आता आलाय रडण्याचा क्लब, याचा फायदा तर जाणून घ्या!!

मंडळी, लहान मुलं रडताना लाजत नाहीत, पण ती जसजशी मोठी होतात तसतशी त्यांच्यात रडण्याविषयी एक अंधश्रद्धा तयार होते. आपण तर मुलं मोठी होत असताना त्यांना ‘रडायचं नाही’ असा दम भरतो. मग हळूहळू हे रडणं चार भिंतींच्या आत होऊ लागतं. आज हे सगळं सांगण्याचं कारण असं की भारतात पहिल्यांदाच ‘क्राइंग क्लब’ सुरु झाला आहे. जसा लाफिंग क्लब असतो तसाच हा ‘क्राइंग क्लब’ क्लब आहे. चला तर जाणून घेऊया या एका वेगळ्या क्लब बद्दल...
‘रडा भरपूर रडा’ हाच या ‘क्राइंग क्लब’चा उद्देश्य आहे. गुजरातच्या सुरत येथे सुरु झालेल्या क्राइंग क्लब मध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं. संकल्पना अशी आहे की तुम्ही क्लब मध्ये या आणि मनातल्या दुःखाला वाट करून भरपूर राडा.
या क्लबची संकल्पना कमलेश मसालावाला यांनी शोधून काढली आहे. विरोधाभास म्हणजे ते स्वतः चक्क लाफ्टर थेरपिस्ट आहेत. पण त्यांचं म्हणनं आहे की रडणे आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यांना ही संकल्पना लहान मुलांकडून सुचली. ते म्हणतात की लहान मुलं कोणत्याही संकोचाशिवाय रडतात म्हणूनच त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. हाच प्रयोग त्यांनी मोठ्यांसोबत करून बघितला आहे.
कमलेश यांनी या संकल्पनेची वैज्ञानिक थियरी पण सांगितली आहे बरं. ते म्हणतात की आपल्या अश्रूंमध्ये कॉर्टीसॉल नावाचं रसायन असतं. हे रसायन मानवी शरीरासाठी घातक असतं. जितक्या लवकर हे रसायन शरीराबाहेर पडेल तेवढं ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. म्हणजेच रडणं हे हसण्या इतकंच महत्वाचं आहे.
मंडळी, या क्लब मध्ये वेगवेगळ्या व्यवसायातील, वेगवेगळ्या आर्थिक स्थरातील स्त्री पुरुष सहभागी झाले आहेत. क्राइंग क्लबमुळे आपला ताण कमी झाल्याचं त्यांनी म्हटलंय. सारिका गांजावाला या गृहिणी या क्लबच्या मेंबर आहेत. त्या म्हणतात की क्लब मध्ये येऊन मन मोकळं केल्याने घरातल्या कामाचा ताण कमी होतो.
तर मंडळी, या आगळ्यावेगळ्या ‘क्राइंग क्लब’ बद्दल तुम्हाला काय वाटतं ? सांगा बरं !!