १९८९ मध्ये त्याच्या मृत्यूबरोबरच त्याची स्वप्नंही कायमची जमिनीत गाडली गेली.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required