दादांची एक आठवण 'एकटा जीव' मधून...

आमच्या बँडपथकाच्या दळवी मास्तरांनी मला एकही वाद्य वाजवायला न शिकवतही मी सर्व वाद्य वाजवायचो म्हणून त्यांना माझं खूप कौतुक होतं. बँडपथकामध्ये माझा बराच वेळ जाऊ लागला. तिथल्या मुलांना विनोद सांगून मी जाम हसवायचो. त्यामुळे दोन-तीन महिन्यांतच मी सर्वांचा लाडका बनलो. एखाद्या लग्नसमारंभाला गेलो की, तिथे ‘जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ हे गाणं मी छान वाजवत असल्यामुळे लग्नघरातून मला एक रुपया बक्षीसी मिळायची. एकदा एक गम्मतच झाली. एका पोलीस ऑफिसरच्या मुलीचं लग्न होतं. लग्नात त्याने आमचा बँड बोलावला होता. लग्न लागल्यावर लोकप्रिय चित्रपट गाणी वाजवून आम्ही लग्नसमारंभातल्या लोकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे वरात निघायच्या आधी मुलीकडचा एकजण आला आणि मला म्हणाला, ‘वरात निघाल्यावर चांगली गाणी वाजवा हं.’
मी म्हटलं, ‘बरं’
पण वरात निघाल्यावर मला काय चहाटाळपणा सुचला कोण जाणे ! मी गाणं वाजवायला सुरुवात केली, ‘दिल में छुपा के प्यार का अरमान ले चले, आज हम अपनी मौत का सामान ले चलें.’
आता असलं गाणं वाजवल्यावर आणि काय होणार ? तो पोलीस ऑफिसर माझ्याजवळ आला आणि त्याने खाडकन माझ्या थोबाडीत ठेवून दिली.
बँडपथकात असलो तरी माझ्या मारामाऱ्या काही कमी झाल्या नव्हत्या. माझ्या मारामाऱ्या, उनाडपणा कमी व्हावा म्हणून मोठ्या दादाने चारपाच महिन्यांनंतर मला त्याच्या राजाराम गोलटकर नावाच्या मित्राकडे काम करायला पाठवलं. राजाराम मास्टर भगवान दादांकडे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचा. मी त्याच्याकडे गेलो, त्यावेळी तो बाबुराव पैलवान व मास्टर भगवान, आगा, लीला मिश्रा, यांना घेऊन ‘धूमधाम’ नावाचं पिक्चर स्वतंत्ररित्या दिग्दर्शित करीत होता. त्याने त्याच्या असिस्टंटचं काम मला दिलं. सहाय्यक म्हणून मी एकटाच काम करत होतो. त्यामुळे एडिटिंग नोट लिहायची, क्ल्यॅप मारायचा, कंटीन्यूटी लिहायची आधी सर्व कामं मलाच करायला लागायची. राजाराम भयंकर तापट. त्यामुळे मी त्याला खूप घाबरायचो. त्याने नुसतं ‘दाss’ म्हटलं की पुढचा ‘दा’ म्हणायच्या अगोदर त्याच्यासमोर उभं राहावं लागायचं. थोडा जरी यायला उशीर झाला की तो लगेच कानाखाली मारायचा. मी बऱ्याचवेळा त्याचा मार खाल्ला.
तळटीप : अनिता पाध्ये यांच्या "एकटा जीव" मधून !
(लेखकाच्या पूर्व परवानगीने हा भाग इथे प्रसारित करण्यात आलेला आहे.)