पुन्हा निर्भया प्रकरण होऊ नये म्हणून याने तब्बल २ लाख मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले!!

२०१२ साली जेव्हा निर्भया प्रकरण घडलं त्यावेळी देशातील अनेक लोकांना समाजात बदल घडवण्याची इच्छा होती. उत्तर प्रदेशचा अभिषेक यादव पण यापैकीच एक होता. हा बदल कसा घडेल याचा शोध लागायला त्याला फारसा वेळ लागला नाही.
अभिषेक यादव हा आयकीडो या जपानी मार्शल आर्ट्स मधला गोल्ड मेडलिस्ट आहे. तो उत्तर प्रदेश कमांडोजना २००७ सालापासून मार्शल आर्ट्स शिकवतो आहे. २०१२ साली निर्भया केसनंतर त्याने या कामाला सामाजिक रूप दिलं. त्याने स्त्रियांना आणि मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली.
त्याने आजवर उत्तर प्रदेश मधल्या २.५ लाख मुलींना प्रशिक्षण दिलं आहे. त्याचं हे काम “अभिसेल्फ प्रोटेक्शन ट्रस्ट” या संस्थेमार्फत चालतं. ही संस्था “मेरी रक्षा, मेरे हाथो में” नावाचा कार्यक्रम राबवते. मुलींना आठवड्यापेक्षा जास्त काळात संरक्षण तंत्र शिकवले जातात. अभिषेक म्हणतो की या प्रशिक्षणामुळे मुली कोणत्याही हल्याला स्वतः प्रत्युत्तर देऊ शकतात.
२०१६ साली अभिषेकने ५७०० मुलींना एकत्र प्रशिक्षण देऊन लिम्का रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. तो आणि त्याची टीम प्रत्येक शाळेत जाऊन मार्शल आर्ट्सचं महत्व समजावून देतात. अभिषेक म्हणतो की “आयकीडो तंत्र कोणालाही सहज शिकता येईल. नियमित प्रशिक्षणाने दैनंदिन आयुष्यात त्याचा वापर करता येऊ शकतो”.
अभिषेकला या पुढच्या काळात आपल्या कॅम्पचा विस्तार उत्तर प्रदेश बाहेर करण्याची इच्छा आहे. लवकरच दिल्ली आणि हरयाणा भागात कॅम्पस सुरु होतील.
तर मंडळी, बदल घडवता येऊ शकतो, त्यासाठी फक्त योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे हे अभिषेकच्या उदाहरणावरून समजतं. महाराष्ट्रात अशा प्रकारचं प्रशिक्षण देणारी कोणती व्यक्ती असेल तर आम्हाला नक्की सांगा. त्यांच्याबद्दल आम्ही नक्की लिहू.