व्हिडीओ ऑफ दि डे : ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात हे भगदाड कशानं पडलंय आणि का?

आज आम्ही तुम्हाला निसर्गाने घडवून आणलेली अजबगजब घटना सांगणार आहेत. ही घटना आहे ऑस्ट्रेलियातली. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडच्या किनाऱ्यावर चक्क समुद्रात मोठं भगदाड तयार झालंय राव. हे भगदाड इतक्या चमत्कारीकरित्या तयार झालं की पर्यटक आणि स्थानिक लोक सुद्धा अवाक झालेत.
अंदाजे ६५० ते ९८० फुट रुंद आणि तब्बल २५ फुट खोल असलेलं हे भगदाड एक आश्चर्य आहे. २३ सप्टेंबर रोजी हे भगदाड तयार झालं. डायाना जॉर्नेक्स नामक पायलटने याबद्दल सांगितलंय की तिने जेव्हा या भागावरून आपल्या चॉपर विमानातून प्रवास केला तेव्हा अशी कोणतीच विचित्र गोष्ट तिला दिसली नव्हती. पण दुसऱ्याच दिवशी किनाऱ्यावरची वाळू मोठ्या खड्ड्यात पडू लागली. या लहानश्या खड्ड्याने आता मोठं रूप घेतलं आहे.
याचं कारण काय ?
या भगदाडामागचं कारण आहे ‘समुद्राची भरती’. जेव्हा समुद्राच्या भरतीचा मारा हा तटाच्या खालच्या भागावर अधिक असतो तेव्हा किनाऱ्याची जमीन कमकुवत होऊ लागते. खालून कमकुवत झालेला भाग साहजिकच समुद्रात कोसळतो. असे प्रकार पावसाळ्यातही घडतात. पावसाचं पाणी झिरपून वाळू अस्थिर होते आणि शेवटी अशा किनाऱ्यांना समुद्र गिळून टाकतो.
ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात पडलेलं हे तिसरं भगदाड आहे. गेल्या तीन वर्षात अशा ३ घटना घडल्या. याची सुरुवात झाली २०१५ पासून. तज्ञांच्या मते हे काही शेवटचं भगदाड नाही. असे प्रकार भविष्यात घडत राहू शकतात.
मंडळी, आता तुम्ही प्रत्यक्षात बघा हे भगदाड दिसतं तरी कसं !!