स्विस बँकेत खातं उघडायचं आहे ? चला तर, हे नक्की वाचा | भाग २

ही स्विस खात्याची बोंबाबोंब आहे तरी काय ?
आता पर्यंत आम्ही तुम्हाला जी माहिती सांगीतली ती सर्व सामान्य खात्याची म्हणजे रिटेल बँकींगची, या खेरीज दोन वेगळ्या प्रकारची खाती उघडता येतात, ती म्हणजे नंबर्ड अकाउंट आणि प्रायव्हेट बॅकींग अकाउंट. ही खाती मात्र सिनेमात दाखवतात तशी अगदी गुप्त स्वरुपाची असतात.
आधी बघू या नंबर्ड अकाउंट म्हणजे काय ?
हे खातं फक्त विशिष्ट आकड्यांमध्ये ओळखलं जातं . ते खातं कोणाचं आहे हे फक्त बँकेच्या अधिकार्यालाच माहिती असतं आणि या खात्याची माहिती अगदी सरकारलाही देण्यास नकार देण्याचे अधिकारही बँकेला असतात. हे खातं उघडायला कमीतकमी १,००,००० डॉलर म्हणजे सत्तर लाख जमा करायला लागतात आणि खातं चालू ठेवण्यासाठी भरपूर दक्षिणा बँकेला द्यावी लागते.
दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट बँकींग अकाउंट-
या खात्यात पैसे जमा ठेवण्यापलीकडे ठेवलेले पैसे गुंतवणे हे महत्वाचे काम असते. अर्थातच जमा रकमा पण त्या प्रमाणात मोठ्या म्हणजे अब्जावधी रुपयात असतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या खात्यांची चर्चा पेपरात आपण वाचतो ती खाती म्हणजे ही खाती !!
या खेरीज अति रहस्यमय प्रकार म्हणजे स्विस बॅकांतले "सेफ डिपॉझीट व्हॉल्ट". या गुप्त खात्यात काय असेल हे फक्त जमा करणार्या माणसालाच माहिती असतं !!
उदाहरण द्यायचण झालं तर, दुसर्या महायुध्दात साठ लाख ज्यू लोकांची हत्या करून आणि जिंकलेल्या देशात लूटमार करून नाझींनी जवळजवळ ३००० कोटीचं सोनं या सेफ डिपॉझीट व्हॉल्ट मध्ये जमा केलं होतं.
१७१३ सालापासून म्हणजे जवळजवळ ३०० वर्षं, गुप्ततेच्या कलमाखाली बँके खेरीज कोणालाही स्विस बॅ़केच्या खात्याची माहिती मिळत नसे. गेली काही वर्षं मात्र वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे स्वित्झर्लंड सरकारने ही माहिती इतर देशांना पुरवण्याची तयारी केली आहे. त्या मध्ये मुख्यतः आतंकवादी संस्थांची, अंमली पदार्थांचे व्यवहार आणि करचुकवेगिरी करून त्यातून जमा केलेली संपत्ती याची पूर्ण माहिती स्विस सरकार देणार आहे.
भारतासोबत झालेल्या करारानुसार २०१९ पासून नियमित ही माहिती भारत सरकारला मिळणार आहे.
बघा आपलं नाव देशातल्या सगळ्या वृत्तपत्रात छापून आणायचं असेल तर उघडा स्विस बँकेत अकाउंट.