अॅपलचे फोन भारतात बंद होणार ? बातमी किती खरी, किती खोटी ?

मोबाईल फोन्स मधली एक अग्रगण्य कंपनी ‘अॅपल’ सध्या एका मोठ्या संकटात आहे. भारतात अॅपलचे फोन बंद होण्याची शक्यता आहे. सोशल मिडीयावर तर अॅपलचे फोन बंद होणार अशी बातमी देखील पसरलीये. काय कारण आहे की सरकार अॅपलच्या फोनवर बंदी आणणार आहे ? या उलट सुलट चर्चा का होत आहेत ? यात किती तथ्य आहे ? चला तर सर्व मुद्द्यांचा आढावा घेऊया.

अॅपल आणि ट्राय (TRAI) मधलं भांडण काय आहे ?

स्रोत

ट्राय म्हणजे ‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण’ आणि अॅपल कंपनी मध्ये सध्या भांडण सुरु आहे. हे भांडण आहे एका अॅप वरून. ट्रायने अॅपलला त्यांच्या अॅप स्टोर मध्ये मध्ये डीएनडी २.० अॅप (Do Not Disturb) सामील करण्यास सांगितलं आहे. पण अॅपलने याला नकार दिलाय. यावरूनच सध्या अॅपल आणि ट्राय यांच्यात घमासान सुरु आहे.

डीएनडी २.० अॅप काय आहे

स्रोत

ग्राहकांना अनावश्यक कॉल्स आणि मेसेजेसचा त्रास होऊ नये म्हणून ट्राय तर्फे डीएनडी २.० अॅप लाँच करण्यात आलंय. या अॅपद्वारे ग्राहकांना फेक कॉल्स आणि मेसेजची तक्रार करता येणार आहे. आता ट्रायच्या नव्या नियमांनुसार भारतातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर्संनी पुढील सहा महिन्यांच्या आत हे अॅप त्यांच्या अॅपस्टोर मध्ये सामील करावेत. अॅपलने हे नियम अद्याप पाळलेले नाहीत.

अॅपल नियम का पळत नाहीये ?

स्रोत

डीएनडी २.० अॅप ग्राहकांचे कॉल आणि मेसेज रेकॉर्ड करण्याची परवानगी मागतं. या परवानगीने ग्राहकांची माहिती सुरक्षित राहत नाही. याच कारणावरून अॅपलने अद्याप प्लेस्टोर मध्ये हा अॅप सहभागी करून घेतलेला नाही. अॅपल आजवर ग्राहकांची प्रायव्हेसी जपण्यासाठी ओळखलं जातं. त्यामुळे त्यांनी ट्रायच्या नियमांना मानण्यास साफ नकार दिलाय.

 

राव, अजून तरी या भांडणाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे अॅपलचे फोन बंद होणार असं सध्या तरी म्हणता येणार नाही. पण जर अॅपलने माघार घेण्यास नकार दिला तर अॅपल भारतीय बाजारपेठेला कायमचं मुकण्याची शक्यता आहे.

ऍपल सहसा कुणापुढे झुकत नाही हे आधीही बरेचदा सिद्ध झालंय. यापूर्वी 'ऑरलँडो' इथं झालेल्या गोळीबारात हल्लेखोरांचा फोन अनलॉक करण्यासाठी FBI नं वारंवार सूचना करूनही त्यांनी ऐकलं नव्हतं.

सबस्क्राईब करा

* indicates required