५०० रुपये दंड भरावा लागला म्हणून त्याने बदल्यासाठी पोलीस स्टेशनचा वीज पुरवठा बंद केला !!

त्याचं झालं असं की श्रीनिवास नावाचे इलेक्ट्रीशियन ऑफिसर फिरोजाबाद येथील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून परतत होते. रस्त्यात त्यांना ट्राफिक पोलिसांनी हेल्मेट नसल्याने अडवलं. श्रीनिवास म्हणतात की “पोलिसांनी मला थांबवून ट्राफिकचे नियम शिकवले, मग मी पण त्यांना विजेचं बिल न भरल्यास भराव्या लागणाऱ्या दंडाची माहिती दिली.” यांनतर त्यांनी आपल्या सहकाऱ्याला फोन लावला. त्यांच्या सहकाऱ्याने पोलिसांकडे श्रीनिवास यांना सोडण्याची विनंती केली, पण पोलीस काही ऐकून घेईनात. शेवटी त्यांच्याकडून ५०० वसूल केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं.
या गोष्टीने रागावलेले श्रीनिवास ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी त्या भागातल्या पोलीस स्टेशनची सगळी खाती उकरून काढली. त्यात त्यांना आढळलं की पोलीस स्टेशनने २०१६ पासून तब्बल ६,६२,४६३ रुपयांचं विजेचं बिल थकवलं आहे. बदला घेण्यासाठी त्यांना हे कारण पुरेसं होतं. त्यांनी ४ तासांसाठी पोलीस स्टेशनची वीज बंद केली.
मंडळी, हे प्रकरण पुढे ‘दक्षिणांचल विद्युत वितरण निगम लिमिटेड’कडे (DVVNL) गेलं. DVVNL च्या रणवीर सिंग या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास यांना गेल्या ४ महिन्यापासून पगार मिळालेल्या नाही, त्यामुळे त्यांना ५०० रुपये भरता येणार नव्हते. तरी पोलिसांनी ऐकून न घेता दंड वसूल केला.
यावर पोलीस म्हणतायत की ‘आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा नियम मोडल्यास दंड लावतो, तर मग इलेक्ट्रीशियन ऑफिसरना माफी कशी देणार.’
मंडळी, खऱ्या थकबाकीचा आकडा याहून मोठा आहे. त्यापैकी १.१५ कोटी रुपये DVVNL ला देण्यात आलेत आणि उरलेले लवकरच देऊ या सबबीवर पोलीस स्टेशनने आपली वीज परत मिळवली.
मंडळी, या प्रकरणात श्रीनिवास यांनी जो सूड उगवला तो बरोबर होता का ? तुम्हाला काय वाटतं ?